सध्या क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेड लागले आहे, तर दुसरीकडे आयपीएलमधील ऑनलाइन सट्टेबाजी उधाण आले असून त्या माध्यमातून तरुणांना देशोधडीला लावलं जात आहे. ऑनलाइन बेटिंगच्या चक्रात अडकून तरुण चुकीच्या मार्गावर चालू लागले आहेत. संपूर्ण देशात साधारण हीच परिस्थिती आहे. राज्यस्थानातील काही भागात मोठी कारवाई करण्यात आली. आयपीएल दरम्यान रतलाम रेंजमध्येच 400 कोटी रुपयांची सट्टेबाजी झाल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये रतलाममधून 201 कोटी, मंदसौरमधून 125 कोटी आणि नीमचमधून 52 कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. अलीकडच्या गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश छत्तीसगड, हरियाणा आदी राज्यांमध्ये सट्टे बाजारावर कारवाई करताना पोलिसांना हा सगळा खेळ ऑनलाईन चालत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ऑनलाइन अॅप्सच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही राज्यात वेबसाईट द्वारा सट्टा बाजार बहरला असल्याचे आढळून आला आहे. केवळ 15 हजारात वेबसाईट तयार करून यातले लोक खोऱ्याने पैसा कमवत आहेत आणि युवा पिढीला देशोधडीला लावत आहेत. हे अवैध धंदे थांबण्याऐवजी अधिक फैलावत आहेत, ही खरे तर चिंताजनक बाब आहे. ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या टोळ्या निर्भयपणे सार्वजनिक ठिकाणी बेटिंगचा खेळ करताना दिसत आहेत. सुरुवातीला अल्प रक्कम गुंतवून भरमसाट नफ्याची लालूच दाखवून बुकी तरुणांना फसवत आहेत. अनावश्यक गरजा, अनावश्यक छंद आणि पटकन श्रीमंत होण्याची हौस अशी काहीतरी स्वप्नं दाखवून , असे काही तरी त्यांच्यात बिंबवून बुकी याचा फायदा घेत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक पातळीवर आहे. पोलिसांचे तर्क काहीही असो, पण या काळ्या धंद्यावर नजर ठेवून कारवाई करणे ही पोलिसांचीही जबाबदारी आहे. शहरांमध्ये, हॉस्पिटल्स, मॉल्स, पार्क्स, बस स्टँड्स, कॅब, ऑटो, चहाचे ट्रे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या बाहेर संशयास्पद व्यक्ती कॉपी, पेन, तीन-चार मोबाइल घेऊन उभी असेल, तर सट्टेबाजीचा अंदाज येतो. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यांजवळही बेधडक सट्टा सुरू आहे. हे सर्व पोलिसांच्या 'नाक के नीचे' होत असेल, तर यापेक्षा चिंताजनक गोष्ट काय असू शकते? जुगारी आणि बुकी पोलिसांच्या नजरेतून सुटतील, अशी कल्पना करणे व्यर्थ आहे. हे फक्त सट्टेबाजीबद्दल नाही! चुकीच्या वाटेवर चालणारी आणि विनाशाच्या खाईत जाणारी तरुण पिढीचा प्रश्न आहे. तरुण हे देशाचे भविष्य आहे. हे भविष्यच जर गुन्हेगारीच्या दलदलीत अडकत असेल तर भविष्यात देशाचं काय होईल, याचा अंदाज बांधायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज लागत नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी केवळ सट्टेबाजांवर कडक कारवाई करू नये, तर सर्वसामान्य नागरिकांनीही अशा संशयास्पद हालचालींची माहिती जबाबदार व्यक्तींपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून तरुणांना घाणेरड्या या चक्रव्यूहात अडकण्यापासून रोखता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment