Tuesday, May 18, 2021

उडत्या कारचे स्वप्न दृष्टिक्षेपात


 हॉलीवूड अभिनेता रॉबिन विल्यम्सच्या 1997 मधील 'फ्लबर' चित्रपटात उडणाऱ्या कारचे एक दृश्य आहे. ट्रॅफिक जामला कंटाळलेल्या लोकांना अजूनही अशी कार स्वप्नवतच वाटते. सध्या अनेक कंपन्या उडणाऱ्या कारची निर्मिती करीत आहेत. जपानच्या स्कायड्राईव्ह कंपनीनेही एका व्यक्तीसाठी अशा उडत्या कारची निर्मिती केली आहे. या कारची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. कंपनीने या कारचा एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. मोटारसायकलसारख्या दिसणाऱ्या छोट्या कारने जमिनीपासून एक ते दोन मीटर उंचीवरून उड्डाण केल्याचे त्यामध्ये दिसते. हे वाहन एका निश्चित क्षेत्रात चार मिनिटे हवेत तरंगत राहिले. 'स्कायड्राईव्ह'च्या या प्रकल्पाचे प्रमुख तोमोहिरो फुकुजावा यांनी सांगितले की त्यांना 2023 पर्यंत अशा स्वरूपाच्या उडणाऱ्या कारचे उत्पादन सुरू होण्याची आशा आहे. अर्थात ही कार सुरक्षित बनवणे हे एक आव्हान आहे. 

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनीही उडती कार विकसित केल्याचे सांगितले जाते. ते गेल्या दहा वर्षांपासून एक गुप्त प्रकल्प वैयक्तीकरित्या राबवित आहेत म्हणे. 2010 पासून लॅरीने हा प्रकल्प सुरू केला आहे व त्यासाठी स्वतःच्या कमाईचे 670 कोटी रूपये आत्तापर्यंत खर्च केले आहेत. 'स्टार्टअप झी एरो' या नावाचा हा प्रकल्प आत्तापर्यंत लॅरी यांनी गुप्त ठेवला होता. या प्रकल्पात ट्रान्समिशन फ्लाईंग कार डेव्हलप केली जात आहे. टीएफएक्स एअरक्राफ्ट नावाच्या या कारमध्ये चार जणांची बसण्याची व्यवस्था आहे. ही कार कॉम्प्युटरने नियंत्रित करता येते. म्हणजे ऑपरेटर त्याच्या इच्छेनुसार यात अगोदरच टेक ऑफ, लँडींग व डेस्टीनेशन घालू शकणार आहे.

या हायब्रिड इलेक्ट्रीक फ्लाईंग कारला पंख आहेत व ते ट्विन इलेक्ट्रीक मोटर पॉडशी जोडलेले आहेत. हे पंख दुमडू शकतात व मोटरपॉडमुळे कारची बॅटरी चार्ज होऊ शकते. ही कार व्हर्टिकल व हॉरिझाँटल पोझिशन घेऊ शकते. तिचा कमाल वेग आहे ताशी 806 किमी. ही कार ऑटो लँडिग करू शकते तसेच यात ऑपरेटरला लँडींग रद्द करण्याची सुविधाही आहे. त्यात व्हीकलर पॅराशूट सिस्टीम आहे. इमर्जन्सी मध्ये ऑपरेटर ती अॅक्टीव्हेट करू शकतो. व समजा ऑपरेटरने ती कार्यान्वित केली नाही तरीही कार जवळच्या एअरपोर्टवर ऑटो लँडींग करू शकते, असे समजते.

    सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप कंपनीच्या  किटी हॉक यांनीही  'फ्लायर' ही उडती कार बनविली असून ही कार उडत असतानाचे व्हीडीओ प्रसारित  केला आहे.  एक्स्पर्ट सिमेरन मॉरिस यांनीही या फ्लाईंग कारची टेस्ट घेतली आहे. मॉरिस म्हणतात की, ही कार उडविताना मला फारच मजा वाटली. यापूर्वी मी खेळातले हेलिकॉप्टरही कधी उडविलेले नाही मात्र ही कार शिकण्यासाठी मला कांही तासच सराव करावा लागला.  मॉरिस यांच्याप्रमाणेच अन्य काही लोकांनीही ही कार उडविली.100 टक्के इलेक्ट्रीक पॉवरवरची ही कार हेलिकॉप्टरप्रमाणे व्हर्टिकल उडते व तशीच लँड करते. 

या तीन घटना पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की,उडती कार बनवण्यासाठी किती उत्सुकता आणि प्रयत्न चालले  आहेत हे लक्षात येते. जगभरात सध्या उडणारी कार बनवण्यासाठी शंभरपेक्षाही अधिक प्रकल्प सुरू आहेत. यापैकी काही मोजक्याच प्रकल्पांमध्ये एका व्यक्तीस अशा वाहनातून आकाशात नेऊन आणण्यात यश मिळालेले आहे. सध्या हे वाहन दहा मिनिटेच उडू शकते. मात्र, लवकरच त्याचा वेळ तीस मिनिटांपर्यंत वाढवला जाईल. चालकाशिवाय कार रस्त्यावर उतरवण्याचे काम गुगल आणि ऊबरने केले आहे. या कारची यशस्वी चाचणी झाली असली तरी अजूनही काही समस्या उभ्या राहिल्या आहेत. गुगलच्या  चालकाशिवायच्या कारने अपघात केल्याने या प्रकल्पाला काही प्रमाणात खीळ बसली आहे. त्यामुळे व्यावसायिकरित्या त्याचे उत्पादन सुरू झालेले नाही. मात्र ती वेळ फार लांब नाही, असे दिसते.

हेलिक्प्टर उडवणे आणि उतरवणे अजूनही सोयीस्कर झालेले नाही.त्यासाठी हेलिपेडची गरज लागते.कार तर भर रस्त्यावरून उडवायची आहे.हे काम अर्थातच मोठ्या जिकिरीचे आणि प्रचंड खर्चिक आहे.यात लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.उडत्या कारची निर्मिती ही जलद वाहनसेवेत येते.लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहचण्यासाठी आणि वाहतूक अडथळा टाळण्यासाठी त्याची निर्मिती असणार आहे. हवाई उड्डाणाचेही काही नियम आहेत.त्यात शिथिलता आणण्याची गरज आहे.गाडीचा वेग ,गाडीच्या हवेतल्या उड्डाणाची उंची,शिवाय त्याला इंधन कोणत्या प्रकारचे लागेल या गोष्टी स्पष्ट व्हाव्या लागणार आहेत. सध्या जॉय राईडसाठी उड्डाण कारची निर्मिती झाली आहे. कीटटी हॉक यांनी केलेल्या वाहनासाठी बॅटरीचा उपयोग करण्यात आला. सध्या त्याचा पाण्यावरून उड्डाणाचा प्रयत्न झाला आहे. रस्त्यावरची चाचणी अजून व्हायची आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

उडत्या कारची निर्मिती आणि चाचणी जसजशी यशस्वी होईल ,तसतसे त्याबाबतच्या वापराचे नियम प्रत्यक्षात येत राहतील. भारतात ही उडती कार यायला बराच कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत परदेशात कारच्या रस्त्यावरील आणि हवेतील वावराचे नियम स्पष्ट होत जातील.सध्या मानवरहित ड्रोनबाबत काही  कडक नियम आहेत.त्यामुळे उडत्या कारलादेखील वेगळ्या परवानगीची गरज भासणार आहे.म्हणजे उडती कार प्रत्यक्षात येण्यास अनेक अडचणी आहेत. त्याचा कार निर्मात्यांना सामना करावा लागणार आहे. मात्र निर्मितीचा वेग आणि प्रयत्न पाहता काही वर्षेच या कारची प्रतीक्षा करावी लागणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


2 comments:

  1. फ्लाईंग कारची निर्मिती करणारी डच कंपनी 'पीएएल-व्ही'ने जगातील पहिल्या उडणाऱ्या कारची
    एकदाची घोषणा केली. या फ्लाईंग कारचे नाव 'पीएएलव्ही लिबर्टी' असे ठेवण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे युरोपमध्ये या कारच्या रस्त्यावरील वापरास सरकारनेही परवानगी दिली आहे. यामुळे जगभरात फ्लाईंग कारचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना आता आकाशात उडणाऱ्या कारचे दर्शन होणार आहे.
    मात्र, या कारचा वापर सध्या कमर्शियल वाहन म्हणून
    करण्यात येणार आहे.
    'पीएएल-व्ही लिबर्टी'ने अत्यंत कडक असणाऱ्या युरोपियन चाचण्यांना पास केले आहे. यामुळेच
    आता या फ्लाईंग कारला अधिकृतपणे रस्त्यावर चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कारला हायस्पीड ब्रेक आणिध्वनी प्रदूषण रोखणाऱ्या चाचण्यांनाही सामोरे जावे लागले आहे. कंपनीने सर्वप्रथम २०१२ मध्ये कारच्या प्रोटोटाईपने हवेत उड्डाण केले होते. त्यानंतर सातत्याने या कारच्या चाचण्या घेण्यात येत होत्या.
    'पीएएल-व्ही लिबर्टी'ची कमर्शियल किंमत ३९९,००० डॉलर म्हणजे सुमारे २.५२ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, यामध्ये टॅक्सचा समावेश करण्यात आलेला नाही. टॅक्स लावल्यास या कारची किंमत आणखी वाढू शकते. या कारला युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीसह एव्हिएशन सर्टिफिकेट मिळावे म्हणून अर्ज पाठवण्यात आला आहे. यास २०२२ पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर फ्लाईंग कारच्या डिलेव्हरीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  2. स्वतःच्या मोटारीतून हवाई प्रवास करण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. अमेरिकेतील सॅमसन स्कायने तयार केलेल्या 'स्विचब्लेड' या वाहनाच्या (फ्लाइंग कार) चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे. जगातील पहिल्या उडणाऱ्या तीन चाकी स्पोर्ट्स मोटारीच्या (फ्लाइंग कार) चाचण्यांना अमेरिकेच्या 'फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन'कडून (एफएए) ही परवानगी मिळाली आहे. आता याच्या जमिनीवर सामान्य मोटारीप्रमाणे तर हवेत उड्डाण करूनही चाचण्या घेतल्या जातील. ही कंपनी गेल्या 14 वर्षांपासून या मोटारीवर संशोधन करत आहे. या चाचणीत यश मिळाले तर लगेचच ही फ्लाइंग कार विक्रीस उपलब्ध होणार आहे. जगभरातील दोन हजारांहून अधिक ग्राहकांनी यासाठी नोंदणी केली आहे. ही फ्लाइंग कार प्रतितास 322 किलोमीटर वेगाने उडू शकते. शिवाय जमिनीवरही सहजपणे चालविता येणार आहे. उडताना मोटारीचे पंख आणि शेपटीकडील भाग उघडता आणि मिटवता येणार आहे.
    सध्या तरी या मोटारीला 113 लिटरची इंधन टाकी उपलब्ध याद्वारे 724 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. जमिनीपासून हवेत मोटार 4 किलोमीटरपर्यंत उंची गाठू शकणार आहे.

    ReplyDelete