देशात अवयवदानाबाबत जागरूकता वाढली आहे. असे असूनही, विकसित देशांच्या तुलनेत देशात अवयवदानाचे प्रमाण खूपच कमी आहे. एका दशकाहून अधिक काळ, भारतात अवयव दानाचे प्रमाण प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एक दात्यापेक्षा कमी आहे, तर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांमध्ये हेच प्रमाण दर दहा लाख लोकसंख्येमागे 40 पेक्षा जास्त आहे. अवयव दान आणि प्रत्यारोपण हे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा (THOA कायदा) 1994 अंतर्गत येते, जे जिवंत दाता आणि ब्रेन स्टेम दात्याद्वारे अवयव दान करण्यास परवानगी देते. 2011 च्या या कायद्यातील दुरुस्तीमध्ये ऊती दान करण्यास देखील परवानगी देण्यात आली होती, जो आता मानवी अवयव आणि ऊती प्रत्यारोपण (सुधारणा) कायदा 2011 आहे .एकट्या भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. प्रत्यारोपणाची संख्या आणि उपलब्ध अवयवांची संख्या यामध्ये खूप अंतर आहे. अवयवदान ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अवयव दाता अवयव प्राप्तकर्त्याला अवयव दान करतो. दाता जिवंत किंवा मृत असू शकतो. मूत्रपिंड, फुफ्फुसे, डोळे, यकृत, कॉर्निया, लहान आतडे, त्वचेच्या ऊती, हाडांच्या ऊती, हृदयाच्या झडपा आणि नसा हे अवयव दान करता येतात. अवयवदान हे जीवनाला मिळालेले अनमोल दान आहे. ज्यांचे आजार अंतिम टप्प्यात आहेत आणि ज्यांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे अशा लोकांना अवयवदान केले जाते.
शरीराच्या विविध अवयवांना इजा झाल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे देशात दरवर्षी मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, अवयवदान करणाऱ्यांची संख्या 2014 मध्ये 6,916 वरून 2022 मध्ये 16,041 वर पोहोचली. अवयवदानाची संख्या कमी असल्याने प्रत्येक गरजू रुग्णाला प्रत्यारोपणासाठी अवयव मिळत नाही. अशा परिस्थितीत अवयवदान करणाऱ्या व्यक्तींचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केल्यास अवयवदानाला प्रोत्साहन देण्याबरोबरच जनजागृती वाढण्यास मदत होईल. तामिळनाडूने अवयवदान करणाऱ्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली होती. तमिळनाडूच्या धर्तीवर कर्नाटकानेही अवयवदात्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी धोरण तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
यात राज्य अंत्यविधी, सन्मानपत्र किंवा सन्मान यांचा समावेश आहे. अलीकडे काही राज्य सरकारांनी अवयवदाते किंवा त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच अवयवदानाशी संबंधित समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेशी धार्मिक गुरूंना जोडण्यात आले आहे.
अवयवदानात तमिळनाडू देशात अव्वल आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. गुजरात आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अवयव दानाबाबत प्रेरणादायी वृत्ती असूनही देणगीदारांच्या संख्येत मोठी तफावत आहे.मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी सातत्याने वाढत आहे. एकट्या पुण्यात दीड हजारांहून अधिक मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याबाबत उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसते की, प्रत्येक वर्षी 1.8 लाख नागरिकांचे मूत्रपिंड निकामी होते. परंतु प्रत्यारोपणाची संख्या केवळ 6 हजाराच्या दरम्यान आहेत. यकृताचे कार्य थांबल्याने दरवर्षी अंदाजे 2 लाख रुग्णांचा मृत्यू होतो. केवळ 1 हजार 500 प्रत्यारोपण होत आहेत. दरवर्षी सुमारे 50 हजार रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होतो. परंतु दरवर्षी केवळ 10 ते 15 हृदय प्रत्यारोपण केले जाते.
गेल्या दशकात कर्नाटकात अवयवदानात 6.5 पट वाढ झाली आहे. 2022 मध्ये 151 अवयव दान करून नवा विक्रम नोंदवला गेला. मृत व्यक्तीकडून हृदय, मूत्रपिंड, स्वादुपिंड, फुफ्फुस, यकृत, आतडे, हात, ऊती, अस्थिमज्जा आणि स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केल्यास 8 ते 10 लोकांचे प्राण वाचू शकतात. परंतु जनजागृतीअभावी अवयवदानात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही.रक्तदानाप्रमाणेच अवयवदानातूनही गरजू रुग्णाला नवजीवनाची देणगी मिळू शकते. हे एक विलक्षण निस्वार्थी कृत्य आहे. निश्चितच, ब्रेनडेड घोषित झालेल्या रूग्णांचे नातेवाईक त्यांच्या प्रियजनांचे अवयव दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही या काळात काढून घेण्यास परवानगी देतात, याबद्दल ते नक्कीच आदर आणि सामाजिक कौतुकास पात्र आहेत.यामुळे काही लोकांचे आयुष्य पुन्हा उजळून निघते. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आणि प्रक्रिया सुलभ करण्याची गरज आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट आणि सुकर करण्याचीही गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment