हिंदी चित्रपटसृष्टीचा देशभक्ती' हा विषय आवडता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीपासून ते आजपर्यंत देशभक्ती सांगणारे असंख्य चित्रपट आले. प्रेक्षकांनीही त्याला पसंदी दिली,हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मनोजकुमार यांचे अनेक देशभक्तीवरचे चित्रपट आले. 'शाहिद', 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'देशवासी' यासारखे अनेक देशभक्तीपर चित्रपट गाजले. त्यामुळे त्यांना मनोज नाहीतर 'भारतकुमार' म्हटले जाऊ लागले. आज काळ बदलला तशी देशभक्तीची व्याख्याही बदलली. पण रसिकांनी हा बदलही स्वीकारला. शौर्यगाथा मात्र त्यांना अधिक भावल्या. देशभक्ती म्हणजे बॉर्डरवरील ऐतिहासिक युद्धपट किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा संघर्ष नव्हे. सध्याच्या काळात विविध घटकांवर होणारा अन्याय-अत्याचार, भ्रष्ट कारभार मोडून काढणे हीसुद्धा एक देश सेवाच मानली जाते. त्यामुळे सलमान खान यांचे 'जय हो' सारखे चित्रपटही याच पठडीत येतात.
1945 मध्ये 'किस्मत' आला होता. या चित्रपटातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है' हे गीत प्रचंड गाजले होते. त्यावेळी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. 1997 मध्ये आलेल्या जे. पी. दत्ता यांच्या 'बॉर्डर' चित्रपटाने मोठा भाव खाल्ला.या चित्रपटातील गाणी विशेषतः 'संदेसे आते हैं...' हे गाणे आजही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वाजवले जाते. या चित्रपटाचा सीक्वेन्स खरा वाटावा यासाठी दत्ता यांनी भारतीय सैनिकांचीही मदत घेतली होती आणि त्यांनाही चित्रपटात सामिल करून घेतले होते. एवढेच नाही तर एमएमजी रायफल, एलएमजी रायफल, रॉकेट लाँचर, 393 रायफलही वापरण्यात आली. ही शस्त्रे अस्सल होती, जी जे.पी. दत्ता यांनी विनंती करून ती शिपाई आणि प्रशासनाकडून मिळवली होती. असे म्हणा की 'बॉर्डर'मधील बहुतांश सैनिक आणि शस्त्रे खरी होती. 2003 मध्ये आलेला 'एलओसी कारगिल' या चित्रपटानेही लोकप्रियता मिळवली. भगतसिंग ही चित्रसृष्टीची आवडती व्यक्तिरेखा. त्यांच्यावर 2002 मध्ये अजय देवगणचा 'द लिजेंड ऑफ भगतसिंग', बॉबी देओल आणि सनी देओल यांचा '23 मार्च 1931 शहीद' हे दोन चित्रपट आले. मात्र अजय देवगणच्या चित्रपटाने बाजी मारली. 1965 साली एस.राम शर्मा यांनी भगतसिंग यांच्या आयुष्यावर 'शहीद' चित्रपट बनवला. 1962 साली चेतन आनंद यांचा 'हकीकत'आला. धमेन्द्र आणि संजय खान यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. भारत-चीन युद्धावर हा चित्रपट आधारला होता. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या तंत्रज्ञानात म्हणावी तशी प्रगती झाली नव्हती पण तरीही चेतन आनंद यांनी युद्धाचे प्रसंग अतिशय सुरेखपणे चित्रित केले होते. त्यामुळे हा चित्रपट आजही सर्वोत्तम युद्धपट म्हणून गणला जातो. यातील 'कर चले हम फिदा' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहे. मदर इंडिया, सात हिंदुस्थानी, नया दौर, दीवार, लेट्स ब्रिन्ग अवर हिरोज बॅक,1971 अशा चित्रपटांमधूनही चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्रकारे देशभक्ती पडद्यावर आणली.
1965 मध्ये मनोजकुमार यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांचे जीवन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणले. आजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आला की, 'मेरे देश की धरती' हे गाणे वाजते. हे. क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जीवनावर राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी 2002 मध्ये आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यापैकी संतोषींच्या दि लिजंड ऑफ भगतसिंग' या चित्रपटामधील भगतसिंगांच्या व्यक्तिरेखेने अभिनेता अजय देवगणला त्याच्या कारकिर्दीमधील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता.
झांसी की रानी (1953) हा सोहराब मोदी यांनी त्यांच्या मिनर्व्हा मूव्हीटोन प्रोडक्शन बॅनरसाठी निर्मित आणि दिग्दर्शित केलेला भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाला भारतात बनवलेला पहिला टेक्निकलर चित्रपट म्हणून श्रेय दिले जाते. त्यात मोदींची पत्नी मेहताब यांनी मुख्य भूमिकेत तर मोदींसह त्यांचे मार्गदर्शक, राजगुरू यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनय केला होता. हा चित्रपट इंग्रजीमध्ये 'द टायगर अँड द फ्लेम' म्हणून डब करण्यात आला होता, जो 1956 मध्ये त्याच स्टार कास्टसह प्रदर्शित झाला होता. अगदी अलिकडे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर कंगना राणावतने 'माणिकर्णिका' चित्रपट बनवला.
स्वातंत्र्य चळवळीतील व्यक्तिमत्त्वांवर बनलेल्या चित्रपटांमध्ये 'गांधी' (1982) हा चित्रपट सर्वाधिक वरचढ ठरला. महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारलेला रिचर्ड अटनबरो यांनी बेन किंग्जले यांना घेऊन 'गांधी' चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने जगभर वाहवा मिळवली. मोठे कौतुक झाले.शिवाय त्या वर्षी 11 पैकी तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने पटकावले.
मनोजकुमार यांच्याप्रमाणे दिग्दर्शक केतन मेहता यांनाही देशभक्तीवरील चित्रपटांचे विशेष आकर्षण आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचे आयुष्य त्यांनी 1993 मध्ये 'सरदार' चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणले. या चित्रपटामध्ये सरदार पटेलांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता परेश रावलचे विशेष कौतुक झाले होते. मेहतांनी कालांतराने आमीर खानला घेऊन 1857 मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या बंडाचा थरारक इतिहास 'मंगल पांडे - द रायजिंग' या चित्रपटाद्वारे दाखवला होता. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर दिग्दर्शक श्याम बेनेगलांनी तयार केलेला “नेताजी - द फरगॉटन हिरो' (2004) हा चित्रपटदेखील उत्तम बनला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाची दखलही निर्माते सुधीर फडके यांनी एका मराठी चित्रपटाद्वारे घेतली होती. डॉ. जब्बार पटेल यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर अतिशय सुंदर असा चित्रपट बनवला होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटना या चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांसमोर आल्या होत्या.
'सरफरोश' (1999) हा एकमेव चित्रपट होता ज्याने आमिरची चॉकलेटी हिरोची प्रतिमा तोडली. यात त्याने एसीपी अजयसिंग राठोडची भूमिका साकारली होती, जो अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध लढतो. या चित्रपटात आमिरशिवाय नसीरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
जॉन मॅथ्यू दिग्दर्शित 'सरफरोश' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. एक भारतीय पोलीस अधिकारी दहशतवादाला रोखण्याचा कसा प्रयत्न करतो आणि एकट्याने कसा मुकाबला करतो आणि संपूर्ण व्यवस्थाच बदलून टाकतो असे चित्र त्यात दाखवले होते. हा चित्रपट कारगिल युद्धापूर्वी 30 एप्रिल 1999 रोजी प्रदर्शित झाला होता.अलीकडच्या काळात उरी येथील पाकिस्तानच्या लष्करी तळावर भारताने केलेला हल्लादेखील प्रभावीपणे चित्रपटामधून पाहायला मिळाला होता. भारत-पाकिस्तानमधील 1971 च्या युद्धाची पार्श्वभूमी घेऊन बनविलेल्या 'द गाझी अटॅक' या चित्रपटानेदेखील 18 दिवस समुद्रात चाललेल्या थरारावर प्रकाशझोत टाकला होता.
2001 साली सनी देओलचा 'गदर एक प्रेमकथा', अमीर खानचा 'लगान' प्रदर्शित झाला. 'गदर'मध्ये प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानात जाऊन तिथले सरकार हलवणारा सनी आणि 'लगान' मध्ये आपली जमीन मिळवण्यासाठी इंग्रजांबरोबर आपल्या साथीदारांसह क्रिकेट खेळणारा अमीर लोकांना भावला. दोन्ही चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली. नंतरच्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि देशभक्तीचा वेगळा दृष्टिकोन ठेवून निर्माता दिग्दर्शकांनी वेगवेगळे चित्रपट बनवले. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'रंग दे बसंती' आणला. आजच्या पिढीतील सहा युवक कशा पद्धतीने भ्रष्ट व्यवस्थेशी लढा देतात ही शौर्यगाथा दाखवली आहे. ही कथा फुलवताना दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्या पात्रांचा उपयोग केला आहे. अशाच प्रकारच्या कमल हसन यांचा 'हिंदुस्थानी' (1996), स्वदेश (2004), तिरंगा, प्रहार, क्रांतीवीर, कोहराम (नाना पाटेकर), जमीन (अजय देवगन), परमाणू, रोमिओ अकबर वॉल्टर (जॉन अब्राहम) हे देशभक्तीपर चित्रपट गाजले.'अ वेन्स्डे' या मध्ये सामान्य माणूस जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थाच हादरवून टाकण्याची क्षमता ठेवतो हे दाखवून दिलं आहे. 'रोजा', '1942 अ लव्हस्टोरी', 'पुकार', 'लक्ष्य', यांतील शौर्यगाथा रसिकांना आवडल्या. खिलाडी अक्षयकुमार हा अलीकडचा 'भारतकुमार' म्हटला पाहिजे. त्याच्या हॉलिडे, बेबी, नाम शबाना, गब्बर, एअरलिफ़्ट, केसरी, मिशन मंगल, टॉयलेट एक प्रेमकथा, सूर्यवंशी आदी चित्रपटांमधून देशभक्ती डोकावते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
ReplyDelete२००७ मध्ये प्रदर्शित झालेला '१९७१' हा चित्रपट १९७१ मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधलं युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती या सत्यघटनेवर आधारित होता. युद्ध थांबलं. बंदी सैनिकांना आपापल्या देशात पाठवलं. पण पाकिस्तानने अनेक हिंदुस्थानी सैनिकांना त्यांच्याकडे कैदी म्हणूनच ठेवलं होतं. त्यांचे कोणतेही रेकार्ड ठेवले नव्हते. पाकिस्तानच्या कैदेतून हिंदुस्थानी सैनिकांच्या पलायनाची कथा म्हणजेच १९७१! रोमहर्षक चित्रपट असूनही तो यशस्वी झाला नाही. जे चांगलं आहे ते लोकांसमोर कधी ना कधी येतंच. तेरा वर्षीनंतर, कोरोना काळात या चित्रपटात मेजरची प्रमुख भूमिका करणाऱ्या मनोज वाजपेयीने चित्रीकरणादरम्याय त्याला आलेले अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टमुळे चमत्कार घडला आणि कोरोना काळात ५० लाख प्रेक्षकांनी हा चित्रपट 'ओटीटी'वर पाहिला. १९७१ चं वैशिष्ट्य म्हणजे काय घडलं ते उत्तम प्रकारे दाखवलं. लोकेशन या चित्रपटाचा प्राण होता. पाकिस्तानचा भाग म्हणून मनालीजवळचा परिसर यात दाखवला आहे जो प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिला नव्हता. उंच बर्फाच्छादित पर्वतरांगा, निसरडे रस्ते. खोल दऱ्या. डोंगररांगातली घरं. देवदार वृक्षांची जंगलं... हिंदुस्थानचं भौगोलिक आणि प्राकृतिक सौंदर्य कथेच्या सादरीकरणाची उंची वाढवणारं होतं.
सलमानच्या 'बजरंगी भाईजान' यातही कश्मीरमधल्या अस्पर्शित हिंदुस्थानचं दर्शन घडतं, जी पाहणाऱ्याच्या मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण करते. २०२ १ मध्ये आलेला 'शेरशाह' म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित कारगिल युद्धाची शोर्यगाथा होय. याही चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले. कॅप्टन बत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राने जान ओतली. यात कॅप्टन विक्रम बत्रांचे प्रभावी प्रेरणादायी संवाद आहेत जे कोणत्याही संवाद लेखकाने लिहिलेले नसून स्वतः कॅप्टन विक्रम बत्राचे मूळ संवाद आहेत. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर कणखर पर्वतरांगा पाहात. संवादातून आपल्यासमोर येणारा कॅप्टन विक्रम बत्रा, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान होतो. प्रत्येक सैनिकाला मृत्यू यावा तर तो देशासाठी असं वाटतं. ही एक विलक्षण देशभक्तीची भावना कुठेतरी प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतेच. आपणही देशासाठी लढावं असं वाटायला लागतं.
२०१७ मध्ये आलेला. १९७१ च्या हिंदुस्थान पाकिस्तान युद्धावर आधारित 'गाझी' हा पहिला अंडरवाटर चित्रपट प्रेक्षकांनी बऱ्यापैकी स्वीकारला. १९७१ मध्ये पाण्यात झालेलं हे युद्ध, इतिहासातला महत्त्वाचा दुवा या चित्रपटामुळे आपल्यासमोर आला. के. के. मेनन याने साकारलेला अत्यंत कठोर पण हुशार, चाणाक्ष कॅप्टन रणविजय सिंह त्याच्या संवादातून, करड्या आवाजातून, डोळ्यातल्या भावातून, मनाच्या अस्वस्थतेतून अप्रतिमरीत्या अवतरतो. त्याचे टाळ्या घेणारे. देशभक्ती जगणारे संवाद अतिशय अप्रतिम आहेत. आक्रमक देशभक्ती. युद्ध आणि प्रशासनातला संघर्ष आपल्यासमोर हा चित्रपट आणतो.
२६/११'चा अतिरेकी हमला सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यातल्या रेस्क्यू आपरेशनमध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित 'मेजर' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित करून टाकली. प्रेक्षक जेव्हा चित्रपटावर प्रेम करतात. रडतात, मातृभूमीसाठी सेनिक व्हायला तयार होतात. तेच त्याचं यश असतं.
'मेजर' इतकाच समान विकी कौशलच्या 'उरी' या सर्जिकल स्ट्राइकवरील चित्रपटाला लाभला. सर्जिकल स्ट्राइक म्हणजे नेमकं काय, त्यामागचं प्लॅनिंग सरकारचं धोरण, मिलिटरीचं धोरण कसं असतं... अश्या कितीतरी गोष्टीची विस्तृत माहिती या चित्रपटामुळे लोकांना समजली. थिएटर प्रेक्षकांनी भरलं नव्हतं तर देशभक्तीने भारावलेलं होतं.
नाना पाटेकरच्या प्रहार' चित्रपटात त्याचा एक संवाद होता. 'मै समजता हू आर्मी ट्रेनिंग हरेक के लिये कम्पल्सरी होनी चाहिये. कम से कम जिंदगी का एक साल देश के लिये देना चाहिए...' आज 'प्रहार'ला ३१ वर्ष झाली आहेत. पण या संवादाकडे अजूनही कोणाचं लक्ष गेलं नाही. हा विचार त्या चित्रपटासारखाच काळाच्या पडद्यावर राहिला. पण अजूनही वेळ गेलेली नाही. देशभक्तीचा महायज्ञ करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि त्यासाठी चित्रपट हे माध्यम नक्कीच उपयोगी ठरणारं आहे.