Friday, February 17, 2023

हिंदी चित्रपट उद्योग केवळ खान कलाकारांवर अवलंबून ?

जुन्या बॉलीवूड कलाकारांचे चित्रपट नवीन कलाकारांपेक्षा जास्त कमाई करतात. बॉलीवूडमधील बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आधारित चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत फक्त सलमान, शाहरुख, अमीर खान आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांनी 400 ते 800 कोटींची कमाई केली आहे. बाकी कलाकारांचे चित्रपट 300 ते 400 कोटींच्या पुढे गेले नाहीत.  असे नाही की बाकीचे फक्त फ्लॉप चित्रपट देत आहेत किंवा शाहरुख, सलमान आणि अमीरव्यतिरिक्त कोणीही बॉलीवूडमध्ये हिट चित्रपट दिलेले नाहीत. पण सत्य हे आहे की आतापर्यंत सर्वाधिक कलेक्शन शाहरुख, अमीर, सलमानच्या चित्रपटांचे आहे. त्यानंतर अक्षय कुमार आणि अजय देवगणचा नंबर लागतो.  त्यांच्या चित्रपटांनी 200 ते 300 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपयांचा हा चित्रपट उद्योग केवळ खान कलाकारांवर अवलंबून आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बाकीच्यांमध्ये शाहरुख आणि सलमानच्या चित्रपटांशी स्पर्धा करून बॉलीवूडची बुडती बोट पार करण्याची हिंमत नाही का?

कोरोना महामारीनंतर 2022 या वर्षाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या आशा पल्लवित केल्या आहेत, मात्र आता 2023 मध्ये बॉलीवूडला आपली बुडणारी बोट वाचवण्यासाठी काहीतरी चमत्कार दाखवावा लागणार आहे. बॉलीवूडची बुडणारी बोट वाचवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या खांद्यावर पडताना दिसत आहे. अलीकडेच चित्रपटगृहात आलेल्या पठाण चित्रपटातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक चांगल्या चित्रपटाच्या शोधात होते. सततच्या फ्लॉप चित्रपटांनी बॉलिवूडवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  एका क्षणी असे वाटले की इंडस्ट्रीत चांगल्या कथा संपल्या असतील.  पण  चित्र अजून बाकी आहे. शाहरुख खान आणि सलमानने 'पठाण' चित्रपटातून बॉलिवूडला नवी आशा दिली आहे.  वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख आणि सलमानची अ‍ॅक्शन पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या चित्रपटात सलमानने भलेही कॅमिओ केला असेल, पण त्याची भूमिका हृदय जिंकणारी होती.  या दोघांची जुगलबंदी सांगते की, जेव्हाही ते एकत्र येतील तेव्हा पडद्यावर मोठा धमाका होईल. सलमान खान आणि शाहरुख खान यांनीही 'पठाण'च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना मोठा संदेश दिला आहे. चित्रपटाच्या शेवटी, शाहरुख आणि सलमान मनापासून बोलतांना दिसले.  शाहरुख सलमानला म्हणतो, मला कधी-कधी वाटतं की आता 30 वर्षे झाली आहेत, आपण निघून जावं. त्यावर सलमान उत्तर देत म्हणाला, पण आमची जागा कोण घेणार?  शाहरुख म्हणतो की भाऊ हे आम्हाला करायचे आहे, हा देशाचा प्रश्न आहे. ते मुलांवर सोडू शकत नाही.  सलमान आणि शाहरुखचे पठाण चित्रपटातील संभाषण भलेही चित्रपटासाठी असेल, पण त्यांच्यातील संवाद अगदी अस्सल वाटला. हे दोन्ही कलाकार जणू जगाला संदेश देत होते.  यासोबतच आम्ही पुन्हा परत येऊ, असेही ते सांगत आहेत, तेही मोठा धमाक्यासोबत.

बॉलीवूडचे काही चित्रपट वगळता, बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. रणवीर सिंगचा जयेश भाई जोरदार, सर्कस, वरुण धवनचा स्ट्रीट डान्सर, कलंक, सुई धागा, कुली नंबर वन, अक्षय कुमारचा पृथ्वीराज सम्राट, रक्षाबंधन, रामसेतू, अजय देवगणचा रनवे 34, रणवीर कपूरचे शमशेरा, जान अब्राहम की सत्यमेव जयते, एक विलेन रिटर्न अनेक  कोटी खर्चाचे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. या अभिनेत्यांच्या हिट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र, कार्तिक आर्यनचा भूलभुलैया 2, रणवीर सिंगचा सूर्यवंशी, अजय देवगणचा दृष्यम 2, तानाजी, वरुण धवनचा भेडिया, शाहिद कपूरचा कबीर इत्यादी अनेक चित्रपटांनी चांगला धंदा केला आहे. पण या सर्व नायकांचे चित्रपट 300 कोटींपेक्षा जास्त पोहोचले नाहीत. मात्र, गेल्या वर्षी अक्षय कुमारचे सलग चार चित्रपट फ्लॉप झाले आहेत.  सध्या बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत ज्यांच्याकडून त्यांना मोठ्या आशा आहेत. सलमान खान आणि शाहरुख खानपासून ते अजय देवगण आणि अक्षय कुमारचे अनेक चित्रपट येत आहेत.

या चित्रपटांबद्दल अटकळ बांधली जात आहे की, ते बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार आहेत. अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाने सुरुवातीपासूनच धमाकेदार कमाई केली आणि जवळपास 240 कोटींची कमाई केली. अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या चित्रपटापूर्वी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते, परंतु बॉक्स ऑफिसवर त्यांच्या पुढे उभे राहू शकले नाहीत. 'दृश्यम 2' हा अजय देवगणचा तिसरा चित्रपट आहे ज्याने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.  यापूर्वी त्याचे दोन चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'गोलमाल अगेन' या क्लबमध्ये सामील झाले आहेत. आता अजय देवगण त्याच्या 'भोला' आणि 'रेड 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment