Sunday, October 24, 2021

राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे


सध्या असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांच्या कर्तृत्वाची नोंद होत नाही.  पुरुष जे काही करू शकतात, ते स्त्रियादेखील उत्तमप्रकारे करू शकतात. त्या काकणभरही मागे नाहीत. अन्य क्षेत्रासह  राजकारणातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परंतु स्त्रिया निवडणुकीत भाग घेतात, पण जिंकल्यानंतर त्यांचे पती किंवा पुत्र पुढे पुढे करत असतात. जिंकून आलेल्या महिलांना त्यांचे स्वतःचे काम घरातले लोक करू देत नाहीत. सर्व प्रकरणे तेच निकालात काढतात. असे चित्र सर्वत्र सारखेच आहे.  ही परिस्थिती बदलायला हवी आहे.  महिलांना स्वतःची कामे स्वतः करण्याची संधी मिळायला हवी,  तरच भारतीय राजकारणात महिलांचे स्थान भक्कम होऊ शकेल.

विविध राजकीय पक्षांमध्ये सक्रिय असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.  बहुतेक महिलांना निवडणुकीत तिकीटही त्यांच्या कुटुंबामुळेच मिळते.  राजकारणातील महिलांचा प्रभाव वाढवण्यासाठी सर्वप्रथम त्यांना विद्यार्थी राजकारणात पुढे आणायला हवे. म्हणजेच राजकारणाविषयीचे प्रशिक्षण मिळायला हवे. महिलांना केवळ पदांची गरज नाही, तर त्यांना राजकीय अनुभवही मिळाला पाहिजे. असे मानले जाते की जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, पूजा केली जाते तिथे देवता 'वास' करतात.  महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.  राजकारणातही महिला सक्रिय आहेत.  त्यांना प्रेरणा, आदर आणि स्वातंत्र्यासह काम करण्याची मोकळीक देण्याची आवश्यकता आहे.

महिला स्वतः पुढे यायला हव्यात

 राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना स्वतः पुढे येऊन आपली पात्रता सिद्ध करावी लागेल.  प्रारंभी महिलांनी स्थानिक लोकहिताच्या प्रश्नावर आवाज उठवून समाजात आपला ठसा उमटवला पाहिजे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट घेऊन आपला उमेदवारी दाखवून दिली पाहिजे. अशा प्रकारे ती आपल्या क्षमतेच्या जोरावर जिंकून संसदपर्यंत पोहोचू शकेल.  राजकीय पक्षांनी पात्र महिलांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे महिलांसाठी आरक्षणाचे विधेयक जे लोकसभेत प्रलंबित आहे ते त्वरीत मंजूर झाले पाहिजे.महिलांच्या राजकारणात सक्रिय सहभागासाठी महिला आरक्षणासंबंधीचे प्रलंबित विधेयक मंजूर करावे.  पुरुषांनी त्यांचे जुने विचार बदलले पाहिजेत आणि स्त्रियांना राजकारणात पुरेशा संधी दिल्या पाहिजेत.

महिलकानीं जागरूक व्हावे

 महिलांनी स्वाभिमानाने जगले पाहिजे.  त्यांना पुरुषांवरील अवलंबित्व सोडावे लागेल. आता राजकारणातच नव्हे तर सर्वत्र स्त्री आणि पुरुषांना दोघांना समान दर्जा असल्याने त्यांना राजकारणातही समान  संधी मिळायला हवी. महिलांनीही याचे भान  ठेवायला हवे.आणि आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. खरे तर महिला प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत.  जर महिलांना राजकारणात अधिकाधिक संधी दिल्या गेल्या, तर नक्कीच त्या राजकारणातही यशस्वी होतील.  इंदिरा गांधी हे त्याचे जिवंत उदाहरण होते.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे वर्णन दुर्गेचा अवतार असे केले होते.

 महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पंचायत किंवा शहरी स्तरावर महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.  समस्या अशी आहे की स्त्रिया पदावर विराजमान  आहेत, परंतु काम त्यांच्या पतींकडून केले जाते.  केवळ पदावर असणे पुरेसे नाही.  महिलांनी स्वतः सक्रिय व्हायला हवे. अलीकडेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वडेरा यांनी उत्तर प्रदेशातील  40 टक्के तिकिटे महिलांना देण्याची घोषणा केली आहे.  यूपीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्व पक्ष त्याचा पाठपुरावा करतील.  जर हा प्रयोग तिथे अपयशी ठरला, तर कोणताही पक्ष कधीही अशी आत्मघातकी पावले उचलणार नाही.  आपल्या देशात असे सर्व निर्णय राजकीय लाभ लक्षात घेऊन घेतले जातात. महिलांना प्रत्येक क्षेत्रात 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे.  राजकारण आणि इतर वैविध्यपूर्ण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे खूप महत्वाचे आहे.  सर्वत्र महिला शक्ती केंद्राची स्थापना झाली पाहिजे.  शिक्षणाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.आता महिलांनीच महिलांसाठी आवाज उठवला पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment