Wednesday, November 8, 2023

रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री बनली धोकादायक


कुत्रा हा सर्वात निष्ठावान प्राणी आहे असे म्हटले जाते.  अनेक शतकांपासून घरांच्या राखणीसाठी कुत्रे पाळण्याची परंपरा आहे.  मात्र आजकाल कुत्र्यांच्या वागण्यात झालेला बदल आश्चर्यकारक आहे.  देशात दरवर्षी सुमारे वीस हजार लोकांचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू होतो.  आकडेवारीनुसार, दरवर्षी देशातील विविध राज्यातील सुमारे 77 लाख लोकांना कुत्रा चावण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे.यामध्ये रस्त्यावरील कुत्र्यांनी चावा घेतल्याची संख्या सर्वाधिक आहे.  नुकतेच वाघ बकरी चहाच्या मालकाचा भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली.  ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता पाठीमागून भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.  त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते पळत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले.  त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.गेल्या काही वर्षात कुत्र्यांचे पालनपोषण आणि निवासी भागात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या असंख्य घटना घडल्या आहेत.  पण याबाबतीत आपला समाज दोन वर्गात विभागलेला दिसतो.  एक विभाग प्राण्यांच्या हक्कांबद्दल बोलतो, तर दुसरा भाग कठोर कायदे बनवण्याचे समर्थन करतो.

 काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका निष्पाप मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.  असं असलं तरी ग्रामीण भागात अशा घटनांकडे फारसे लक्ष दिले जात नाही.  मुलाने कुत्रा चावल्याची माहिती घरी दिली नाही.  काही दिवसांनी मुलाला त्रास होऊ लागला आणि त्याचे वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले.  मात्र डॉक्टरांनी मुलाला आणण्यास उशीर झाल्याचे सांगत मुलावर उपचार करण्यास नकार दिला. मुलामध्ये रेबीजचे जंतू तयार झाले होते.  यातून आपल्या समाजाची निष्क्रियता दिसून येते, इथे हजारो लोक अनैसर्गिकपणे मरण पावतात, पण सरकार आणि समाज त्याला सामोरे जाण्यासाठी सतर्क होताना दिसत नाही.  आपण आणि आपला समाज अशा गोष्टींवर मूग गिळून बसतो. विशेषत: भटक्या कुत्र्यांनी चावण्याच्या अलीकडच्या घटनांबाबत सरकार आणि समाजाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करते.  भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी सरकारकडून भरघोस बजेट ठेवण्यात आले आहे.  स्थानिक स्वराज संस्थादेखील यावर बरेच खर्च दाखवाते, मात्र प्रश्न जैसे थे असल्याचे दिसून येते.  जगाच्या आकडेवारीनुसार कुत्रा चावल्यामुळे सर्वाधिक मृत्यू आपल्या देशातच होतात.  जागतिक स्तरावर कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात रेबीजमुळे होतात.  आणि बहुतांश प्रकरणांची नोंदच होत नाही, हेही चिंताजनक आहे. 

पशुधनाच्या सरकारी आकडेवारीनुसार चार वर्षांपूर्वीपर्यंत देशात 1 कोटी 93 लाख भटकी कुत्री होती.  एकट्या उत्तर प्रदेशात त्यांची संख्या 20 लाख 60 हजार एवढी होती.  सध्या देशात त्यांची एकूण संख्या सुमारे सहा कोटींवर पोहोचली आहे.  त्यांची संख्या ज्या प्रकारे वाढत आहे, ते भविष्यातील गंभीर आव्हान दर्शवते. एकट्या मुंबईत 2014 च्या गणनेनुसार 95 हजार 174 भटके कुत्रे असले, तरीही आता या संख्येत मोठी वाढ झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अद्याप भटक्या कुत्र्यांची गणना झालेली नाही. आणखी एका अहवालानुसार, गेल्या वर्षी सुमारे 14.5 लाख लोकांना कुत्र्यांनी गंभीरपणे चावा घेतला होता.  2021 मध्ये हा आकडा फक्त सात लाख होता.  आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, 10 सप्टेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टानेही भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  कुत्रा चावल्याने रेबीज होतो हे सर्वांनाच माहिती आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज लसीकरणाची व्यवस्था केली जाते.  मात्र सध्या सरकारी रुग्णालयांची अवस्थाही बिकट आहे.  रेबीजची लस उपलब्ध नसल्याचेच अधिक प्रमाणात ऐकायला मिळते. ही भटकी कुत्री निरागस मुलांना सहज आपली शिकार बनवतात.  लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देशात सर्वाधिक 72.77 लाख कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या होत्या, 

विशेष म्हणजे, भारतात दरवर्षी सुमारे दोन कोटी लोकांना विविध जनावरांच्या चावण्याच्या घटना घडतात..  यापैकी 92 टक्के प्रकरणे केवळ कुत्र्याने चावल्याची आहेत.  तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) जगात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. तसे पाहिले तर दर महिन्याला अठरा हजार ते वीस हजार लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो.  मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी बहुतांश निष्पाप मुले आहेत.  आकडेवारीनुसार, तीस ते साठ टक्के प्रकरणांमध्ये पीडितांचे वय पंधरा वर्षांपेक्षा कमी आहे.  1960 मध्ये, 'प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध' (PCA) कायदा संमत करण्यात आला, ज्याचा उद्देश प्राण्यांवरील क्रूरता थांबवणे हा होता.'ह्युमन फाऊंडेशन फॉर पीपल अँड अॅनिमल्स'च्या अध्यक्षांच्या मते, पीसीए आणि राज्यातील महापालिका कायद्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांना हटवण्याची तरतूद केली गेली होती.या अंतर्गत कायद्यात एक बोर्ड तयार करण्यात आला होता, ज्याचे काम 'स्थानिक अधिकारी आवश्यक त्या ठिकाणी अनावश्यक जनावरे नष्ट करणे' याची खात्री करणे हे होते. परंतु 2001 मध्ये हळूहळू भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने 'अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल' तयार केले. '. नियम' (ABC), जे भटक्या कुत्र्यांचे नसबंदी आणि लसीकरण प्रदान करते. कुत्र्यांच्या कल्याणाची जबाबदारी व्यक्ती, प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु वरील नियमांमुळे कुत्रे अधिक धोकादायक बनले आहेत, असाही एक मत या विषयावर समोर आला आहे.  मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या सीईओचेही मत आहे की कुत्रा चावणे ही गंभीर समस्या बनली आहे. ते म्हणतात की, 'अशा घटना घडू नयेत, अशी सर्वांचीच इच्छा आहे, पण हे खूप खेदजनक आहे.'  आज असे एकही राज्य उरले नाही जिथे भटक्या प्राण्यांनी दहशत निर्माण केली नाही. तसे पाहिल्यास, प्राणी जन्म नियंत्रण (ABC) कार्यक्रमाची अंमलबजावणी न होणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होताना दिसत नाही हे खरे आहे.  आपल्या देशात प्राण्यांना मारणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते, त्यामुळे कुत्र्यांना मारण्याचा पर्यायही विचारात घेता येत नाही, कारण सुसंस्कृत समाजात हे अत्यंत क्रूर कृत्य असेल.  त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी हाच पर्याय आहे. 

तज्ज्ञांच्या मते, यासाठी 70 टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी करावी लागणार आहे.  हे एक अतिशय कठीण लक्ष्य आहे.  कुत्र्यांसाठी निवारागृहेही बांधली जाऊ शकतात, त्यासाठी सरकारला वेगळे बजेट ठेवावे लागेल.  वेळीच कायमस्वरूपी पावले उचलली जात नसल्यामुळे अनैसर्गिक मृत्यूमुळे राज्यघटनेने हमी दिलेल्या लोकांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


No comments:

Post a Comment