Sunday, August 14, 2022

'विचारांच्या प्रदेशात' पुस्तकाच्या निमित्ताने...




आपल्या देशात सर्वाधिक चर्चा राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा यांची होते. टीव्ही चॅनेल्सवर तर सतत राजकारणाचाच रतीब घातला जातो.यामुळे होते काय की, देशाच्या प्रगतीच्या मुद्द्यांना हातच घातला जात नाही आणि मग हे विषय मागे पडतात.  कला, विज्ञान , आरोग्य व अन्य विकासात्मक प्रगतीविषयक मुद्दे, उद्योग-व्यवसाय यांच्या यशाची चित्रे लोकांसमोर येत नाहीत. 'संस्कार' नावाची चीज तर आपल्याला पुस्तकांशिवाय कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे आजचा तरुण भरकटला आहे. त्यांना योग्य दिशेची आवश्यकता आहे. पण त्यांना ती कुठेच भेटत नाही. मोबाईलवेड, गुन्हेगारी वाढत चालली आहे. बेरोजगारी, महागाई यांची भयानकता टिपेला पोहचली असली तरी त्याची चर्चा होताना दिसत नाही. देशातील परिस्थिती पार बदलून गेली आहे. देशात अनेक समस्या, प्रश्न, विकासातील अडथळे असतानाही याचे गांभीर्य कुणालाच नाही. आपण काही क्षेत्रात निश्चित प्रगती करत असलो तरी कित्येक क्षेत्रात आपण अजूनही खूप मागे आहोत.पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यावरण, डिझिटल तंत्रज्ञान साक्षरता, सायबर साक्षरता, डिझिटल अर्थव्यवस्था याची जाण याबाबतीत आपण म्हणावी अशी प्रगती नाही केलेली. यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. 

महिलांच्या तर अनेक समस्या आहेत. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही की, तिथे महिलांचा शिरकाव झालेला नाही. पण तरीही त्यांच्या समस्या आहेतच. त्यांना अजून म्हणावी अशी मोकळीक ना कुटुंबात मिळाली आहे ना बाहेर. घरात आणि बाहेर लैंगिक अत्याचार थांबलेला नाही. सोशल मिडियावरदेखील त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. संयुक्त राष्ट्रच्या एका अहवालानुसार देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातल्या पस्तीस टक्के महिला कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडत आहेत. 'आर्थिक विकास आणि महिला' हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. महिलांच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यांना मोठ्या संख्येने तेव्हा बळ मिळेल,जेव्हा अशा सुशिक्षित मुली स्वतः हून पुढे येऊन त्यांच्या तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवस्थापनाच्या आस्थापनात काम करतील, तेव्हाच महिलांच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यांना महत्त्व येईल. समाजाच्या आर्थिक विकासात महिलांचे योगदानही वाढेल. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सुमारे 55 कोटी महिला आणि मुले आपल्या कुटुंबातील कमावत्या सदस्यांवर अवलंबून आहेत. यामध्ये घरगुती महिलांची संख्या मोठी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवलंबितांची संख्या हे अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे. ही आर्थिक विषमता भारताच्या सर्वांगीण आर्थिक विकासात मोठा अडथळा ठरत आहे. आज महिलांनी काम करून कुटुंबाला हातभार लावण्याची आवश्यकता आहे. महिला, मुलींना व्यवसाय, उद्योग प्रशिक्षण विशेषतः ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मोठे ध्येय बाळगणाऱ्या मुलींना त्यांच्या इच्छेनुसार आधुनिक व्यवसाय शिक्षण मिळायला हवे. ते मोफत हवे. 

राजकारणातही स्त्रिया मागे आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिलांना स्वतः हून कारभार चालवण्याची अनुमती नाही. त्यांचे पतीदेव, मुलगा किंवा नातेवाईक हेच कारभार पाहत असतात. प्रत्यक्ष राजकारणात महिलांना स्थान दिले जात नाही. निर्णय प्रक्रियेतही सामावून घेतले जात नाही. म्हणजे लोकांमधून निवडून आलेल्या महिलांना त्यांचे स्वतःचे काम घरातले लोक करू देत नाहीत. आमदार, खासदारकीलाही महिलांचा सहभाग फारच कमी आहे. राजकीय पक्षच त्यांना देशाच्या राजकारणात येऊ देत नाहीत. आरक्षण किंवा अन्य कारणांमुळे स्वतःवर गंडांतर आल्यावरच पुरुष मंडळी घरातल्या महिलांना राजकारणात पुढे आणतात. तोपर्यंत त्यांना किंमत दिली जात नाही. विधानसभा, लोकसभा यात महिलांना 33 टक्के आरक्षण हा मुद्दा कित्येक वर्षे रेंगाळला आहे.भारतीय राजकारणात महिलांचे स्थान भक्कम होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सद्या कौशल्याधारीत शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. पण ते पेलण्याची क्षमता आमच्या शिक्षण संस्थांमध्ये नाही. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. डिझिटल शिक्षणात आपण अजून खूपच मागे आहोत. ग्रामीण भागात तर इंटरनेट सुविधा ,त्याचा वेग देशाची लाज काढणारा आहे. इंटरनेट वेगाबाबत आपल्या शेजारचा पाकिस्तान देश आपल्या पुढे आहे. ग्रामीण जीवन समृद्ध करायचा असेल तर शिक्षण, आरोग्य, डिझिटल व्यवस्था यावर भर दिला गेला पाहिजे. ग्रामीण भागात कृषी आधारित उद्योग-व्यवसाय उभारले गेले पाहिजेत. 

देशभरात झपाट्याने विस्तारत चाललेल्या ऑनलाईन व्यवसायाला प्रथमच कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. यात ग्राहकांचे हित पाहण्यात आले आहे. मात्र नोकर भरती नसल्याने कायद्यांची अंमलबजावणी कठीण झाली आहे. देशातील विविध खात्यातील रिक्त जागा भरल्या न गेल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. भरती नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. देशात अनेक क्षेत्रात डिझिटलीकरण वाढले आहे,तसे फसवणूक आणि सायबर हल्लेही वाढले आहेत. एका सव्हेक्षणानुसार देशातल्या 61 टक्के संस्था आणि उद्योगधंद्यांच्या विकासावर सायबर हल्ल्याचा परिणाम झाला आहे. याचा आर्थिक फटका त्यांना सोसावा लागला आहे. त्याचबरोबर बँकांसमोरही अनेक आव्हाने आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत अमेरिका आणि चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. आज भारतातील मोठी संख्या डिझिटल जीवन जगत आहे. बहुतांश लोक बँकेसंबंधीच्या गोपनीय माहितीबाबत बेफिकीर आहेत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

पर्यावरण हा देशापुढील आणि जगापुढील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जगभरातील 180 देशांचा 2022 या वर्षासाठीचा पर्यावरण कामगिरी निर्देशांक अमेरिकेतील संस्थांनी जाहीर केला असून या यादीत भारत तळाला आहे. हे काही भूषणावह नाही. भारतात हवेचा दर्जा धोकादायक बनत असून वेगाने वाढणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे देश पहिल्यांदाच यादीत शेवटच्या क्रमांकावर गेला आहे. अमेरिकेतील येल येथील पर्यावरण कायदा आणि धोरणासाठीचे केंद्र, आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान माहिती नेटवर्क केंद्र आणि कोलंबिया विद्यापीठाने ही यादी जाहीर केली आहे. हवामान बदलामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे यांचे प्रमाण वाढले आहे.  प्रदूषण आहे. त्यातून उद्धभवणारे आजार आहेत. त्यातून मृत्यू जवळ येत आहे. या क्षेत्रात आपल्याला खूप काम करावे लागणार आहे.

या पुस्तकात विविध लेखांच्या माध्यमातून वरील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. आपल्या देशात व्यसनाधीनता वाढली आहे. झोपेचं खोबरं झालं आहे. औषधोपचार महाग झाला आहे. बालमजुरी, कुपोषण या समस्या व्यापक स्वरूपात पुढे येत आहेत. शेती विषयक उत्पादनांची निर्यात वाढली असली तरी अप्रत्यक्षरित्या आपण पाण्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहोत, हा मुद्दा प्रामुख्याने इथे चर्चिला गेला आहे. याचा विचार झाला पाहिजे. तेलसंकटामुळे महागाई वाढली आहे. रस्त्यांच्या प्रश्नांमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. देशातल्या अनेक छोट्या नद्या लुप्त होत असताना त्या पुनर्जीवित करण्यासाठी होत असलेले प्रयत्न आशादायक आहेत,पण त्याचा वेग मंद आहे. अपारंपरिक ऊर्जा अजून म्हणावी अशी गती पकडताना दिसत नाही. ग्राहक हिताचे कायदे करूनही फसवणूक, लूट, भेसळ थांबलेली नाही. कुशल मनुष्यबळ शहरात किंवा परदेशात स्थलांतर करत आहेत. विज्ञान क्षेत्रात आपण पिछाडीवर आहोत या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे. वाचकांना देशापुढील समस्या समजाव्यात आणि त्यातून काहीतरी सकारात्मक पावले उचलली गेली पाहिजेत.हा उद्देश यामागे आहे. 

अलीकडच्या दीड-दोन वर्षातील हे लेख संग्रहित केले आहेत. दैनिक लोकशाही वार्ता (नागपूर), दैनिक सुराज्य (सोलापूर), दैनिक ललकार (सांगली) आणि दैनिक संकेत टाइम्स (सांगली) मध्ये लेख प्रसिद्ध झाले आहेत. पुस्तक रूपाने आलेल्या या लेखांवर वाचक मंथन करतील, अशी अपेक्षा आहे. हे माझे दहावे पुस्तक प्रकाशित होत आहे,याचा मला अतीव आनंद झाला आहे. यापूर्वी व्यक्तिचित्रे, बालकथा, रहस्यकथा पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आहेत हे पुस्तकही आपल्याला भावेल, याची मला खात्री आहे. या पुस्तकाला प्रस्तावना आमचे मित्र आणि पत्रकारांसाठी अहोरात्र झटणारे आणि 'दैनिक तरुण भारत'ची संपादकीय सांभाळणारे  शिवराज काटकर यांची लाभली आहे. पत्रकारांना नेहमीच मदतीचा हात देणारे काटकर सर आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे मनापासून आभार. आमचे मित्र आणि दैनिक तरुण भारत'चे जत तालुका प्रतिनिधी किरण जाधव आणि ज्येष्ठ कवी, आमच्या साहित्य सेवा मंचचे संस्थापक सदस्य लवकुमार मुळे यांचेही या पुस्तकासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. ही माझी मित्रमंडळी असली तरी त्यांचेही आभार मानणं इथे महत्त्वाचं आहे.  अक्षरशिल्प प्रकाशनचे वि. ना. राऊत यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाला लगेच होकार दिला आणि अल्पावधीतच पुस्तक हातात दिले. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!

-मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment