Wednesday, March 2, 2022

सांगली साहित्याचा वटवृक्ष

 


(मेघा पाटील यांच्या 'सुलवान' कादंबरीचे प्रकाशन जळगाव येथील पहिल्या राज्यस्तरीय शिव बाल-किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात झाले.)

 मराठी साहित्य क्षेत्रावर सांगली जिल्ह्याने स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे.ती अगदी ज्ञानपीठ पुरस्कारापासून ते  साहित्य अकादमीपर्यंत. आज सांगली जिल्हा म्हणजे साहित्यिकांचा वटवृक्ष बनला असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ.तारा भावाळकर यांनी केलं आहे. ते योग्यच आहे कारण जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून सकस लेखन केले जात आहे. हे क्षेत्र चांगलं विस्तारलं आहे. कृष्णाकाठची माती साहित्य निर्मितीसाठी सुपीक आहे. हा वसा पुढे चालूच ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुण साहित्यिक आणि लेखकांवर आहे आणि हा वारसा आजची पिढी धडाडीने चालवताना दिसत आहे.  जिल्ह्यात कुठे ना कुठे साहित्य ,कवी संमेलने होत आहेत.पुस्तक प्रकाशनाचे सोहळे पार पडत आहेत.

गेल्या महिन्यात कवी दयासागर बन्ने यांच्या 'समकालीन साहित्यास्वाद' या समीक्षात्मकपर ग्रंथाचे प्रकाशन सांगली येथे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्याहस्ते झाले. श्री. बन्ने हे शालेय जीवनापासून म्हणजे साधारण 1990 पासून काव्य लेखन करत आहेत. त्यांची आतापर्यंत पाच काव्यसंग्रहे प्रकाशित झाली आहेत. कवी ,लेखक मंडळींना सोबत घेऊन बन्ने जिल्ह्यातील चळवळ पुढे नेत आहेत. वास्तविक कवी आत्ममग्न असतात. स्वतःच्या प्रेमात पडलेले असतात. आपल्यापालिकडे जाऊन आपल्यासारखे लेखकमित्र,कवी काय लिहीत आहेत, कसे लिहीत आहेत, त्यांच्या लेखनाचे-शोधाचे स्वरूप कसे आहे,याची दखल या कवींना घ्यावीशी वाटत नाही.मात्र श्री. बन्ने यांनी स्वतः निर्मितीशील असूनही स्वतःच्या पलीकडे जाऊन आपल्या परिसरातील लेखक-कवींच्या लेखनाचा आस्वाद अत्यंत सहृदयतेने आणि आस्थेने घेतल्याचे दिसते. त्यांच्या समीक्षात्मक पुस्तकात परिसरातील 43 लेखक- कवींच्या पुस्तकांची दखल घेतली आहे.

इस्लामपूर येथील डॉ. सायली पाटील यांच्या 'प्रेमवीरा' कवितासंग्रहाचे प्रकाशन अलीकडेच झाले. मुख्यतः प्रेम हा या संग्रहाचा आत्मा असून लयबद्धता, सुसंवाद आणि सृजनशीलता घेऊन येणाऱ्या कविता असल्याचे प्रतिपादन अभ्यासक प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी केले आहे. प्रतिभा बुक्सतर्फे प्रकाशित काव्यसंग्रहात शालेय जीवनापासून ते संसारापर्यंतचा प्रवास आला आहे. दैनिक पुढारीच्या 'बहार' पुरावणीचे संपादक ,पत्रकार आणि लेखक श्रीराम पचिंद्रे यांच्या 'डोळे आणि दृष्टी' या पुस्तकाचेही प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भावाळकर यांच्याहस्ते सांगलीत झाले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सांगलीतल्या मालू हायस्कूलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सौ. वंदना हुलबत्ते यांच्या 'चिंगीचं गणित' पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

गेल्या महिन्यात आटपाडीचे निवृत्त प्राध्यापक विश्वनाथ जाधव यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले.'वळण वाट' या आत्मचरित्रासह 'जगावेगळी माणसं' , 'विश्व साहित्यातील मानदंड' या चरित्रात्मक लेखन आणि 'श्रीमंत बाबासाहेब देशमुख' हे चरित्र प्रकाशित झाले. यावेळी बोलताना आटपाडी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले की माडगूळकर बंधू, शंकरराव खरात यांच्या लेखन परंपरेनंतर माणदेशी लेखक सकस लिहीत आहेत व वाचत आहेत,याचा अभिमान आहे. आण्णासाहेब कांबळे यांच्या सामाजिक संदेश देणाऱ्या 'अग्रणीकाठ' कथासंग्रहाचे प्रकाशन सावळज (ता.तासगाव) येथे कवी सुभाष कवडे आणि युवा नेते रोहित पाटील यांच्या उपस्थितीत झाले.

आटपाडीच्या मेघा पाटील यांच्या 'सुलवान' या माणदेशी कादंबरीचे प्रकाशन परवाच जळगावला झाले. स्त्रीचा विविध पातळीवरचा संघर्ष नेमकेपणाने मांडणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी अभावग्रस्त माणदेशी माणूस, पशुजन्य संस्कृतीमध्ये चित्रित होते. स्त्रीच्या जीवन विश्वाला कवेत घेते. माणूस, शेती, परिसर आणि राहणीमान याला माणदेशीपणाचा रंग, गंध आणि एक वेगळा बाज असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते. स्त्री संघर्ष, तिचे मोडून पडणे, पुन्हा नव्याने उभे राहणे. ही वहिवाट जपणाऱ्या स्त्रिया ग्रामीण संस्कृतीचा आधार आहेत. याचे नेमके चित्रण यात दिसते. मेघा पाटील यांची 'पुढचं पाऊल' काव्यसंग्रह, 'आलकीचं लगीन' कथासंग्रह , आणि 'उंबरठ्यावरचा नाल', 'विस्कटलेली चौकट' या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महात्मा गांधी ग्रंथालय  व शब्दवैभव साहित्यमंच (सांगली) यांच्या संयुक्तविद्यमाने 'काव्यधारा' संमेलन पार पडले. उज्ज्वला केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनात गौतम कांबळे, आनंदहरी, सुहास पंडित, विनायक कुलकर्णी,  सिराज शिकलगार, डॉ. सोनिया कस्तुरे, संजीवनी कुलकर्णी, शांता वडेर, सुधा पाटील, वंदना हुलबत्ते, डॉ. स्वाती पाटील ,स्मिता जोशी, प्रतिभा पोरे, मुबारक उमराणी यांनी सहभाग घेतला होता.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे देण्यात येणारा जगद्गुरु तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांना जाहीर झाला आहे. भाषेच्या अंतरंगात शिरणारे सत्यशोधक साहित्यिक, भाषांतरकार, अभ्यासक अशी श्री. पाटील यांची ओळख आहे. त्यांच्यासोबतच देशिंग हरोलीच्या मनीषा पाटील यांना  व राजेंद्र दिनकर पाटील (मळणगाव). सरोजिनी बाबर गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. जत तालुक्यातील शेगावच्या महादेव बुरुटे यांना जत मराठी परिषदेचा साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त झाला. मिरज येथील शिक्षिका आणि कवयित्री मनीषा रायजादे-पाटील यांच्या 'काव्यमनीषा' या पहिल्यावहिल्या काव्यासंग्रहाला फलटण येथील धर्मवीर छत्रपती महाराज राज्यस्तरीय संमेलनात पुरस्कार मिळाला आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली




No comments:

Post a Comment