आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेक चुका करतो. चुका इतक्या वाईट नसतात, जितक्या त्यांना आपण मानतो. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. सकारात्मक पैलूंकडे लक्ष दिलं तर नकारात्मकतेतही कुठेतरी आशेचा किरण दिसून येतो. चुकीची सकारात्मक बाजू म्हणजे चूक हाच आपल्या यशाचा खरा आधार आहे.हे विचित्र वाटेल पण हे कटू सत्य आहे. वास्तविक, चुका होणे ही स्वाभाविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे.आपल्या घरात-कुटुंबात, समाजात, ऑफिसमध्ये चुका करणाऱ्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जाते. कधी त्याची खिल्ली उडवली जाते तर कधी त्याच्यावर उपरोधाचे तीक्ष्ण बाण सोडले जातात. यामुळेच चूक करणारा माणूस स्वतःकडेही संशयाने पाहू लागतो. कधी कधी त्याला अपराधीपणा जाणवतो.
जेव्हा आपण चुका टाळण्यासाठी त्याची ज्यादा काळजी घेतो, तेव्हा चुका होण्याची शक्यता आणखी वाढते.अतिरिक्त सतर्कतेमुळे आपला मेंदू फ्री (मोकळा) राहू शकत नाही. हा फ्री मेंदू जो सहजतेने शारीरिक क्रियाकलाप पार पाडतो. मेंदूला फ्री ठेवता येत न आल्याचा परिणाम आपल्या शारीरिक हालचालींवरही होतो आणि अशा प्रकारे आपण दुसऱ्या चुकीच्या दिशेने वाटचाल करत असतो. म्हणूनच वारंवार चुका करणाऱ्या व्यक्तीला फक्त शिव्या देऊन किंवा भीती घालून सुधारता येत नाही. चूक करणारा माणूस घाबरला तर तो पुन्हा चूक करणार. असे काही उपाय करणे हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून वारंवार चुका करणाऱ्या व्यक्तीला सहजता वाटेल. त्याच्यावर कुठले दडपण येऊ नये.
त्याच्या चुकीमध्ये हवा भरण्याचे काम न करणे हेही सहकाऱ्यांचे कर्तव्य आहे. माणूस काम करतो म्हटल्यावर त्याच्याकडून या चुका होणारच. जो माणूस काहीही काम करत नाही किंवा जो रिकामा बसून राहतो तो चूक करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच प्रगतीचा मार्ग चुकांमधूनच निघतो हे समजून घेतले पाहिजे. काही लोक नवीन काम करण्यास घाबरतात कारण त्यांच्याकडून चूक होऊ शकते. असे लोक नेहमी पुढे जाण्यास घाबरतात आणि मागच्या रांगेतला बनून राहतात. जगात जे काही महापुरुष झाले त्यांनी आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. चुकांमधूनच त्यांची महानतेकडे वाटचाल झाली आहे. शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत त्यांचे प्रयोग करतात तेव्हा त्यांच्याकडून अनेक चुका होतात. या चुका त्यांच्या प्रयोगांच्या यशाचा आधार ठरतात. म्हणूनच चुका या आयुष्याचा एक भाग मानून त्यातून बोध घेऊन पुढे जाणे आपल्यासाठी चांगले आहे. जैन धर्मात, क्षमावाणी उत्सव एखाद्याची चूक मान्य करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागून जगातील सर्व प्राणीमात्रांना सुखाची कामना केली जाते. जेव्हा आपण आपल्या चुकांची माफी मागतो तेव्हा आपल्याला आत्मसमाधान मिळते आणि आपले मन हलके होते. अशा प्रकारे माफी मागून आपले ओझेही कमी होते.
वास्तविक, जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो, त्याचा अर्थ कळत-नकळत आपली सर्व शस्त्रे पणाला लावून आपण स्वत: केलेल्या चुकीला चुकीचे समजत असतो. यामुळे एकीकडे आपले मानसिक दडपण कमी होते. दुसरीकडे, आपण लोकांच्या नजरेत आदरास पात्र बनतो. जेव्हा आपण आपली चूक मनापासून स्वीकारतो, तेव्हा पुन्हा ती चूक होण्याची शक्यता कमी होते. जेव्हा आपण एकतर पहिल्या चुकीबद्दल विचार करत नाही किंवा फार फार विचार करतो तेव्हाच आपल्या हातून पुन्हा पुन्हा चुका होत राहतात. जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो तेव्हा आपण त्याचा मनापासून विचार करतो. म्हणूनच झालेल्या चुकीचा मनापासून विचार केला तर त्यातही सकारात्मकता दिसून येईल. म्हणजे चुक हाच आपल्या यशाचा आधार आहे. जेव्हा आपण वारंवार चुका करतो तेव्हा चुका करणे ही आपली सवय बनते. जेव्हा ही सवय विकसित होते तेव्हा आपण केवळ स्वतःच दुःखी होत नाही तर इतरांनाही दुःखी करतो. मात्र, वारंवार चुका करण्याची सवय सोडा आणि एक-दोन चुका झाल्यावर आत्मनिरीक्षण करा. आणि हे आत्मनिरीक्षणच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment