Monday, September 19, 2022

मुलांना आयुष्यभर शिष्यवृत्ती मिळवून देणारे के. नारायण नाईक


वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचताच आपली सरकारे आणि नियुक्ती देणाऱ्या संस्था नियमांना बांधील  असल्याने त्यांना सन्मानाने निवृत्तीचे पत्र देतात. पण आयुष्याचा प्रवास त्या टप्प्याच्या पलीकडेही सुरू राहतो.  असे बरेच लोक त्यानंतरही  पूर्ण उर्जेने समाजात सक्रिय राहतात. उलट अशा काहींचे जीवन देश आणि समाजासाठी समर्पित राहते.  निवृत्तीनंतर समाज आणि मानवतेच्या सेवेचा अर्थ शोधू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी कर्नाटकातील 80 वर्षीय के नारायण नाईक यांचे जीवन 'दीपस्तंभ' आहे,असे म्हणायला हवे.

 देश त्यावेळेला अजून स्वतंत्र झालेला नव्हता. तसेच जमीनदारीतून मुक्तही झाला नव्हता.  या प्रथेचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसला.  त्याच वातावरणात नाईक यांचा जन्म दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल तालुक्यात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची परिस्थिती अशी होती की एके दिवशी सकाळी पाचवीत शिकणाऱ्या होतकरू मुलाला वडिल जवळ बोलावून म्हणाले - 'मी तुला आता शिकवू शकत नाही'.

हे शब्द आपल्या मुखातून काढण्यापूर्वी वडिलांना स्वतःशी किती संघर्ष करावा लागला असेल, याची त्या लहानग्या मुलाला कल्पनाही नसेल.  कुणी सहजासहजी मुलाची शाळा सोडवणार आहे का? पण हातावरचे पोट असलेल्या बापाने निष्ठुर मनाने हे शब्द ऐकवले. मात्र मुलगाही काही कमी नव्हता. आपले म्हणणे मांडण्यासाठी सत्याग्रह करण्याचा बापू गांधींचा मार्ग पोराने नुकताच ऐकला होता. शिक्षणासाठी  त्यानेही मग उपोषणाचे हत्यार उपसले. आता बालिश जिद्दीपुढे बाप किती दिवस आपल्या मतावर अडून बसणार?  तेही पुढे शिक्षण घेण्याची मुलाची इच्छा असताना.  नाईलाजाने बापाने त्या पोराला शाळेत जायला परवानगी दिली.

तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा असाच प्रसंग त्या मुलावर ओढवला. बापाची आर्थिक मजबुरी त्याचासमोर आली आणि यावेळीही त्याने बापूंचा तोच मार्ग अवलंबून आपली शिकण्याची जिद्द पूर्ण करून घेतली.  खरं तर आजच्या पिढीला तो संघर्ष समजणे कदाचित अवघड जाईल, कारण आता बहुतांश गावांमध्ये प्राथमिक शाळा आणि वाहतुकीची उत्तम साधने उपलब्ध आहेत, पण शिक्षणाची साखळी तुटू नये म्हणून तो पोरगा रोज सुमारे 16 किलोमीटर अनवाणी पायी चालत जात असे. कन्नड आणि हिंदीमध्ये बी.एड आणि एमए पदवी धारण करून त्या पोराने वयाच्या 20 व्या वर्षी प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापनाच्या जगात प्रवेश केला. तो मुलगा म्हणजे के.नारायण नाईक.

वैयक्तिक आयुष्यातील कटू अनुभवांमुळे नाईक यांना लहान वयातच जाणवले होते की, आर्थिक स्रोतांची कमतरता समाजातील अनेक तरुणांची स्वप्ने हिरावून घेत आहे.  त्यामुळे मुलांना प्रामाणिकपणे शिकवण्याबरोबरच ते पालकांना प्रेरित करायचे. पालकांना म्हणायचे," तुम्ही सर्वजण तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचवू शकता, त्यासाठी त्यांना शाळेत पाठवा. शाळा निरीक्षक म्हणून काम करीत असताना नारायण नाईक यांनी हजारो मुलांच्या आयुष्याला आकार देऊ शकणारे क्षितिज उघडले आणि ते आकाश म्हणजे 'शिष्यवृत्ती'!  आपल्या देशात केवळ केंद्र आणि राज्य सरकारच नाही तर अनेक खासगी संस्थाही वेगवेगळ्या प्रकारचे स्टायपेंड देतात, पण गरीब मुलांना किंवा त्यांच्या पालकांना त्याची माहितीही नसते.  नाईक यांनी या 'स्कॉलरशिप'चा उपयोग गरजू मुलांच्या मदतीसाठी करण्याचा निर्णय घेतला.

ते ज्या ज्या वेळेला शाळा भेटीच्या दौऱ्यावर असायचे, त्या त्यावेळेला ते तिथल्या शाळेतल्या गरीब होतकरू विद्यार्थ्याला शोधून काढायचे. मग ते आपली कुठलीही प्रसिद्धी न करता, ते त्या मुलाच्या शालेय शिक्षणासाठी  विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत  व्यवस्था करून देत. एवढेच नव्हे तर नाईक रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या वस्त्यांवर जाऊन त्यांना कामगार कल्याण विभागाकडे नोंदणी करण्यास प्रवृत्त करत असत, जेणेकरून त्यांच्या मुलांना शासकीय मानधन व सवलतींचा लाभ मिळेल.

सुमारे चार दशकांच्या शासकीय सेवेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून काम करताना नाईक यांनी जे काही केले ते त्यांच्या जबाबदारीचा भाग होते, परंतु 2001 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जे काही केले त्याबद्दल माणुसकी सदैव त्यांची ऋणी राहील.  त्यांना हवे असते तर ते आपल्या नातवंडांसोबत आनंदी जीवन जगू शकले असते, पण पाचवी आणि आठव्या इयत्तेतील त्यांचा संघर्ष त्यांनी नेहमीच स्वतःमध्ये जागृत ठेवला. त्यामुळेच निवृत्तीनंतरही ते गरजू मुलांना मदत करत राहिले. गरीब मुलांना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या 25 हजार रुपयांच्या पेन्शनपैकी बहुतांश रक्कम खर्च करू लागले.काही मुलं ती रक्कम परत करत असत तर बरेचजण ती परत करत नसत. पण नाईकांना त्याबद्दल कधीच दुःख वाटलं नाही. 

गेल्या चार वर्षात त्यांनी दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील सुमारे 870 शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शेकडो मुलांना शिष्यवृत्ती दिली आहे ज्यांना त्याची नितांत गरज आहे. स्वतःची पेन्शन तर ते खर्च करत असतच, पण विविध शिष्यवृत्तीही मुलांना मिळवून देत.  नाईक त्यांचे फक्त फॉर्मच भरत नव्हते तर काहीवेळा त्यांचे अर्ज योग्य प्राधिकरणाकडे पाठवून देत किंवा स्वतः जाऊन देत असत. गेल्या 21 वर्षात त्यांनी सुमारे एक लाख मुलांना 5 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्यांनी केवळ मुलांनाच मदत केली नाही तर त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांना विभागीय अनुदान मिळवून देण्यासाठी मदत केली आहे.

 या नि:स्वार्थ सेवेने मुलांमध्ये त्यांना 'स्कॉलरशिप मास्टर' म्हणून लोकप्रियता मिळवून दिली, तर या क्षेत्रात त्यांना 'सुधारक' म्हणून ओळखले गेले.  नाईक यांचे व्यक्तिमत्त्व किती प्रेरणादायी आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, ज्या मुलांना त्यांनी एकेकाळी मदत केली होती, अशा काही मुलांनी मिळून 7 लाख रुपये खर्चून एका विधवेसाठी घर बांधून दिले.  शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, हे सूत्र के नारायण नाईक यांनी त्यांच्या कृतीतून अक्षरशः योग्य सिद्ध केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment