भारतासाठी अभिमानाचा क्षण जवळ आला आहे, कारण भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी स्पेसएक्स-नासा सहयोगी क्रू -3 मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. हे यान महिन्याच्या अखेरीस चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) नेण्याची तयारी करत आहे. या मिशनमध्ये राजा चारी, टॉम मार्शबर्न आणि कायला बॅरॉन यांच्या व्यतिरिक्त युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रवासी मॅथियस मॉरर देखील स्पेस स्टेशनला भेट देणार आहेत.
ठरलेल्या वेळापत्रकानुसार चार अंतराळवीर 31 ऑक्टोबर रोजी फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून अंतराळ प्रवासाला निघणार आहेत. अंतराळवीर म्हणून राजा चारीचे महत्त्व यावरून समजले जाऊ शकते की ते या मोहिमेचे नेतृत्व करतील. मोहिमेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी तो जबाबदार असतील. भारतीय वडील श्रीनिवास चारी हे तेलंगणातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते आणि राजा चारी यांचा जन्म तेथे झाला. ते अमेरिकन हवाई दलाचे पायलट आहेत. त्यांची 2017 मध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाली. आता त्यांची गुणवत्तेच्या आधारावर नवीनतम अंतराळ मोहिमेचे कमांडर म्हणून निवड झाली आहे.
मिलवॉकीमध्ये जन्मलेले राजा चारी यांचे हे पहिलेच अंतराळ उड्डाण आहे. यूएस हवाई दलातील कर्नल राजा चारी यांना 2 हजार 500 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. खरंच आता जगाचे डोळे 31 ऑक्टोबरच्या उड्डाणाकडे असतील. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गेल्या 15 सप्टेंबर रोजी चार नागरिकांची एक टीम अंतराळ प्रवासाला गेली आणि तीदेखील जगाने अत्यंत काळजीपूर्वक पाहिली. डिसेंबर 2020 मध्ये अंतराळवीर म्हणून दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर, चारींची निवड आर्टेमिस टीम, अंतराळवीरांचा एक उच्चभ्रू गट म्हणून केली गेली. ही मोहीम म्हणजे 2024 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्यासाठी पहिली महिला आणि पुढील पुरुष पाठवण्यापूर्वीची तयारी आहे. त्यामुळेच राजा चारी यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जाते.
असे सांगितले जाते की नासाला खूप वर्षांनी असा अंतराळवीर मिळाला आहे. 44 वर्षीय चारी अमेरिकेच्या इराक मोहिमेचा एक भाग होते आणि ते एक सन्मानित लष्करी अधिकारी आहेत. त्यांना पुढील सहा महिने त्यांच्या क्रूसोबत स्पेस स्टेशनवर घालवायचे आहेत आणि पुढील मिशन-संबंधित संशोधनाकडे जायचे आहे.
आजकाल स्पेस स्टेशनवर अनेक प्रकारचे प्रयोग चालू आहेत. अंतराळवीरांना अंतराळात राहण्याची सवय करण्याबरोबरच नासा आपल्या अंतराळ केंद्रामध्ये अंतराळवीरांचे प्रशिक्षण देखील सतत विकसित करत आहे. पुढील दिवसांमध्ये मंगळ किंवा चंद्राच्या मोहिमेसाठी अधिक कुशल अंतराळवीरांची आवश्यकता असणार आहे. ही त्याची पहिली पायरी म्हणावी लागेल.
राजा चारी यांचे आतापर्यंतचे यश नेत्रदीपक आणि कौतुकास्पद आहे आणि आता जर त्यांनी आपली क्षमता सिद्ध करणे सुरूच ठेवले तर चंद्र किंवा मंगळावरील मोहिमांसाठी त्याची निवड देखील शक्य आहे. राजा चारी यांच्या बरोबरच भारतीय वंशाच्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, भारतीय राकेश शर्मा आणि सर्वात अलीकडच्या भारतीय-अमेरिकन शिरीषा बांदला यांना अंतराळ प्रवासाचा बहुमान मिळाला आहे. राजा चारी हे पाचवे भारतीय वंशाचे अंतराळवीर असणार आहेत. त्यामुळे त्यांचे यश भारतीय शास्त्रज्ञ आणि अंतराळवीरांना देखील प्रेरणा ठरेल. आता भारतानेही आपल्या अंतराळ विज्ञानाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपण नजीकच्या भविष्यात मानवयुक्त मोहिमेला अंतराळात पाठविण्यास सक्षम असायला हवे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment