Monday, October 18, 2021

द्वेष कोठून येतो?


उपनिषदांमध्ये गुरु-शिष्याची प्रसिद्ध प्रार्थना आहे.  गुरु म्हणतात- 'आपण एकत्र राहूया.  एकत्र भोजन करूया.  एकत्रित कार्य करूया आणि आपण एकमेकांचा हेवा करू नये. ' गुरु तर चांगला पोहचलेला आहे, पण तो शिष्याला दीक्षा देताना म्हणतो की आपण एकमेकांबद्दल द्वेष करू नये. पण माणसे जितके जवळ येतात तितका द्वेष अधिक वाढत जातो.  माणसातील हा तिरस्कार,द्वेष  कुठून येतो?  त्याची मुळे इतकी खोलवर रुजली आहेत की जर तुम्ही हजारो वर्षांपूर्वीची शास्त्रे पाहिलीत तरी तुम्हाला त्यात द्वेषाचे रोग आणि त्याचे उपाय दिसतील.  बुद्ध यांनी म्हटले आहे की मनुष्यामध्ये द्वेष हा झाडामधून बाहेर पडणाऱ्या रसासारखा आहे.  तो पडत राहतो.  द्वेष ही एक विषारी वेल आहे, जी हृदयाच्या खोलवर वाढते.  जोपर्यंत ही धोकादायक वेल उपटून फेकून दिली जात नाही तोपर्यंत ध्यान पूर्ण होत नाही.

द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

आधुनिक न्यूरोसायन्सच्या मते, हे स्वसंरक्षणाचा एक उपाय आहे.  गुंफांमध्ये राहणारे आदिम मानव इतरांवर शंका घेऊन ,लढा देऊन स्वतःचे रक्षण करायचे.  लाखो वर्षांमध्ये मेंदूच्या तंतूंना याची सवय झाली.  तेच तंतू शरीरावर परिणाम करतात.  मेंदूचे एक केंद्र आहे, जे राग, तणाव, द्वेष यासारख्या भावना जागृत करते.  जेव्हा माणूस सुसंस्कृत झाला, तेव्हा त्यात भावना आणि बुद्धिमत्ता जोडली गेली आणि द्वेष हिंसक झाला.  खरं तर, आपण मी आणि तूमध्ये जगाची विभागणी करत राहतो.  यासाठी बांधलेली भिंत द्वेषातून बांधली गेली आहे.  म्हणूनच ओशो म्हणतात की आत्म-अज्ञान हिंसा आहे.  जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही हिंसा आणि द्वेषातून मुक्त होऊ शकत नाही.  जेव्हा अहंकाराचे बीज गळून पडते तेव्हा लक्षात येते की आपण सर्व एकाच महासागराच्या लाटा आहोत.  मग कसला द्वेष ? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

No comments:

Post a Comment