Friday, March 4, 2022

आपल्या क्षमतांचा विस्तारात दंग बॉलीवूड अभिनेत्री


भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात महिला काम करायला धजावत नव्हत्या.त्यामुळे सुरुवातीला पुरुष मंडळीच स्त्री पात्रे रंगवीत. मात्र आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. आज अभिनेत्री म्हणून वावणाऱ्या महिला फक्त अभिनय क्षेत्रातच समाधान मनात नसून त्या आता निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही लीलया वावरताना दिसत आहेत. गेल्या शंभराहून अधिक वर्षांच्या या चित्रपट सृष्टीच्या  प्रत्येक टप्प्यात महिलांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.  अगदी सुरुवातीच्या काळात देविका राणी (ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली 'पट्टराणी' म्हटले जाई.), वैजयंतीमाला, नर्गिस, हेमामालिनी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित ते दीपिका पदुकोण या अभिनेत्रींनी चित्रपट जगतात आपले वर्चस्व गाजवले आहे.  याशिवाय आजच्या अभिनेत्री आपल्या क्षमतांचा विस्तार करत आहेत.  अभिनयासोबतच त्या टीव्ही शोच्या प्रेझेंटर बनल्या आहेत.  टीव्ही शोमध्ये जज म्हणून दिसतात.  चित्रपट बनवतात, गाणीही म्हणतात.  या अभिनेत्री आता अभिनयाचे आकाश मागे सोडून विविध क्षेत्रात उंच भरारी घ्यायला सज्ज झाल्या आहेत. आज प्रियांका चोप्रा आपल्या क्षमतांचा विस्तार करत हॉलिवूडमध्ये नाव कमवत आहे.  अभिनयासोबतच ती चित्रपट निर्मिती आणि गायनातही सक्रिय झाली आहे.  प्रियांकाने कोरोना महामारीच्या काळात देशासाठी निधी उभारला.  प्रियंकाप्रमाणेच ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली.

माधुरी दीक्षित वयाच्या 54 व्या वर्षीही उत्साहाने काम करत आहे.  ती 'डान्स दीवाने ज्युनियर'मध्ये जज म्हणून छोट्या पडद्यावर थिरकतानाच आता ती तिचा स्वतःचा शो 'द फेम गेम' घेऊन येत आहे.  अभिनयाच्या दुनियेत स्वत:चे नाव कोरल्यानंतर, योग आणि फिटनेस व्हिडिओंद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचून शिल्पा शेट्टीने तिची लोकप्रियता कायम राखली आहे.  माधुरी दीक्षितप्रमाणेच शिल्पा शेट्टीदेखील तिच्या आकर्षक देहबोली, स्माईल आणि मस्ती भऱ्या शैलीमुळे चर्चेत असते.  योग आणि फिटनेसशिवाय शिल्पा 'सुपर डान्सर' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये जजच्या भूमिकेत दिसते. कंगना राणौतच्या अभिनयातून प्रेक्षक बाहेर पडण्याअगोदरच कंगनाने आपला मोर्चा अन्य क्षेत्राकडे वळवला आहे. या फिल्म इंडस्ट्रीत ती निर्माती म्हणून दिसायला लागली आहे.  अनेकदा बिनधास्तपणा आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती अडचणीत आली आहे. मात्र  तरीही तिला मागणी आहेच. सध्या ती 'तेजस' आणि 'धाकड' चित्रपट करत आहे तर एकता कपूरने तिच्याकडे 'लॉक अप' या नवीन शोची जबाबदारी सोपवली आहे.  बॉलीवूड आजकाल अभिनेत्रींना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी जितक्या संधी देत ​​आहे इतकी संधी यापूर्वी कधी अभिनेत्रींना मिळाली नव्हती. 

'गंगूबाई काठियावाडी'मध्ये आलिया भट्टला पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले आहेत आणि दुसरीकडे तिने स्वतःची प्रोडक्शन कंपनी उघडून चित्रपट बनवायला सुरुवात केली.  अनुष्का शर्मा निर्माती म्हणून 'एनएच10' बनवते आहे, दीपिका पदुकोणने अॅसिड हल्ला प्रकरणावर 'छपाक' बनवला. आता दीपिका पदुकोण, कटरिना कैफ, भूमी पेडणेकर, क्रिती सेनॉन यांना डोळ्यासमोर ठेवून कथा लिहिल्या जात आहेत.  त्यामुळे चित्रपटांचे स्वरूप बदलत चालले आहे.  सशक्त आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यात या अभिनेत्री पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. माधुरी दीक्षितच्या मते, एखादी महिला शिक्षित असेल तेव्हाच ती अधिक मजबूत आणि आदरणीय बनू शकते.  मराठीत 'मुलगी शिकली, प्रगती झाली' असे म्हणतात.  दुसरीकडे, आलिया भट्ट मानते की, आपले वर्चस्व सिद्ध करताना आदळआपट करायची गरज नाही.  शांत राहूनही आपण आपली क्षमता आणि सामर्थ्य दाखवू शकतो.

तब्बूचा असाही विश्वास आहे की आपण आपले नशीब बदलू शकत नाही, परंतु कठोर आणि प्रामाणिकपणे काम करून आपण आपले नशीब नक्कीच सुधारू शकतो.  मला एक स्त्री असल्याचा अभिमान आहे.  करीना कपूरच्या म्हणण्यानुसार, स्वत:ला कधीही कमकुवत समजले नाही कारण मी जय-पराजयाला इतके महत्त्व देत नाही. मात्र जिंकल्यावर  मला खूप छान वाटते.  करीनाच्या विपरीत, दीपिकाचा असा विश्वास आहे की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात स्त्रीला कमकुवत आणि अपमानित करण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न केला जातो, परंतु ज्या महिलांचा विश्वास दृढ आहे तेच यशस्वी होतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment