Saturday, May 22, 2021

तालिबान्यांचं भूमिका मांडणारं आत्मचरित्र


 तालिबानी अब्दुल सलाम झैफ याचे आत्मचरित्र-'माझे तालिबानी दिवस'

'माझे तालिबानी दिवस!' हे अगदी लहान वयात 'जिहाद' मध्ये सामिल झालेल्या आणि तालिबानी सरकारमध्ये अनेक प्रशासकीय पातळीवर उच्च पदावर काम केलेल्या अब्दुल सलाम झैफ याचे आत्मचरित्र आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच 'तालिबानी चळवळीचं वास्तव मांडणारं आत्मकथन' असं वर्णन केलं आहे. हा 'My Life With The Taliban' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. अलेक्स स्ट्रिक व्हान लिंशोटेन फेलिक्स क्यून यांचं हे संपादित पुस्तक असून याचा मराठी अनुवाद डॉ.प्रमोद जोगळेकर यांनी केला आहे. वास्तविक तालिबान, मुजाहिद्दीन किंवा अफगाणिस्तान येथील राजकीय परिस्थिती यावर अधिक माहिती सांगणारी पुस्तकं आज फार उपलब्ध नाहीत. मात्र एका तालिबानी व्यक्तीनेच लिहिलेल्या या पुस्तकाला अधिक महत्त्व प्राप्त होते. अब्दुल सलाम झैफ याच्या पोरसवयात अफगाणिस्तानवर सोव्हिएत संघाचे हल्ले झाले आणि त्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तिथल्या राजकीय पक्षात फूट पडून 'पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान' या पक्षात फूट पडून 'खलक' हा गट सत्तेवर आला होता. त्या सरकारला सोव्हिएत महासंघाचा पाठींबा होता. मुजाहिद्दीनांनी सरकारविरुद्ध संघर्ष सुरू केला.  लहान वयात ते या चळवळीत उतरले. पुढे मुजाहिद्दीन गटांना यश मिळाले.सोव्हिएत महासंघाचे सैन्य माघारी गेले. अर्थात या काळात या चळवळीचे तालिबानी असे नामकरण झाले नव्हते. सोविएत संघ माघारी गेल्यानंतर मुजाहिद्दीन लोकांनी आपापल्या क्षेत्रात आपले वर्चस्व सुरू केले तसेच दुसऱ्याच्या वर्चस्वावर कुरघोडी करायला सुरुवात केली. यात आपल्याच लोकांची लुबाडणूक सुरू केली. आपल्याच लोकांनी आपल्याच जनतेचा छळ मांडल्याने उद्विग्न झालेल्या काही लोकांनी त्यांचा बिमोड करण्यासाठी पुन्हा शस्त्रे हातात घेतली आणि एक एक करत सगळ्यांचा बिमोड करून अफगाणिस्तानवर सत्ता आणली. पुढे ही संघटना तालिबानी म्हणून ओळखली जाऊ लागली. तालिबानी सत्ता काळात अब्दुल सलाम झैफ यांनी तालिबानी राजवटीत विविध प्रशासकीय पदांवर काम केले. देशात शांतता प्रस्थापित व्हावी आणि देश प्रगतीकडे जावा, असा दृष्टिकोन राजवटीचा असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. झैफ यांनी प्रशासकीय काळात अनेक सुधारणा केल्याचे सांगितले आहे. शेवटच्या काळात ते पाकिस्तानी वकीलातीमध्ये अफगाणिस्तानचे वकील म्हणून काम पाहिले आहे.तिथले पाकिस्तान सरकार कसे द्वितोंडी आहे आणि आयएसआयचे तिथल्या सरकारवर कसा वचक आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शेजारी राष्ट्रांना त्रास देणे ,अंतर्गत कलह निर्माण करणे आणि सरकार विरोधी संघटनांना रसद पुरवणे, प्रशिक्षण देणे हे ही कामे आयएसआय करत असल्याचे त्यांनी स्पष्ट मांडले आहे. मुस्लिम देशांचाही घात केला असून स्वार्थासाठी ते काहीही करायला आणि कुठल्याही थराला जायला कमी करत नाहीत, याचा अनुभव त्यांना आला आहे. स्वतः झैफ यांना या पाकिस्तानानेच अमेरिकेच्या स्वाधीन केले होते. यासाठी आयएसआयच्या वरिष्ठांनी मोठी 'डिल'केली होती, हे ते स्पष्टपणे पुस्तकात मांडतात. झैफ यांची तुरुंगात करण्यात आलेली रवानगी आणि तिथला छळ त्यांनी संपूर्ण जगाला कळावा म्हणून परखडपणे मांडला आहे. तुरुंगातील छळ माणुसकीला काळिमा फासणारे आहे, असेच वर्णन त्यांनी केले आहे. 

अफगाणिस्तान आणि अमेरिका यांच्यात वितुष्ट आणण्याचे काम पाकिस्तानने केल्याचा आरोप आहे. 'अल कायदा' मोरक्या ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तानात शरण होता आणि त्याला अमेरिकेकडे सोपवण्यात यावे असा तगादा अमेरिकेने अफगाणिस्तान सरकार म्हणजेच तालिबान सरकारकडे लावला होता. मात्र लादेन आरोपी असेल तर आमच्या कायद्यानुसार त्याच्यावर खटला चालवून आम्ही त्याला शिक्षा करू असे सरकारचे म्हणणे होते. परकीय शक्तीचा त्यांच्या देशात हस्तक्षेप त्यांना नको होता. अशातच अमेरिकेतील वर्ल्ड सेंटर वर हल्ला झाला आणि अफगाणिस्तान आणि अमेरिकेचे संबंध आणखीनच ताणले. अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने आपले विमानतळ, अन्य सोयी उपलब्ध करून देत अमेरिकेला देऊन मदत केली. अमेरिकेने तालिबानी सत्ता उलथवून लावली. लोकशाही प्रस्थापित करायला मदत केली. मात्र अमेरिकेने शांतता प्रस्थापित करण्याचे नाव सांगून लोकांचा छळ मांडला, लोकांवर अत्याचार केले असे सांगत देशाची दुर्दशा केल्याचे झैफ सांगतात. 

या पुस्तकात 2007 पर्यंतचे वर्णन आहे. झैफ सध्या तुरुंगातून सुटून काबूलमध्ये सामान्य जीवन जगत आहे. मात्र त्याला अजूनही अफगाणी लोकांचे देशावर राज्य हवे आणि ते आज ना उद्या येईल अशी त्याला आशा आहे. मात्र यासाठी देशातील सर्व विचारांच्या संघटना एकत्र यायला हव्यात असे वाटते. हे पुस्तक लिहून दहा वर्षे उलटून गेली आहेत. या काळात अफगाणिस्तान मध्ये सरकारी किंवा अन्य ठिकाणी महिला काम करत आहेत. सोव्हिएत संघाची सत्ता होती तेव्हा ही महिला स्त्रिया मुक्तपणे वावरत होत्या.मात्र नंतर तालिबानची सत्ता आल्यावर पुन्हा महिला घरात बसल्या. याबाबत अधिक स्पष्ट झैफने लिहिले नाही. तालिबानची भूमिका त्याने मांडली नाही. पुस्तकानंतर दहा वर्षांत अफगाणिस्तान किती बदलला याची मला फार कल्पना  नाही,पण आता अमेरिकेने त्यांचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी बोलावले आहे. लोकशाही चा पुरस्कार करणाऱ्या देशांनी याला विरोध दर्शविला आहे. अफगाणिस्तान पुन्हा कट्टर लोकांकडे जाईल आणि हा देश उद्वस्त होईल असे त्यांचे म्हणणे आहे. अलीकडेच अमेरिकेने आपला सैन्य माघारीचा निर्णय घेतानाच तिथे तालिबानी गटाने हल्ला केला. त्यामुळे सर्वांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या मदतीने प्रस्थापित झालेल्या सरकारला पुन्हा धक्के बसतील असे चित्र दिसत आहे. यात सामान्य जीवन जगणाऱ्या अब्दुल झैफची भूमिका मला कुतूहलाची वाटते. पुस्तक खूपच उत्कंठावर्धक आणि थरारक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment: