Sunday, September 11, 2022

'तुमच्या मुलीला शिकवा, पण तुमच्या मुलालाही समजावून सांगा म्हणत पदयात्रा काढणारी सृष्टी बक्षी


कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सध्या देशात आणि जगात चर्चेत आहे. या पदायात्रेचे राजकीय पडसाद आणि परिणाम पुढे वर्षानुवर्षे चर्चिले जातील.  पण आजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2017 मध्ये एक अनोळखी मुलगी कन्याकुमारी ते श्रीनगर याच मार्गावर एका खास उद्देशाने उतरली होती आणि ती जगभर चर्चेत आली होती.  तिचे नाव सृष्टी बक्षी!  मुलीला वाढवलं पाहिजे, शिकवलं पाहिजेच,पण मुलींवर अत्याचार करणाऱ्या, तिच्याशी वागणाऱ्या तुमच्या मुलालाही समजावून हे सांगत काश्मीरपर्यंत फिरत राहिली. महिलांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सृष्टीच्या त्या पदयात्रेचा उद्देश देशातील निम्मी लोकसंख्या जागृत करणे हा होता.सुमारे 35 वर्षांपूर्वी एका मध्यमवर्गीय लष्करी कुटुंबात जन्मलेल्या सृष्टीचे पालनपोषण अतिशय सुरक्षित वातावरणात झाले.  पण बाहेरचे जग किती भयंकर आहे हे तिला प्रथमच जाणवले, जेव्हा तिच्या पालकांनी तिला शाळेतील मैत्रिणींसह थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी एकट्याने जाण्याची परवानगी दिली.

तेव्हा सृष्टीचे वय 14 वर्षे असावे.  पालकांच्या देखरेखीपासून मुक्त असलेल्या या वातावरणासाठी ती खूप उत्साहित होती.  अशी स्वातंत्र्याची अनुभूती पहिल्यांदाच मिळाली होती.  पण ती खचाखच भरलेल्या थिएटरमध्ये तिच्या सीटवर पोहोचण्याच्या काही अंतराआधी, अंधारात कोणीतरी तिला गच्च पकडले.  सृष्टी त्या गुन्हेगाराला ओळखण्याआधीच ते हात गायब झाले.  किंचाळत ती थिएटरच्या बाहेर पळाली.भीती आणि अपमानाचा बोध घेऊन सृष्टी घरी परतली, पण तिने संपूर्ण रात्र एका विचित्र अवस्थेत घालवली.  आता घरातून बाहेर पडताना तिचं मन थरथरत होतं.  घटना आतल्या आत घट्ट रुतली होती.  देशात आणि जगात मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना सृष्टीला अस्वस्थ करत होत्या.  पण या भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समाजात समान दर्जा मिळवणे, हे तिला चांगलेच समजले.
सृष्टी लहानपणापासून मल्टीनॅशनल कंपनीची सीईओ बनण्याचे स्वप्न पाहत होती.  त्यामुळे 2004 मध्ये डेहराडून येथील 'सेंट जोसेफ अकादमी'मधून वाणिज्य शाखेत आयएसी केल्यानंतर ती मुंबईतील 'सेंट झेवियर्स कॉलेज'मध्ये गेली, तेथून तिने 2007 साली मास मीडियामध्ये बॅचलर पदवी मिळवली.  त्यानंतर तिचे पुढील शिक्षण हैदराबादमधील 'इंडियन स्कूल ऑफ बिझनेस' पार पडले.एमबीएची पदवी मिळताच तिची 'आयटीसी लिमिटेड' सारख्या प्रतिष्ठित संस्थेत निवडही झाली.  कोलकात्यात ब्रँड मॅनेजर म्हणून झालेल्या या नियुक्तीमुळे सृष्टीमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला.  दोन वर्षांनंतर, 2013 मध्ये ती मुंबईस्थित 'रेड बुल' कंपनीची नॅशनल ब्रँड मॅनेजर होती.
दरम्यान, तिचे लग्न झाले आणि 2014 मध्ये ती पतीसोबत हाँगकाँगला राहायला गेली.  पात्रता आणि अनुभवामुळे लवकरच ती तेथील एका नामांकित कंपनीचा भाग बनली.  तिला कंपनीत मिळालेली ओळख आणि पुरस्कार या दोन्ही गोष्टींमुळे ती खूप समाधानी होती.हाँगकाँगमध्ये सृष्टीची जगातल्या विविध भागांतून येणाऱ्या लोकांसोबत ऊठबस होत होती.  या बहुतेक संभाषणांमध्ये तिला उत्कटतेने जाणवले की भारताबद्दल प्रत्येकाची स्वतःची एक धारणा आहे.  जवळजवळ प्रत्येकालाच भारतात यायचं होतं, ताजमहाल पाहायचा होता, योगाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती, पण त्यांच्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच भारतीय पुरुष निसर्गाने 'बदमाश' वाटत होते. स्त्रियांवर होणाऱ्या दुष्कार्मामुळे इथल्या पुरुषांविषयी तिटकारा होता.
ही गोष्ट सृष्टीला खटकायची.  ती अनेकदा तिच्या देशाच्या बचावात असा युक्तिवाद करायची की बलात्काराच्या घटना जगाच्या कानाकोपऱ्यात घडतात आणि कोणताही देश त्यापासून अस्पर्शित नाही.  पण भारतातून येणार्‍या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या अनेकदा त्या परदेशी लोकांसमोर तिला लाजवीत होत्या.2016 चा जुलै महिना. नोएडा येथे राहणारे एक कुटुंब रात्री त्यांच्या कारने शहाजहानपूर येथील त्यांच्या मूळ गावी जात होते.  यादरम्यान दरोडेखोरांनी बुलंदशहरच्या दोस्तपूर गावाच्या आसपास या कुटुंबाला नुसते लुटलेच नाही तर दोन महिलांना कारमधून बाहेर खेचून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.  यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता.सृष्टीने ही बातमी वाचली तेव्हा तिला धक्काच बसला.  अनेक दिवस ती शॉकमध्ये होती.  त्याचवेळी तिने ठरवले की या महिलांवरील अत्याचाराविरोधात महिलांना जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे.  समाजाच्या दबावाखाली या दडपशाहीला ती आता शांतपणे प्रोत्साहन देऊ शकत नाहीत.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बनवून जेव्हा सृष्टीने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रेची कल्पना मांडली तेव्हा बहुतेक लोकांनी तिची खिल्ली उडवली. 'याने काय होणार?  तू काहीही करू शकत नाहीस?  भारतात पुरुषसंस्कृतीचा पगडा राहिला आहे आणि तो बदलणार नाही.'सुमारे 60 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी सोडून सृष्टी भारतात आली आणि तिने एक टीम तयार केली. आणि 15 सप्टेंबर 2017 रोजी कन्याकुमारी येथून जनजागृती मोहिमेवर निघाली.  दररोज 150-200 लोक मोहिमेत सामील होत.  230 दिवस चाललेल्या या 3 हजार 800 किमी पदयात्रेत तिने 12 राज्यातील सुमारे एक लाख महिलांची भेट घेतली. तिने सुमारे 120 कार्यशाळा आयोजित केल्या आणि महिलांना मार्गदर्शन केले.
तिच्या पदयात्रेमुळे समाजात किती बदल झाला माहीत नाही, पण या उपक्रमामुळे सृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मात्र मिळाली.  क्वीन एलिझाबेथ द्वितीय 2018 मध्ये 'कॉमनवेल्थ पॉइंट ऑफ लाइट' किताब देऊन तिचा गौरव केला.  संयुक्त राष्ट्र संघानेही तिचा गौरव केला.  सृष्टीचा नारा आहे - '‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ महत्त्वाचा आहेच, पण 'बेटे को समझाओ' हेही त्यापेक्षा कमी महत्त्वाचे नाही!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment