अंमली पदार्थांच्या उत्पादन विक्रीवर आणि सेवनावर बंदी घालणारे कठोर कायदे जगातील प्रत्येक देशात अस्तित्वात आहेत. शिवाय अंमली पदार्थांच्या विक्री आणि खरेदीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रग कंट्रोल ब्युरो आहे. पण वास्तव असे की अशा पदार्थांवर बंदी घालणे तर दूरच, त्यांचा खप आणि धंदा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता तर अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसाठी इंटरनेटचा बिनदिक्कत वापर केला जात आहे, ही खरे तर मोठी चिंतेची बाब आहे. व्हिएन्ना स्थित इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (आयएनसीबी) ने आपल्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, भारत आणि दक्षिण आशियामध्ये अवैध नशिल्या वस्तूंची विक्री इंटरनेटवर चालणार्या दुकानांमधून, म्हणजेच 'डार्कनेट'द्वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
यामध्ये सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. ही दुकाने अशा अवैध पदार्थांचा महिमा गाणारे साहित्यही प्रसारित करत आहेत. हे पदार्थ औषधांचा तोंडावळा देऊनही विकली जात आहेत, असे अहवालात म्हटले आहे. आयएनसीबीने अशा काही दुकानांची ओळख पटवून त्यांची यादीही जारी केली आहे. खरे तर हे सगळे भयंकर आहे.मात्र अशा दुकानांवर बंदी घालण्यासाठी आतापर्यंत कोणतीही व्यावहारिक पावले का उचलली गेली नाहीत, याचेच मोठे आश्चर्य वाटते. अंमली पदार्थांनी आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे की अनेक युवक त्याच्या व्यसनाला बळी पडले आहेत, ते आपले आरोग्य बिघडवून घेत आहेत किंवा अनादी काळाच्या गाळात अडकत चालले आहेत. पंजाबमध्ये ड्रग्जच्या दुष्परिणामांची भीषण वस्तुस्थिती आता कोणापासूनच लपून राहिलेली नाही. आता श्रीमंत आणि उच्चभ्रूंच्या बैठका-कार्यक्रमांमध्ये अशा नशेचे सेवन करणे ही एक फॅशन बनत चालली आहे. तर अनेक ठिकाणी विशेषत: अशा पदार्थांच्या सेवनासाठी छुप्या पद्धतीने मेजवानी दिली जाते. नार्कोटिक्स ब्युरो कधी-कधी अशा काही लोकांना अटक करून अमली पदार्थांच्या धंद्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी या व्यवसायाच्या मुख्य स्त्रोतापर्यंत मात्र पोहोचता येत नसल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. याचाच परिणाम म्हणून ड्रग्ज विक्रेते आता इतके निर्भयपणे वावरताना दिसतात की, शेकडो किलो अमली पदार्थ इतर देशांतून बिनदिक्कत मागवले जात आहेत. गुजरातच्या एका बंदरात आणि इतर अनेक ठिकाणी जप्त केलेल्या अमली पदार्थांचा प्रचंड साठा याचा पुरावा आहे.
अनेक प्रकरणांमध्ये पोलिस आणि अंमली पदार्थ विभागातीलच लोकांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने या विभागांवर संशयाची सुई वारंवार अटकत आहे. काही वर्षांपूर्वी पंजाबमधील डीएसपी दर्जाचा अधिकारी ड्रग पॅकच्या स्वरूपात अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दोषी आढळला होता.अंमली पदार्थांचा व्यापार हा इतका चिंतेचा विषय आहे की त्यामुळे तरुणांचे जीवन तर उद्ध्वस्त होत आहेच, पण देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. मात्र या व्यवसायावर अंकुश लावण्यात सरकारे आजवर सपशेल अपयशी ठरली आहेत. यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पण पंजाबमध्ये या व्यवसायात सहभागी असल्याच्या कारणावरून एका राजकारण्याला ज्या प्रकारे अटक करण्यात आली, त्यावरून या व्यवसायाला राजकारणातून खत-पाणी घातले जात असल्याचे दिसून येते. आक्षेपार्ह मजकूर देणार्या साईट्स बंद केल्या जाऊ शकतात, मग अमली पदार्थांच्या व्यवहाराच्या वेबसाईट्स बंद करण्याला कसला अडथळा येत आहे,हेच कळायला मार्ग नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment