Monday, July 10, 2023

कापड उद्योग, पर्यावरण आणि प्रदूषण

बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारसरणीचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झाला आहे.यामुळे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, परंतु बदलत्या फॅशनच्या मागणीने पर्यावरणाच्या समस्यांसह त्या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. एका संशोधनानुसार, हवामान बदलामध्ये फॅशन इंडस्ट्रीचा १० टक्के वाटा आहे. भूजलासाठी हा सर्वात मोठा धोका आहे. खरं तर, कापड बनवणाऱ्या कंपन्या भूजलाचा सर्वाधिक शोषण करतात. उदाहरणार्थ, बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे. आकडेवारीनुसार, बांगलादेशातील वस्त्रोद्योग दरवर्षी पृथ्वीवरून 1,500 अब्ज लिटर पाण्याचा उपसा करतात. विशेष म्हणजे एक किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जाते.

तसेच एक किलो सुती कापड धुण्यासाठी व रंगविण्यासाठी 200 लिटर पाणी वापरले जाते. यामुळे बांगलादेशातील भूजल पातळी सातत्याने खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढे पाणी वाया जाते, ते पिण्यासाठी वापरले तर सुमारे दोन कोटी लोकांना दहा महिने पिण्याचे पाणी मिळू शकते. फॅशनमुळे पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन आणि कचऱ्याची समस्या वाढत आहे. विशेष म्हणजे वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यांसारखे कृत्रिम तंतू, जे कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, शतकानुशतके विघटित होत नाहीत. म्हणजे फाटत- कुजत नाहीत. 

पर्यावरण सुधारणेसाठी हे एक गंभीर आव्हान बनले आहे.त्याचप्रमाणे, रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेले फॅब्रिक, जंगलतोड वाढवते आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात जे कमी दर्जाचे असतात आणि लोक  वापरून ते लवकर टाकून देतात. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आधीच वाढली असली तरी, अशा प्रकारचे कपडे ही जागतिक कचरा समस्या बनली आहे, ज्यामुळे टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या मजुरांसाठी चांगली कामाची परिस्थिती, कापडाचा दर्जा आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी यामुळे अशा कपड्यांची मागणी वाढेल.

विशेष म्हणजे, भारतीय कापड उद्योग कुशल कारागिरांसाठी ओळखला जातो, ज्यात भरतकाम आणि अलंकार यांचा समावेश होतो. पण पर्यावरणासाठी समस्या निर्माण करणारे उद्योग पर्यावरणपूरक कसे बनवायचे, हा विचार करण्याचा विषय आहे. कपड्यांचा जो ब्रँड भारतात चालतो, तो बाजारावर अशाप्रकारे वर्चस्व गाजवतो की, ते खरेदी करताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे का, याचा विचार कोणी करत नाही.त्याऐवजी लोकांना पर्यावरणपूरक ब्रँड्सच्या शाश्वत कपड्यांमध्ये रस वाढला, तर वस्त्रोद्योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही. 

ब्रिटन, अमेरिका, स्वीडन आणि फिनलंडमधील फॅशन इंडस्ट्री किंवा टेक्सटाइल इंडस्ट्रीच्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, फॅशनचा पर्यावरणासह त्या सर्व क्षेत्रांवर प्रभाव पडतो, ज्याचा पृथ्वी आणि प्राणी यांच्यात खोल संबंध आहे. अभ्यासानुसार, कापड आणि फॅशन उद्योगाची पुरवठा साखळी मोठी आहे, जी कृषी आणि फायबर उत्पादनापासून पुरवठा, उत्पादन आणि किरकोळ विक्रीपर्यंत विस्तारते. संशोधकांना असे आढळून आले आहे की कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड प्रमाणात पाणी, रसायने आणि ऊर्जा वापरली जाते. याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो. संशोधनानुसार, जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10 टक्के आहे, जो 2030 पर्यंत सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे. फॅशन उद्योग 9.2 कोटी टन कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो.विशेष म्हणजे, जगातील सर्वच देशांमध्ये, जिथे जिथे फॅशन आणि कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथे पर्यावरण प्रदूषण आणि पाण्याची टंचाई इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. 

आता फॅशनच्या कपड्यांची निर्मिती वेगाने होत आहे. जिथे रोज नवनवीन प्रकारचे कपडे बाजारात येत आहेत, तेही स्वस्तात मिळतात. गेल्या वीस वर्षांत नवनवीन फॅशनकडे लोकांचा कल प्रचंड प्रमाणात वाढला आहे. पूर्वी जिथे लोक कोणत्याही सण किंवा लग्न समारंभाच्या निमित्ताने कपड्यांची खरेदी करायचे, तिथे आता दर तिसऱ्या-चौथ्या महिन्याला नवीन फॅशनचे कपडे खरेदी करायला सुरुवात केली आहे. यामुळेच स्वस्त असूनही वस्त्रोद्योग तोट्यात राहत नाही. कपडे उद्योग, विशेषत: फॅशन इंडस्ट्रीमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होण्यामागे इतर कारणे आहेत, ज्यांची फारशी दखल कोणी घेत नाही. एक रंजक आकडेवारी समोर आली आहे.  त्यांच्या मते, गेल्या पंधरा वर्षांत फॅशन उद्योग दुप्पट दराने वाढला आहे, परंतु खरेदी केलेले कपडे फेकून देण्याआधी परिधान करण्याच्या वेळेत चाळीस टक्के घट झाली आहे.

सांख्यिकी दर्शविते की वापरलेले कपडे नंतर फेकले जातात किंवा जाळले जातात. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणांमध्ये, पर्यावरणावर परिणाम होतो. जमिनीत पुरणे आणि पुनर्वापरासाठी फक्त बारा टक्के वापर केला जातो. एका सर्वेक्षणानुसार, शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये फॅशनची आवड खूपच कमी आहे. त्यामुळे शहरांमध्ये पर्यावरणाची समस्या सातत्याने वाढत आहे. 'स्टायलिश' दिसण्याचा ट्रेंड जणू व्यसनच होत चालला आहे. याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, शहरांतील स्त्रिया मोठ्या पिशव्या घेऊन जाणे पसंत करतात जेणेकरुन त्या अधिक सामान घेऊन जाऊ शकतील. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. डॉक्टरांच्या मते, यामुळे पाठ आणि मान दुखण्याच्या समस्यांए वाढू शकतात. एका संशोधनानुसार, टाईट शर्ट कॉलर आणि टाय घातल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे इतर समस्या निर्माण होऊ शकतात तसेच डोळ्यांच्या समस्याही उद्भवू शकतात.पेन्सिल स्कर्ट घातल्याने पाय जड होऊ शकतात.  अशाप्रकारे, फॅशन अशा अनेक समस्या वाढवत आहे, ज्यामुळे जीवनाचा वेग मंदावतो किंवा आपल्याला आजारी पाडतो.

सध्याचे फॅशन ट्रेंड जीवनशैलीच्या नावाखाली न्याय्य असू शकतात, परंतु फॅशन उद्योगाच्या दीर्घकालीन यशासाठी अशा कसरती चांगल्या नाहीत.विशेष म्हणजे भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये वापरा आणि फेकण्याच्या विचारसरणीमुळे लोकांमध्ये दिखाऊपणाची सवय आणि पर्यावरणाबाबत निष्काळजीपणा वाढला आहे. शहरांमधील असंवेदनशीलतेमुळे आजूबाजूला घडणाऱ्या गंभीर घटनांच्याबाबतीतही लोक बेफिकीर राहतात. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या वाढल्या असतानाच हिंसक कारवाया आणि विविध प्रकारच्या दंगलींमध्येही वाढ झाली आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.  भारतासह जगातील सर्वच देशांमध्ये पर्यावरणाचे प्रदूषण आणि इतर अनेक समस्या पाहता फॅशनच्या नावाखाली वस्तू गोळा करण्याची सवय आणि वापरा आणि फेकण्याची सवय बदलण्याची गरज आहे. स्वत:चे, समाजाचे आणि निसर्गाचे नुकसान करून फॅशन करण्यात कुठले शहाणपण आहे? -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment