Wednesday, May 26, 2021

भारतीय कुस्तीला कलंक


यश, पैसा आणि संपत्ती यांची नशा चढलेल्या माणसांना सत्ता गाजवण्याचा मोह होतो. यातूनच मग हे लोक काहीतरी मोठी चूक करून जातात आणि आपलं सर्वस्व गमावतात. आज अशीच परिस्थिती ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशीलकुमार याची झाली आहे. हा कुस्तीपटू एका खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे आणि आज तुरुंगाची हवा खात आहे. याशिवाय सुशीलला उत्तर रेल्वेतील नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे.आज ही व्यक्ती 'हिरो'ची 'झिरो' झाली आहे.

सुशील कुमारने 2008च्या  बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक तर 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. इथंपर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा होता. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र या क्षेत्रात आपली दहशत असावी, या महत्त्वाकांक्षेने आता सगळे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. 

छत्रसाल स्टेडियमवर 4 मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत 23 वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. छत्रसाल स्टेडिअममध्ये बेदम मारहाण केली होती. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सुशीलकुमार फरार झाला होता. त्यामुळे सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय अजय कुमारच्या अटकेसाठी 50 हजारांचं बक्षीस जाहीर झालं होतं. 37 वर्षीय सुशील कुमारला अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली तसंच शेजारच्या अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते.

18 मे रोजी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. तपास एकतर्फी असून पीडितला झालेल्या दुखापतीशी आपला संबंध नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र कोर्टाने प्रथमदर्शी मुख्य आरोपी असून गंभीर आरोप असल्याचं सांगत अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. दिल्ली शहरातील कुस्ती क्षेत्रात आपली दहशत पसरवण्यासाठी सुशील कुमारने हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुशील कुमारने आपला मित्र प्रिन्सला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं होतं. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितांना जनावरांप्रमाणे मारहाण केली. त्याला कुस्ती क्षेत्रात आपली दहशत निर्माण करायची होती,अशीही माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

रविवारी (दि.23) सकाळी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला राजधानीच्या मुंडका परिसरातून अटक केली. यावेळी सुशील कुमार बाईकवरून पोलिसांना गुंगारा देऊन निसटण्याच्या प्रयत्नात होता. सागर राणाच्या मृत्यूनंतर 4 मे रोजी मध्यरात्रीपासून कुस्तीपटू सुशील कुमार फरार होता. तो सातत्याने त्याचं ठिकाण बदलत होता. तसेच, या 18 दिवसांमध्ये त्याने अनेकदा सिमकार्ड देखील बदलले आहेत. या काळात सुशील कुमार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, चंदीगढ आणि पंजाब या राज्यांमध्ये फिरला. दिल्लीची सीमारेषा त्यानं दोनदा पार केली. त्यामुळे एकूण 6 वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुशील कुमार यानं ओलांडली. सागर राणाचा मृत्यू झाल्यानंतर सुशीलकुमार आधी उत्तराखंडमध्ये ऋषीकेशला गेला. तिथे तो एका साधूंच्या आश्रमात राहिला. तिथून दुसऱ्याच दिवशी तो दिल्लीला परतला. मीरत टोल प्लाझावर तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दिल्लीहून तो हरयाणामध्ये बहादूरगडला गेला. तिथून तो चंदीगडला गेला. चंदीगडहून सुशिलकुमार पंजाबमध्ये भटिंडाला गेला. भटिंडाहून तो माघारी गुरुग्रामला आला. पश्चिम दिल्लीमध्ये तो काही काळ राहिला. इथूनही त्याचा पुन्हा निसटण्याचा प्रयत्न होता. मात्र, बहादूरगडचा रहिवासी असलेल्या बबलूनं सुशिलकुमार कोणती कार वापरतोय, हे सांगितल्यामुळे पोलिसांचा त्याचा माग काढणं सोपं झालं. मात्र, त्याचा मित्र अजयसोबत एका बाईकवरून जाताना पोलिसांनी मुंडका परिसरातून त्याला अटक केली.

अटकेनंतर सुशील कुमारच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता होतीच. दिल्ली सरकारने सुशीलची डेप्युटेशन वाढविण्याची मागणी फेटाळली. दिल्ली सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला आणि तो कार्यरत असलेल्या उत्तर रेल्वे विभागात पाठविला होता. 2015 पासून सुशील दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता आणि त्याचा कार्यकाळ 2020 पर्यंत वाढविण्यात आला होता. यावर्षीही हा कार्यकाळ वाढवायचा होता. उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमारला दिल्ली सरकारने छत्रसाल स्टेडियमवर ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त केले होते.

पीडित सागर राणाच्या कुटुंबाने याप्रकरणी योग्य तपास व्हावा अशी मागणी केली असून सुशील कुमारला कठोर शिक्षा केली जावी अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखींच्या माध्यमातून तपासावर प्रभाव पाडू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हत्येप्रकरणी कोर्टानेही तपास करावा जेणेकरुन सुशील कुमार आपल्या राजकीय ओळखी वापरत पोलीस तपासात अडथळा आणणार नाही अशी मागणी सागर राणाचे वडील अशोक यांनी केली आहे. सागर राणाच्या आईनेही संताप व्यक्त केला असून गुरु म्हणण्याची त्याची पात्रता नसल्याचे म्हटले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment