संगणकावर दीर्घकाळ काम करणं ही आजच्या कार्यसंस्कृतीत एक सामान्य गोष्ट बनली आहे. ही परिस्थिती केवळ बहुतेक नोकरदार लोकांची नाही तर ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे घरून काम करत आहेत त्यांचीही आहे, ते तासनतास लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रीनवर घालवतात. तज्ज्ञांच्या मते, या नव्या कार्यसंस्कृतीमुळे लोकांचा बराचसा वेळ मानसिक दडपणाखाली जात आहे. लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टीव्हीसोबत जास्त वेळ घालवण्याची सवय किंवा सक्ती विशेषतः डोळ्यांसाठी खूप हानिकारक आहे.
आज लोक विविध कारणांमुळे स्क्रीनसमोर बसून दहा तासांपेक्षा जास्त वेळ घालवत आहेत, त्यामुळे जडपणा, थकवा, जळजळ, लालसरपणा आणि डोळे कोरडे होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर जास्त दबाव पडतो. आपण जितके जास्त स्क्रीन पाहतो तितके आपल्या डोळ्यातील ओलावा आणि उघडझाप होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे डोळ्यांना इजा होते. आयुष्यभर स्क्रीनसमोर बसून दिवस काढायचे आहेत. अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
सहसा कार्यालयातील लॅपटॉप किंवा संगणक डेस्कवरील खुर्चीपासून योग्य अंतरावर आणि योग्य उंचीवर ठेवलेले असतात. पण घरातून काम करणारे लोक लॅपटॉप कधी बेडवर तर कधी मांडीवर ठेवून काम करतात. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर खूप जोर येतो. यासोबतच चुकीच्या बसण्याच्या आसनामुळे पाठदुखीची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे घरून काम करतानाही लॅपटॉप डोळ्यांपासून योग्य अंतर आणि योग्य उंचीवर ठेवावा. यामुळे डोळ्यांवर कमी परिणाम होतो आणि शरीराची मुद्राही चांगली राहते.डोळ्यांना चष्मा लागला असेल तर चष्म्याशिवाय संगणकावर काम करू नका. तुम्ही डिजिटल सामग्री, ऑनलाइन गेम किंवा सोशल मीडियावर बराच वेळ घालवत असलात तरीही तुम्ही चष्मा घालावा. या बाबतीत घेतलेल्या निष्काळजीपणामुळे डोळ्यांच्या पाहण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. डोळ्यांना ताण पडेल, असे कोणतेही काम करू नका.
साधारणपणे एखादी व्यक्ती एका मिनिटात बारा ते पंधरा वेळा पापण्यांची उघडझाप करतो. पण आपण टीव्ही आणि मोबाईल पाहताना तीन ते चार वेळाच पापण्यांची उघडझाप करतो. पापण्यांची उघडझाप न केल्याने डोळ्यात तयार होणारा द्रव संपूर्ण डोळ्यांमध्ये पसरू शकत नाही. त्यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, असे प्रकार घडतात. हे टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे पापण्या पुन्हा पुन्हा मिचकावत राहणे. टीव्ही, मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर काम करताना सामान्यपणे डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करण्याव्यतिरिक्त, प्रत्येक तासाच्या अंतराने डोळे मोठे करून पापण्या उघडा आणि बंद करा आणि काही मिनिटांसाठी ही क्रिया पुन्हा पुन्हा करत राहा.
टेलिव्हिजन आणि मोबाईल फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाश किरणांचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यात जळजळ, जडपणा आणि कोरडेपणाच्या तक्रारी वाढतात. कोरडेपणा म्हणजे डोळ्यांत अश्रू नसणे. ही समस्या अनेक दिवस राहिल्यास डोकेदुखी देखील होऊ शकते. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्क्रीनवर थोडा कमी वेळ घालवणे. तसेच बसून डोळ्यांचा व्यायाम करावा. यासाठी दूर ठेवलेल्या वस्तूवर डोळे काही वेळ स्थिर ठेवून पाहावे,पापण्या मिठवू नयेत, असे केल्याने डोळ्यांची क्षमताही वाढते.
डोळ्यांसाठीकाही गोष्टींची खबरदारी आवश्यक आहे. लॅपटॉप, मोबाईल आणि कॉम्प्युटरवर काम करताना खोलीत पुरेसा प्रकाश ठेवा, अन्यथा डोळ्यांवर अनावश्यक ताण पडेल. दिवसातून चार ते पाच वेळा डोळ्यांवर पाणी मारावे. हे दररोज सकाळी म्हणजेच दात स्वच्छ करताना केले पाहिजे. तसेच, डोळे वारंवार चोळू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या औषधांचे थेंब डोळ्यांमध्ये घालू नका. डोळ्यांना खाज सुटणे किंवा इतर समस्या असल्यास डॉक्टरांना नक्की भेटा.
(हा लेख फक्त सामान्य माहितीच्या आधारे आणि जागरुकतेसाठी आहे. उपचारासाठी किंवा आरोग्याशी संबंधित सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.)-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment