Thursday, February 2, 2023

जागरूकतेचा अभाव आणि कर्करोगाचा प्रसार

कॅन्सर, टीबी आणि हार्ट अटॅक यासारख्या आजारांची आकडेवारी कोरोनाच्या काळात समोर येऊ शकली नव्हती. मात्र आता आलेली कर्करोगाची ताजी आकडेवारी देशाची भयावह स्थिती दर्शवते. पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि चंदीगडमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेत अधिकृत आकडेवारी सादर करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्वत: सांगितले की 2020 ते 2022 या काळात देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आइसीएमआर) च्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार, 2020 मध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या 13,92,179 होती आणि 2021 मध्ये ती 14,26,447 आणि 2022 मध्ये 14 ,61,427 वाढली. 2020 मध्ये भारतातील कर्करोगाने मृत्यूचे अंदाजे प्रमाण 7,70,230 होते आणि ते 2021 मध्ये 7,89,202 आणि 2022 मध्ये 8,08,558 पर्यंत वाढले आहे.

एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या आधारे, आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रण (एनपीसीडीसीएस) या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत , राज्ये आणि केंद्र केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक मदत पुरवली जाते. कर्करोग हा एनपीसीडीसीएस चा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश पायाभूत सुविधा मजबूत करणे, मानव संसाधन विकास, आरोग्य संवर्धन आणि कर्करोग प्रतिबंध, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि कर्करोगासह असंसर्गजन्य रोग (एनसीडी) चे उत्तम आरोग्यसेवा उपचार यासाठी जागरूकता निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

एनपीसीडीसीएस अंतर्गत, 707 जिल्हा एनसीडी केंद्रे, 268 जिल्हा काळजी केंद्रे आणि 5,541 सामुदायिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेचा एक भाग म्हणून सामान्य असंसर्गजन्य रोग, म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सामान्य कर्करोग यांच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि तपासणीसाठी लोकसंख्या-आधारित उपक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत, तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या तीन सामान्य कर्करोगाच्या तपासणीसाठी लक्ष्य केले जाते. 2022 मध्ये कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या 1461427 होती, ज्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त होत्या. महिलांची संख्या 749251 तर पुरुषांची संख्या 712176 होती. महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक कर्करोग पचनसंस्थेच्या अवयवांमध्ये (2,88,054), स्तन (2,21,757), प्रजनन प्रणाली (2,18,319), तोंड (1,98,438) आणि श्वसन प्रणाली (1,43,062) मध्ये होतात.

महिला आणि पुरुषांमध्ये वयाच्या 74 व्या वर्षांपर्यंत कर्करोग होण्याचा धोका नऊपैकी एक असा आहे. पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका 67 पैकी एक आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका 29 पैकी एक असे प्रमाण आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्चच्या डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, देशात स्तनाच्या कर्करोगाची सुमारे 1,82,000 प्रकरणे आढळून आली आहेत. 2030 पर्यंत ही प्रकरणे अडीच लाखांपर्यंत वाढू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, 2018 मध्ये कर्करोगामुळे एकूण 96 लाख मृत्यू झाले. यापैकी सत्तर टक्के मृत्यू गरीब देशांमध्ये किंवा भारतासारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले आहेत. याच अहवालानुसार, भारतात कर्करोगामुळे 7.84 लाख मृत्यू झाले आहेत. म्हणजेच कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी आठ टक्के मृत्यू हे एकट्या भारतात झाले आहेत.

पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि चंदीगडमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पंजाबमध्ये 2018 मध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 36801, 2019 मध्ये 37744 आणि 2020 मध्ये 38636 झाली. हरियाणात 2018 मध्ये 27665, 2019 मध्ये 28453 आणि 2020 मध्ये 29219 कॅन्सरची प्रकरणे आढळून आली. हिमाचलमध्ये 2018,  मध्ये 8012, 2019 मध्ये 8589 आणि 2020 मध्ये 8777 प्रकरणे आढळून आली. चंदीगडमध्ये 2018 मध्ये 966, 2019 मध्ये 994, 2020 मध्ये 1024 प्रकरणे आढळून आली. सध्या पंजाबमध्ये एक लाख लोकांमागे ९० रुग्ण कर्करोगाने ग्रस्त आहेत. गेल्या सात वर्षांत दरवर्षी सरासरी 7586 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सरकार कर्करोगग्रस्तांच्या उपचारावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा दावा करत असले तरी जनजागृतीअभावी त्याची कहाणी उलटी आहे.

आजदेखील अनेक स्त्रिया लाज आणि भीतीमुळे आजार सांगायला तयार नाहीत. कर्करोगावर उपचार घेत असलेले अनेक रुग्ण कर्करोग हा पिढ्यानपिढ्याचा आजार आहे, असे मानतात, तर वैद्यकीय शास्त्रानुसार केवळ पाच टक्के कर्करोग पालकांकडून मुलांकडे जातो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढण्यामागे कीटकनाशकांचा अतिवापर हे एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. नैऋत्य पंजाबमधील कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण असामान्यपणे जास्त आहे, जे इतर घटकांसह कीटकनाशकांच्या वापराशी संबंधित आहे. जगभरातील देशांमध्ये कर्करोगाविरुद्धचे युद्ध सुरू आहे.  पण जितक्या वेगाने उपाय शोधले जात आहेत तितक्याच वेगाने त्याचा प्रसारदेखील होत आहे. मात्र, या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी देशी पद्धतींद्वारे उपचाराच्या शक्यता शोधण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. आहारात बदल करून त्यांच्यावर उपचार करण्याचेही काही प्रयत्न चालले आहेत.

असाच एक प्रयोग जादवपूर विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागात करण्यात आला, ज्यामध्ये दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपासून बनवलेल्या सर्वपिष्टी या औषधाची चाचणी करण्यात आली. औषधाच्या परिणामकारकतेची पातळी तपासण्यासाठी साधारणपणे दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात- पहिली म्हणजे औषधीय (फार्माकोलॉजिकल) चाचणी आणि दुसरी विष विद्यासंबंधी (टोक्सीकोलाजिकल) चाचणी. आयात केलेल्या पांढऱ्या उंदरांवर या चाचण्या करण्यात आल्या. प्राण्यांच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी प्रविष्ठ करण्यात आल्या आणि जेव्हा ट्यूमर तयार झाला तेव्हा औषध द्यायला सुरुवात केली गेली. 'पोषण ऊर्जा' चाचणी स्थितीत, चौदा दिवसांनंतर आढळलेला प्रतिसाद पाहिला असता, या पेशींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली होती. प्राण्यांच्या शरीरात अल्सर निर्माण झाले नाहीत.

ट्यूमरच्या वाढीचा दर सहाचाळीस टक्क्यांनी कमी झाला आणि औषधाची विषारीता जवळजवळ शून्य होती. असे सकारात्मक परिणाम अलीकडच्या काळात दिसून आले नव्हते. या औषधामध्ये कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आणि त्याच्याशी लढण्यासाठी अपार अशी शक्यता आहेत. चाचण्या घेणाऱ्या डॉ. चॅटर्जी यांच्या निष्कर्षांवरून हे औषध कर्करोगाच्या रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राबरोबरच कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारातही त्याचा उपयोग प्रभावी ठरला आहे. परंतु औषधांना मान्यता देणाऱ्या संस्थांनी अजून त्याला मान्यता न दिल्याने ते अद्याप बाजारात उपलब्ध झाले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुमच्या कर्करोगाच्या उपचारात काही दिवसांचा विलंबदेखील घातक ठरू शकतो. दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे थायरॉईड, गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या काही प्रकारच्या कर्करोगाच्या जवळपास इलाज  शंभर टक्के  पोहचला आहे. टेस्टिक्युलर आणि थायरॉईड सारख्या कर्करोगात, आपण सहजपणे म्हणू शकतो की बरे होण्याची शंभर टक्के शक्यता आहे, परंतु स्वादुपिंड (पेनक्रिएटिक) सारख्या कर्करोगाच्या इतर प्रकारांच्या बाबतीत, जगण्याची शक्यता कमी आहे. खरं तर कोणते संशोधन आपल्याला बरा होण्याच्या जवळ जाईल हे सांगता येणे कठीण आहे. आम्ही खात्रीने एवढेच म्हणू शकतो की औषधे, केमो आणि रेडिएशनद्वारे उपचार चांगले होत आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

No comments:

Post a Comment