Saturday, May 8, 2021

क्युबामध्ये अमेरिकेचा प्रभाव वाढणार का?

 


बॉक्सिंग एक आक्रमक खेळ असला तरी त्याचा नियम असा आहे की, समान वजन असलेल्या दोन व्यक्ती आपल्या मुठीचा वापर करून लढू शकतात. कॅरिबियन देश असलेल्या क्यूबाच्या बॉक्सर खेळाडूंना या नियमाची चांगलीच माहिती आहे.  पण तेथील राज्यकर्ते त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या अमेरिकेला आव्हान द्यायला कधीच मागे हटले नाहीत.   क्युबामध्ये सहा दशकांनंतर पहिल्यांदाच कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च पद कॅस्ट्रो कुटुंबाशिवाय नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात आले आहे. हे फक्त क्युबासाठीच नव्हे तर अमेरिकेसाठीही महत्वाचे आहे, कारण अमेरिकेकडून क्युबामध्ये लोकशाहीवादी व उदारमतवादी शासन प्रस्थापित करण्याचे दीर्घ काळापासून प्रयत्न सुरू आहेत.

फिदेल कॅस्ट्रोच्या शासन आणि जीवनकाळात साम्यवादी प्रभाव कमी करण्याचे मुत्सद्दी, राजकीय, बुद्धिमत्ता आणि आर्थिकदृष्टीने प्रयत्न विफल ठरल्यानंतर क्युबामध्ये राजकीय नेतृत्वामध्ये अलीकडेच झालेल्या बदलावर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे.  त्याचे दूरगामी परिणाम सामरिक रूपाने शक्ती संतुलनाच्या नव्या शक्यतांना जन्म देऊ शकते. क्युबा सध्या दाट आर्थिक संकटातून जात आहे. तेथील लोकांना अमेरिकन प्रतिबंधातून सुटका हवी आहे.  बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात क्युबाशी असलेले संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा प्रतिबंध जैसे थे ठेवले आणि क्युबाला दहशतवाद प्रायोजित देशांच्या यादीमध्ये घातले. बायडेन यांच्या नेतृत्वात आता चांगल्या संबंधांची आशा असल्याचे दिसते आहे, परंतु यात क्युबाच्या नव्या नेतृत्वाची भूमिका काय असणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.  

खरंतर, जगातील सर्वात मोठी भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या दक्षिणपूर्व सीमेपासून अवघ्या तीनशे पासष्ट किलोमीटरवर असलेला कम्युनिस्ट देश क्युबा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खूपच लहान आहे. 1959  मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी कम्युनिस्ट क्रांती घडवून सत्ता आणली होती, तेव्हा अमेरिकेने डाव्या विचारसरणीच्या राजकारणाला मोठे आव्हान समजून  क्युबाशी आपले राजनैतिक संबंध तोडले होते. फिडेल कॅस्ट्रो यांना भांडवलशाही साम्राज्यवादाची इतकी चीड होती की, त्यांनी आपल्या देशात आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली असलेला अमेरिकी व्यापार आणि संस्था समूळ उखडून काढण्यासाठी सर्व खासगी उद्योग, बँका आणि व्यापाराचे राष्ट्रीयकरण केले.  अशा प्रकारे या सर्वांवर सरकारी नियंत्रण प्रस्थापित झाले.  क्युबाचे आणि अमेरिकेबरोबरचे संबंध अशा प्रकारे बिघडले की दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून ताणतणाव राहिला. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही त्याचा व्यापक परिणाम झाला. 

साठच्या दशकात अमेरिकेने क्युबावर व्यापार निर्बंध लादून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तत्कालीन सोव्हिएत संघाच्याच्या आर्थिक साहाय्यामुळे फिदेल कॅस्ट्रोने भांडवलशाहीपुढे झुकण्यास नकार दिला. कॅस्ट्रोने 1962 मध्ये सोव्हिएत संघाला आपल्या देशात अण्वस्त्र प्रक्षेपित करण्याची परवानगी देऊन कॅस्ट्रोने तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वाढविली.  कॅस्ट्रोने आफ्रिकेत आपले सैन्य पाठवले आणि अंगोलासह मोझांबिकच्या मार्क्सवादी गनिमी सैनिकांना पाठिंबा देऊन अमेरिकेसाठी अडचणी वाढवल्या.  नव्वदच्या दशकात सोव्हिएत संघ फुटल्यानंतर जागतिक परिस्थिती देखील बदलली, परंतु फिदेल कॅस्ट्रोची वृत्ती अमेरिकेप्रती आक्रमकच राहिली. फिदेल कॅस्ट्रो यांना हे चांगले माहीत होते की मार्क्सवाद हा एक राजकीय सिद्धांत नव्हे तर एक विचारधारा आहे.  क्युबातील सहा दशकांच्या कारकीर्दीत कास्ट्रो आणि त्याचा भाऊ राऊल कॅस्ट्रो यांनी कम्युनिस्ट विचारसरणीचे जागतिक प्रदर्शन केले परंतु जनतेवर ती लादण्याचा प्रयत्न केला नाही.  

अलीकडेच राऊल कॅस्ट्रो यांनी सांगितले होते की ते आता क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व तरुण पिढीकडे सोपवित आहेत.  कम्युनिस्ट पार्टी हा क्युबामधील एकमेव पक्ष आहे आणि लोकांच्या आशेचे केंद्रदेखील आहे. या पक्षाला चांगले माहित आहे की अमेरिकेबरोबरच्या संबंधांमुळे तिच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.  देशात पर्यटन आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, जे देशातील वाढत्या दारिद्र्य आणि असमानतेला आळा घालण्यासाठी खूप उपयोगाचे आहे. परंतु, क्युबाचे कम्युनिस्ट सरकार नेहमीच अमेरिकेबद्दल सांशक राहिले आहे. 1961 मध्ये सीआयएच्या मदतीने क्यूबाच्या निर्वासितांनी क्युबामधील एका बेटावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.  याबरोबरच असेही तथ्य समोर आले की,ज्यानुसार फिदेल कॅस्ट्रोला संपवण्याचा सीआयएने बर्‍याचदा प्रयत्न केला होता. हा अविश्वास क्युबाच्या नव्या नेतृत्वाच्या चिंतेत भर टाकत आहे.

क्युबा कम्युनिस्ट पार्टीची सत्ता मजबूत राखण्यासाठी चीन आणि रशियाकडून मदतीची अपेक्षा करू शकते.चीन आणि रशियाशी क्युबाचे मजबूत संबंध आहेत आणि लॅटिन अमेरिकन देशांशी संबंध सुधारण्याची कोणतीही संधी गमावू इच्छित नाही.  लॅटिन अमेरिकन देशांमध्ये गरीबी आणि अस्थिरता आहे.  कोरोना साथीच्या आजारामुळे बरेच देश संकटात सापडले आहेत.  अशा परिस्थितीत बायडेन प्रशासन क्युबाच्या बदलत्या राजकीय परिदृश्यांचा फायदा घेण्यासाठी आणि चीन आणि रशियासारख्या देशांना तेथून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कम्युनिस्ट पार्टी देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवेल अशा चिनी मॉडेलचा स्वीकार  क्युबा करू शकेल अशीही शक्यता आहे परंतु ती अर्थव्यवस्थेमध्ये मोकळेपणा आणू शकते आणि ती मुक्त बाजार व्यवस्थेच्या दिशेने जाऊ शकते.

कम्युनिस्ट पार्टी देशाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवेल अशा चिनी मॉडेलचा क्युबा स्वीकारू शकेल, अशीही शक्यता आहे, परंतु क्युबा अर्थव्यवस्थेमध्ये मोकळेपणा आणू शकतो आणि  मुक्त बाजार व्यवस्थेच्या दिशेने जाऊ शकतो.  क्युबाच्या सरकारी नियंत्रित अर्थव्यवस्थेत आता मोठी सुधारणा दिसून आली आहे.  सरकारने जाहीर केले आहे की ते केवळ काही विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित उद्योग चालवतील, उर्वरित क्षेत्रात खासगी व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाईल.  सरकारच्या या निर्णयामुळे जवळपासच्या देशांसह अमेरिकेला आर्थिक कार्यात खासगी सहभागाचा मार्ग मोकळा होईल. परंतु, अमेरिकेकडून याबद्दल अद्याप कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली नाही.

क्युबामध्ये अमेरिकेचा प्रभाव वाढणे म्हणजे या देशात बहुपक्षीय लोकशाही आणि खासगी गुंतवणूकीची शक्यता वेगाने तयार होऊ शकेल.  तसेच भांडवलशाहीला चालना मिळेल.  क्युबाच्या मध्यमवर्गालाही अशीच धोरणे हवी आहेत आणि आता तीही त्यांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.  फिदेल कॅस्ट्रो आणि राऊल कॅस्ट्रोबद्दल क्यूबन जनतेचा मनात आदर आहे.  परंतु, ते नव्या नेतृत्त्वातही कायम राहील, हे संभव नाही.  क्युबाचे नवीन नेतृत्व अमेरिकेशी संबंध सुधारून आपली अर्थव्यवस्था मजबूत करू शकते.  क्युबाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरेने हालचाल करावी लागणार आहे, तर अमेरिकेला आपल्या शेजारच्या देशाशी साम्यवाद संतुलित ठेवण्याची इच्छा आहे.  अशा परिस्थितीत उभय देशांमधील संबंधांना नवी सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.

No comments:

Post a Comment