भाजपने पश्चिम बंगालमध्ये तीन आमदारांवरून सत्तर-पंच्याहत्तर आमदार निवडून आणले, याचे कौतुक का होत नाही, असे भाजपवाले म्हणत आहेत. कारण त्यांना ममता बॅनर्जी यांचा देशभरात चाललेला 'उदो उदो' झोंबत आहे. खरे तर भाजपचे पश्चिम बंगालमधील यश कौतुकास्पदच आहे,पण भाजपने कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करून आणि अन्य चार राज्यांची निवडणूक सोडून फक्त पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले, त्यामुळे संपूर्ण देशही पश्चिम बंगालकडे लक्ष देत राहिला. भाजपनेच बंगाल, मोदी आणि ममता असे चित्र संपूर्ण भारतभर निर्माण केले ,तेव्हा आता देशभर ममता जिंकल्यावर तसेच चित्र उभे राहणार ना! खरे तर करोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीस सामोरे जाताना भाजपच्या खात्यात अवघे तीन आमदार होते. त्यातच लोकसभेला 40 पैकी 18 जागा जिंकून जवळपास 40 टक्के मते मिळवल्याने भाजपला आकाश ठेंगणे वाटत होते. वंगभूमी आपण जिंकूच, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. गेली जवळपास तीन चार वर्षे त्या पक्षाने हा वंगप्रदेश उभाआडवा पिंजून काढला आणि मिळेल त्या मार्गाने ‘हिंदु तितुका मेळवावा’चा प्रयत्न केला. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने काय नाही केले? तृणमूल’च्या छावणीत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेल्या अनेकांना भाजपने आपल्या छावणीत ओढले. हे पक्षांतरांचे प्रमाण इतके होते की, शेवटी केवळ ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाचा इतकेच त्या पक्षात राहतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. या सर्व पक्षांतरी गणंगांस भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि कहर म्हणजे आपण त्या राज्यात ‘परिबोर्तन’ करू इच्छितो अशी लोणकढी मतदारांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. साम,दाम,दंड या भेदनीतीचा वारेमाप वापर झाला.
अवघ्या तीन आमदारांचा त्या पक्षाचा मुळाकार लक्षात घेता, तेथून पंचाहत्तरीच्या पुढे त्यांनी मारलेली झेप निश्चितच कौतुकास्पद. एरवी तशी ती ठरलीही असती. पण ‘अब की बार २०० पार’ अशी आचरट आणि आततायी घोषणा देऊन गृहमंत्री अमित शहा यांनी या निवडणुकीत भाजपच्या विजयाची लटकी हवा तयार केली नसती तर भाजपचे हे यश उल्लेखनीयच ठरले असते.
प्रत्यक्षात प्रचाराचे रणशिंग फुंकले गेल्यावर तर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर आपले बिऱ्हाड बाजलेच तेथे नेले होते. भाजपचे चाणक्य अमित शहाही दर दोन दिवसांनी बंगालमध्ये पायधूळ झाडत होते आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना काळात पाळावयाचे सारे संकेत धाब्यावर बसवून तेथे लाखालाखांच्या सभांचा धुमधडाका लावला होता.बंगाल्यांचे आदरस्थान असलेल्या कालीमातेकडे दुर्लक्ष करून ‘जय श्रीराम!’ अशा घोषणांनी बंगाल दुमदुमत ठेवण्याचे कामही भाजप कार्यकर्ते जोमाने करत होते आणि अनेक केंद्रीय नेत्यांबरोबरच काही माजी मुख्यमंत्रीही बंगालच्या चकरा मारत होते. पैसा तर पाण्यासारखा वाहत होता.
अगदी ‘दीदीऽ ओऽऽ दीदीऽ’ अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांची असभ्य खिल्लीदेखील भाजपने उडवून पाहिली.बंगालसोबतच तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीही निवडणुका झाल्या.यात विशेष म्हणजे बंगाल वगळता बाकीच्या राज्यांचे निकाल अपेक्षित लागले. मात्र बंगालचा निकाल तसा अनपेक्षितच लागला.कारण मतचाचण्या व एक्झिट पोलही ममतांच्या विरोधात भाकीत करत होते. ममतांनी तर आपला पारंपारिक मतदारसंघ सोडून नंदीग्राम या त्यांच्या दगा देणाऱ्या शुभेन्दु अधिकारी यांच्या जागेवर उमेदवारी जाहीर केली होती. भाजपने त्यांना खिंडीत गाठून पराभूत केले. पण बंगालमधील त्यांच्या पराक्रमासमोर भाजपला नंदीग्राम व अन्य ठिकाणी मिळालेले यश झाकोळले गेले. कारण भाजपनेच बाकीची राज्ये सोडून पश्चिम बंगालवरच लक्षकेंद्रित केले होते. बंगालमधील लोकांना ममतांची उडविलेली खिल्ली खटकली. तिथे प्रादेशिक अस्मिता तयार झाली. काही काँग्रेस आणि डाव्या पक्षांची मतेही ममतांच्या पारड्यात टाकली गेली.कारण आपली मते वाया जावू नयेत, असेच त्यांना वाटले असावे.
भाजपने अख्खे मंत्रिमंडळ, राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये नेवून निवडणुकीचे रान उठवले. ममतांच्या पक्षातील लोक भाजपने ओढून नेले तरीही ममतांनी एकट्याने खिंड लढवली आणि भाजपला चारी मुंड्या चित केले. ममता बॅनर्जी कडव्या भाजपच्या आव्हानाला उभ्या राहिल्यामुळे आता आपोआपच राष्ट्रीय पातळीवर त्यांचे नेतृत्व समोर आले आहे. येत्या कालावधीत नरेंद्र मोदी यांच्यासमोर नेता म्हणून आव्हान उभे करण्यासाठी इतर सर्व राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जी यांचा विचार केल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण आता तशी चर्चा रंगू लागली आहे.
देशाचा विचार करता आता एका अर्थाने खेळ संपलेला नसून आता ‘भारतेर खेला आरंभ!’ म्हणजेच देशपातळीवर आता नवा राजकीय खेळ सुरू होऊ शकतो, असेच सूतोवाच या निकालांनी केले आहे. राज्याराज्यांतील भाजपविरोधकांना ‘तृणमूल’चे हे यश नवी आशा देऊन जाणारे आहे. त्यामुळेच त्याचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटणार, यात शंकाच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या विजयाबद्दल दीदींचे अभिनंदन करताच, राष्ट्रीय पातळीवर त्यांच्यासोबत काम करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेबरोबरच राज ठाकरे यांनीदेखील ममतांचे अभिनंदन केले आहे. बिहारमधील अखिलेश यादव यांनी ममतांच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. यावरून भाजप विरोधात देशभरात एक मोठी मोट बांधली जाण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेस देखील कदाचित यात उडी घेऊ शकते. कारण फारच कमी अस्तित्व राहिलेल्या काँग्रेसला भरारी घ्यायची असेल तर यात सामील होण्याशिवाय पर्याय नाही.सध्या बंगालमध्येही काँग्रेसचे काही राहिलेले नाही. वास्तविक भाजपविरोधात देशपातळीवर नवे नेपथ्य उभे करताना, ममतांशिवाय विरोधी पक्षांना एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही, हाच या निकालाचा अन्वयार्थ आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment