Sunday, November 26, 2023

प्रदूषण प्रतिबंध दिन (2 डिसेंबर): नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे पर्यावरण संतुलन राखण्यात यश


जगात अशी काही शहरं आहेत, ज्यांनी आपल्या शहरांमधून विकास आणि हिरवळ यांच्यात संतुलन साधलं आहे. साहजिकच इथले नागरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाभ तर घेत आहेतच शिवाय ते उत्साहीदेखील आहेत. वास्तविक पर्यावरणाबाबतचे अलीकडचे चित्र भयानक आहे. विकासाच्या नावाखाली बांधलेल्या काँक्रीटच्या जंगलात हिरवाई नष्ट होत आहे. अशा परिस्थितीत या शहरांचे अनुकरण महत्त्वाचे आहे. रेझोनान्स कन्सल्टन्सीने जगातील अशा २१ पर्यावरणपूरक शहरांची यादी तयार केली आहे, जिथे विकास आणि हिरवाईचा समतोल तर आहेच, पण हवेची गुणवत्ता सुधारण्यासोबतच त्यांनी पाण्याचा विवेकपूर्ण वापर, स्वच्छता आदींवर अधिक चांगले काम केले आहे. कचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले आहे.

अॅमस्टरडॅम, नेदरलँड्स - येथे पर्यावरण अनुकूल संस्कृती स्वीकारली गेली आहे. वाढता शाकाहार, प्लॅस्टिकचा मर्यादित वापर, कार्बन उत्सर्जनात घट आणि हिरवळ यामुळे हवा स्वच्छ आणि पर्यावरण ताजेतवाने वाटते. अॅमस्टरडॅममध्ये सायकल हे वाहतुकीचे मुख्य साधन आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 55 टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

व्हिएन्ना: ऑस्ट्रिया- संगीताचे शहर म्हणून ओळखले जात असलेले आणि  मोझार्ट, बीथोव्हेन या नामवंत संगीतकार आणि मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रायड यांचे शहर  व्हिएन्ना केवळ समृद्ध संस्कृतीसाठीच नाही तर हिरवाईसाठी देखील ओळखले जाते. या शहराचे  नियोजन उत्कृष्ट असून लोकवस्त्यांमध्येही उद्यानांना योग्य जागा देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था येथे अधिक वापरली जाते. माउंट कॅलेनबर्ग येथे भव्य द्राक्षमळे आहेत.

सिंगापूर- सिंगापूरचा उल्लेख आशियातील सर्वात हिरव्यागार देशांमध्ये होतो. 2008 पासून ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. म्हणूनच सिंगापूरमध्ये रूफटॉप गार्डन्स सामान्य आहेत. येथे, न्यूयॉर्कच्या हायलाइनप्रमाणे, जुन्या रेल्वेमार्गाचे रूपांतर 15 मैलांच्या ग्रीनवेमध्ये करण्यात आले आहे. शहरातील अनेक उद्यानांचे विशेषत: वृद्धांसाठी उपचारात्मक उद्यानात रूपांतर करण्यात आले आहे.

सॅन फ्रान्सिस्को - सॅन फ्रान्सिस्कोने अनेक वर्षांपासून 'ईट लोकल फूड' मोहीम चालवली जात आहे. 2016 पासून  शहरातील दहा किंवा त्याहून अधिक मजल्यांच्या इमारतींमध्ये सोलर पॅनल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरात एकेरी वापर आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

बर्लिन, जर्मनी –इव्ही ( EV) चा प्रचार करण्यासाठी शहरात 400 हून अधिक चार्जिंग स्टेशन आहेत. शहरात जवळपास सर्वत्र सायकलींसाठी लेन आहेत, त्यामुळे लोक वाहनांचा वापर कमी करतात. सौरऊर्जा आणि पुनर्वापर प्रणाली चांगली आहे. पाण्याचा अपव्यय कमीत कमी आहे.

वॉशिंग्टन डीसी- येथील खाद्यसंस्कृतीही पर्यावरणपूरक आहे. येथे अनेक ठिकाणी  शेतकरी बाजार आहेत, जेथे स्थानिक फळे आणि भाजीपाला प्रामुख्याने खरेदी केला जातो. याशिवाय रॉक क्रीकसारखी मोठी उद्याने येथील जीवन सुखकर करतात.

क्युरिटिबा, ब्राझील - क्युरिटिबाचे शहरी शासन 1970 पासून हरित धोरणांचा पाठपुरावा करत आहे. येथील लोकांनी महामार्गालगत 15 लाख झाडे लावली आहेत. 2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या क्युरिटिबाची गणना दक्षिण अमेरिकेतील हिरव्यागार शहरांमध्ये केली जाते.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment