कोरोनाचं संकट सरलं असल्यानं आणि चित्रपटगृहंही पूर्ण क्षमतेनं खुली झाल्यानं सिनेसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. गेली दोन वर्षे सिनेसृष्टी ठप्प झाली होती.कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं.या कालावधीत मोठया बॅनर्सचे ,मोठया बजेटचे चित्रपट तयार असूनही प्रदर्शित होऊ शकले नव्हते.पण आता तिकीटबारीवर स्पर्धाही दिसू लागली आहे. या क्षणाची वाट पाहणाऱ्या निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटांच्या तारखा घोषित करायला सुरुवात केली आहे. काही मोठे सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकणार असे चित्र दिसत आहे. साहजिकच हे होणारच आहे. कारण मार्च 2020 पासून लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या जाळ्यात अडकलेली सिनेमागृहं पूर्णपणे खुली व्हायला मार्च 2022 यावा लागला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शूट झालेले बरेच सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यानुसार आता प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि अजय देवगन यांच्या सिनेमांमधील द्वंद्व पाहायला मिळणार आहे.
अजय देवगनची भूमिका असलेला 'मैदान' आणि अक्षय कुमार अभिनित बहुचर्चित 'पृथ्वीराज' या दोन चित्रपटांनी प्रदर्शनासाठी एकच मुहूर्त काढला आहे. दोन्ही सिनेमे 3 जून 2022 रोजी रिलीज होणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला 'पृथ्वीराज' 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार होता,पण आता अचानक यात बदल करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आल्यानं खरा गोंधळ सुरू झाला आहे. अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटानं यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर ही तारीख बूक केली आहे. बोनी कपूर निर्मित 'मैदान' चित्रपटाच्या रिलीजची तारीख भारतात कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याआधी जाहीर करण्यात आली होती. 'मैदान' चं दिग्दर्शन अमित त्रिवेदी यांनी केलं आहे. यात अजयसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणी दिसणार आहे. जावेद अख्तर यांनी गीतलेखन केलं असून संगीत ए. आर. रेहमान यांचं आहे. बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रॅमा असलेल्या या चित्रपटात भारतीय फुटबॉल संघाचा 1952 ते 1962 मधील सुवर्णकाळ बघायला मिळणार आहे. यात अजयनं फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिमची भूमिका साकारली आहे.
'पृथ्वीराज' हा महात्त्वाकांक्षी चित्रपट रजपूत राजे पृथ्वीराज चौहान यांची शौर्यगाथा सादर केली जाणार आहे. या निमित्तानं पृथ्वीराज यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसमोर येणार आहे. हिस्ट्रॉरीकल ऍक्शन ड्रॅमा असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कथानक ब्रज भाषेतील 'पृथ्वीराज रासो' या काव्यावर आधारित आहे. मिस वर्ल्ड 2017 ची विजेती मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असून ती संयोगीताच्या भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय आणि अजय हे दोघेही खूप समंजस आणि परिपक्व अभिनेते आहेत. दोघांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याचे तोटे दोघांनाही माहीत आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपट पुढे-मागे प्रदर्शित करण्याचे पाऊल ते उचलण्याची शक्यता आहे, मात्र निर्माते त्यांचे कितपत ऐकतात, हा प्रश्न आहे. तसं झालं नाहीतर दोघांचंही आर्थिक नुकसान अटळ आहे.आधीच कोरोना महामारीच्या काळात आर्थिक तंगीत काळ घालवलेल्या प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट पाहण्याची चैन परवडणार आहे का? यापूर्वीही असे मोठे चित्रपट समोरासमोर उभे ठाकले पण यात दोघांचंही आर्थिक नुकसान झालं आहे. चित्रपट बनतात ते चालण्यासाठीच. पण एकाच दिवशी बॉक्स ऑफीसवर दोन मोठे चित्रपट थडकत असतील तर, मात्र यात या चित्रपटांबरोबरच सिनेसृष्टीलादेखील मोठं नुकसान झेलावे लागते. या गोष्टी माहित असूनही 2017 मध्ये शाहरुख खान आणि हृत्विक रोशन यांनी आपापले चित्रपट प्रदर्शित केले होते. याअगोदर ईदची संधी साधून प्रदर्शित करण्यास सज्ज असलेला 'रईस' चित्रपट शाहरुख खानने नंतर त्याचे प्रदर्शन लांबणीवर टाकले.त्याचे कारण सांगताना शाहरुख म्हणाला होता की, ज्या आठवड्यात एक मोठा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याच आठवड्यात दुसरा चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यावेळेला सलमान खानचा 'सुलतान' येणार होता. सलमानसाठी शाहरुख मागे सरला. खरे तर शाहरुखने कधीही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मागे-पुढे केली नव्हती. जवळपास अडीच दशके यशस्वी खेळी करणार्या शाहरुखची गती गेल्या चार-पाच वर्षांपासून मंदावली आहे. गुजरातच्या नव्वदच्या दशकातील गँगस्टर अब्दुल लताफच्या जीवनावर आधारित रईस चित्रपटाची कथा होती. मात्र पुन्हा एकदा चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकू शकणार नव्हता. त्यामुळे शाहरुखचा नाईलाज झाला.
26 जानेवारीच्या निमित्ताने राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृत्विक याचा काबिल चित्रपट प्रदर्शित करण्याचे अगोदरच ठरवले होते. हृत्विकदेखील चित्रपट स्वत:च्या जिवावर सांभाळू शकतो, हे सिद्ध झाले आहे. मात्र गेल्यावर्षीचा आशुतोष गोवारीकरच्या 'मोहनजोदाडो'ला जबरदस्त मात खावी लागली होती. त्यामुळे हृत्विकलादेखील एकादी चूक मोठी महागात पडू शकते. 'काबिल' चित्रपटात हृत्विक पहिल्यांदाच एका नेत्रहिन व्यक्तीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तंत्रज्ञानाने समृद्ध आहे,पण कथेच्या बाबतीत काहीसे कमजोर चित्रपट बनवणारे संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.साहजिकच दोघांनाही फटका बसला. यात शाहरुखच्या 'रईस' ने अधिक कमाई केली इतकेच. शाहरुख खान आणि हृत्विक रोशन या दोघांनाही आपल्याला एका यशस्वी चित्रपटाची गरज आहे, याची कल्पना असतानादेखील त्यांनी एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा आपापला हट्ट कायम ठेवला.
आज 'पृथ्वीराज' आणि 'मैदान' एकमेकांसमोर आले असले तरी असे नाही की, असे पहिल्यांदाच घडत आहे. 'रईस' आणि 'काबिल' यांचेही असेच झाले. याअगोदर 15 ऑगस्ट 1975 या दिवशी 'शोले'बरोबरच 'जय संतोषी माँ' प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांची जातकुळी वेगळी होती. 'जय संतोषी माँ' पहिल्या दिवसापासून तिकिट खिडकीवर गर्दी करू खेचू लागला.सुरुवातीला प्लॉप ठरवला गेलेला 'शोले' नंतर मात्र जबरदस्त चालला. अशा प्रकारेच अमिताभ बच्चन,रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन आलेला यश चोप्रा यांच्या चर्चित 'सिलसिला' या चित्रपटासोबत महेश भट्ट यांचा 'अर्थ' सिनेमागृहात दाखल झाला होता. 'अर्थ' सर्वदृष्टीने लहान चित्रपट होता. पण आपल्या बोल्ड कथानक आणि मधुर संगीत या कारणाने चांगला चालला. दुसर्या बाजूला 'सिलसिला'ला विचारणारादेखील कोणी राहिला नाही.
जर आपल्याला दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित करून त्याचा उत्सव साजरा करायचा असेल तर अमिर खानचा 'लगान' आणि सनी देओलचा 'गदर' यांचे योग्य असे उदाहरण देता येईल. दोन्हीही चित्रपट खूप चालले. पण यानंतर 'ओम शांती ओम' आणि 'सांवरिया', 'सन ऑफ सरदार' आणि 'जब तक है जान', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिलवाले' पर्यंत येता येता हे स्पष्ट झाले की, तिकिट खिडकीवर दोन मोठ्या चित्रपटांच्या सामन्यात कुणालाच फायदा होत नाही.
प्रदर्शनाच्या तारखेबाबत फक्त कलाकारच नव्हे तर निर्माता-दिग्दर्शकदेखील फारच आक्रमक झाले आहेत. ईद,दिवाळी,ख्रिसमस,26 जानेवारी,15 ऑगस्ट सारख्या सुट्टीच्यादिवशी मोठे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी गर्दी उसळलेली असते. असे दिवस प्रेक्षकांसाठीही पर्वणी ठरतात. पण सिनेसृष्टीला अशा मुकाबल्यांमुळे चांगल्या नफ्यावर पाणी सोडावे लागते. मोठा चित्रपट पहिल्या चार दिवसात शंभर कोटी कमावू शकला नाहीत, तर तो पुन्हा फायद्यात येत नाहीत. असंच काहीसं अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' आणि अजय देवगनच्या 'मैदान' बाबतीत घडणार का, हे लवकरच कळेल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
2022 मधील समोरासमोर प्रदर्शित होणारे चित्रपट
ReplyDeleteआर माधवनचा 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट' आन8 आदित्य रॉय कपूरचा 'राष्ट्रकवच ओम:द बॅटर विदिन' हे चित्रपट जुलै महिन्यात पहिल्या तारखेला आमने सामने येणार आहेत. 15 जुलैला तीन चित्रपट आमने सामने येणार आहेत. तापसी पन्नूचा 'शाबाश मिथू' राजकुमार राव-सान्या मल्होत्राचा 'हिट: द फर्स्ट केस' तर कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर यांचा "फोन बूथ' चित्रपट एकत्र रिलीज होणार आहेत.
येत्या ऑगस्ट महिन्यात आमिर खानच्या 'लाल सिंग चड्डढा' चित्रपटाची अक्षय कुमारच्या 'रक्षाबंधन' चित्रपटाशी धडक होणार आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहेत. 30 सप्टेबर हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा' आणि ऐश्वर्या रायची भूमिका असणारा 'पोन्नीयन सेल्वन' 30 सप्टेंबरला रिलीज होणार. अक्षय कुमार ऑक्टोबर महिन्यात अजय देवगणच्या चित्रपटाला धडक देणार आहे. राम सेतू आणि थँक गोंड या चित्रपटांची टक्कर 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 18 तारखेला दृश्यम2 आणि भीड हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. दृश्यम 2 मध्ये अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्या भूमिका आहेत तर अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड मध्ये राजकुमार राव आणि यांच्या भूमिका आहेत.
गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीने जगभरात आपला डंका पिटला आहे. बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकत दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात राज्य केले आहे. त्यामुळे बॉलीवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'काटे की टक्कर' सुरू आहे. सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतीक्षित 'सालार' चित्रपट 2023 वर्षी 28 सप्टेंबरला पडद्यावर येणार आहे. यामुळे आता हृतिक रोशनच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण याच दिवशी त्याचा आगामी फायटर' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ज्याचा परिणाम उत्पत्नावरही होऊ शकतो. वास्तविक, या दोन्ही कलाकारांची फॅन क्लब खूप मजबूत आहे, त्यामुळे या दोघांमध्ये 'काटे की टक्कर' होणार आहे. याशिवाय, बॉयकॉट बॉलीवूडचा ट्रेंड लक्षात घेता, बॉक्स ऑफिसवर 'सालार'चा सामना करणे, हृतिकसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकते.
ReplyDelete