काळू बंदर तब्बल सहा वर्षांनी काननवनमध्ये परतला होता. त्याच्या हातात एक मोठी बॅग आणि खांद्यावर पांढरा कोट लटकलेला होता. त्याला पाहताच नानू सशाने विचारले, "अरे काळूदादा, इतकी वर्षे कुठे गायब होतास? आणि हा काय लूक बनवला आहेस, तू हुबेहूब डॉक्टरांसारखा दिसतोस!”
काळू हसला आणि म्हणाला, “नानू, मी डॉक्टरांसारखा दिसत नाही तर खरोखरच डॉक्टर आहे. सहा वर्षे शहरात राहून मी एमबीबीएस केले आहे.'' शेजारी उभ्या असलेल्या भोलू अस्वलाने मध्येच विचारले, ''काळू, एमबीबीएस म्हणजे काय? काळू हसला आणि म्हणाला, “डॉक्टरीच्या कोर्सला एमबीबीएस म्हणतात.”
भोलूने मान हलवत विचारले, "काननवनातच हॉस्पिटल खोलणार का?"
"हो काका, आता इथल्या रहिवाशांना महागड्या उपचारांसाठी बाहेर जावं लागणार नाही." कालू माकड म्हणाले. हे ऐकून नानू आणि भोलूला खूप आनंद झाला.
काळूने काननवनात स्वतःचा दवाखाना उघडला. त्याच्या दवाखान्यात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. ही वेगळी गोष्ट की काही बरे झाले, काही स्वर्गात गेले .
कधी कोणी बरा झाल्यावर त्याच्यासाठी प्रार्थना करायचा, तर कधी कोणी बरा न झाल्याबद्दल शिवीगाळ करायचा. पण काळूची प्रॅक्टिस सुरू राहिली.
एके दिवशी पिलू हरणाची तब्येत अचानक बिघडली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला काळूच्या दवाखान्यात आणले. अनेक दिवस उपचार करूनही पीलूला आराम मिळाला नाही.
तरीही काळूने लांबलचक बिल काढले. ते बिल बघून पिलू हरणाचे कुटुंबीय स्तब्ध झाले. त्याने काळूला विचारले, "डॉक्टर बाबू, तुम्ही आम्हाला खूप मोठं बिल दिलंय, पीलूला तर काहीच फरक पडला नाही. आणि हा तर सरळसरळ दरोडा आहे."
"तुम्हाला म्हणायचं आहे की मी लुटारू आहे? तसे असल्यास, तुम्ही तुमच्या रुग्णाला इतरत्र कोठेही उपचारासाठी घेऊन जाऊ शकता."
"आम्ही ते घेऊन जाऊच, पण," पिलूचा भाऊ म्हणाला.
"पण काय ?" काळूने त्याला मधेच अडवून विचारले.
पिलू हरणाचाचा भाऊ म्हणाला, "तुम्ही आतापर्यंत जे उपचार केले,त्याच्या स्लिपा द्या, जेणेकरून त्या मी मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दाखवू शकेन."
"नाही, माझ्या इथे कसलीच स्लिप-विल्प मिळणार नाही!" काळू ओरडला.
काळूच्या या वागण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले की अचानक त्याच्यात असा बदल कसा काय झाला? काननवनच्या अनेक बुजुर्ग लोकांनी काळूला समजावले पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
शेवटी पिलूची प्रकृती आणखीन खालावलेली पाहून त्याच्या कुटुंबीयांनी पैसे उसने घेऊन काळूला दिले आणि पीलूला शहरातील रुग्णालयात नेले. सर्व तपासण्या करून झाल्यावर तिथल्या डॉक्टरांनी विचारले, "आतापर्यंत पीलूचे उपचार कुठून घेत होतात?"
पीलूच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना काळू माकडाबद्दल सांगितले तेव्हा ते सावध झाले. डॉक्टर म्हणाले, “या नावाचा पदवीधर डॉक्टर या भागात कोणीही नाही. कदाचित हा बोगस डॉक्टर असावा. हे ऐकून पिलूच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पीलूवर लगेच उपचार सुरू झाले आणि दोन-चार दिवसांत त्याला बराच आराम वाटू लागला. दरम्यान, शहरातील डॉक्टरांनी काननवन पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधिकारी असलेल्या चित्ता पाटील यांनी काळू माकडाच्या क्लिनिकवर छापा टाकला.
पोलिसांना पाहताच काळू मुकाट्याने मागच्या दाराने पसार होऊ लागला, चित्ता पाटलाने त्याला चपळाईने पकडले.
या वृत्ताने संपूर्ण काननवनात खळबळ उडाली. वृद्ध गजाराम हत्ती एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, " मी ऐकलं होतं की, माणसांमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस असल्याचं ऐकलं होतं आहे पण इथेही..."
बरीच चौकशी केल्यानंतर काळूने फसवणुकीच्या गुन्ह्यात सहा वर्षे तुरुंगवास भोगल्याचे सांगितले. त्याच्यावरचा हा काळा डाग लपवण्यासाठी त्याने युट्युब पाहून स्वतःला डॉक्टर बनवले.
पिलूच्या नातेवाईकांच्या समजूतदारीमुळे आणखी एक मुन्नाभाई पकडला गेला. काननवनच्या राजाने काळू माकडाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. एवढेच नाही तर राजा वनराजने सर्वांना सल्ला दिला की कोणत्याही डॉक्टरवर पारखल्याशिवाय विश्वास ठेवू नका.
-गोविंद भारद्वाज
अनुवाद-मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment