Friday, May 5, 2023

तरुणपिढी नशेच्या आहारी

तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे.याला आळा घालण्यासाठी कडक कायदे आहेत, अंमली पदार्थ विरोधी पथके सक्रीय दिसतात, तरीही त्यांची उपलब्धता कमी होताना दिसत नाही किंवा सेवन करणाऱ्यांची संख्याही कमी होत नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे की 10 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुले पुढील दशकात मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या आहारी जाऊ शकतात.

मानसिक आरोग्याच्या समस्या, कामाचा ताण, वाढती बेरोजगारी आणि बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांचा या गटावर सर्वाधिक परिणाम होतो. यामुळे, ते सहजपणे नशेच्या प्रभावाखाली येतात.  या अभ्यासानुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात अमली पदार्थांच्या व्यसनाची व्याप्ती वाढणार आहे. भारत हा तरुणांचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने हे संशोधन अधिक चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी संशोधकांनी काही उपाय सुचवले आहेत, ज्यामध्ये पालक आणि सामाजिक संस्थांची जबाबदारी अधोरेखित करण्यात आली आहे. परंतु ज्या पद्धतीने अंमली पदार्थांचा व्यवसाय वेगाने फोफावत आहे, त्यामुळे या संस्था अनेकदा हतबल झाल्याचे दिसून येते.

 आजूबाजूला असलेल्या समाजातील लोक, चित्रपटातील नायक,  वरिष्ठ, त्यांच्या कुटुंबातील सदस्य इत्यादीचे व्यसन पाहून अनेकजण पौगंडावस्थेत ड्रग्जकडे आकर्षित होतात हे वास्तव आहे. मग कंटाळा, चिडचिड, रिकामेपणा, अभ्यास आणि कामाच्या दबावाखाली या पदार्थांचे सेवन वाढते. आता महानगरांपासून लहान शहरांपर्यंत बेकायदेशीर अवैध मादक पदार्थांची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही आणि अनेक प्रकारची नाशिले पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत की त्यामुळे आताच्या घडीला अनेक किशोरवयीन, तरुणांना ती एक सर्रास वापरणारी वस्तू वाटू लागली आहे.  असे नशिल्या पदार्थांचे पालक, शिक्षक, नातेवाईक, परिचित यांच्यापासून लपून, छुप्या पद्धतीने सेवन केली जातात, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे कठीण जाते.

अनेक पालकांना याची कल्पना तेव्हाच मिळते जेव्हा त्यांच्या मुलांमध्ये काही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होते.तोपर्यंत त्यांचे व्यसन आटोक्यात आणण्यास उशीर झालेला असतो आणि अनेक किशोरवयीन मुलांना समुपदेशन करूनही काही फायदा होत नाही. ते आक्रमक होतात आणि सतत घुश्श्यात (रागात) असतात. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये अमली पदार्थांची मोठी खेप कोणत्या ना कोणत्या बंदरावर किंवा अन्य ठिकाणी पकडली गेली. त्यांच्या आधारे देशात अमली पदार्थांचा किती मोठा व्यवसाय फोफावत आहे, याचा अंदाज बांधता येतो. पण जेव्हा जेव्हा अशा पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर पायबंद घालण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तेव्हा तुरळक प्रमाणात नशेचे सेवन करणाऱ्या काही लोकांना पकडून त्यांची जबाबदारी पूर्णत्वास नेली जाते. यातून यातले खरे सूत्रधार मात्र बाहेरच राहतात.काही प्रसंगी या व्यवसायात अनेक राजकीय प्रभावशाली व्यक्तींची नावेही समोर आली आहेत, मात्र यात कुणालाच नवल वाटत नाही. अशा स्थितीत किशोरवयीन आणि तरुणांमधील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणेने प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी, अशी अपेक्षा आहे. ज्यांच्या बळावर देशाच्या विकासाची स्वप्न रंगवली जात आहेत, ती तरुण पिढीच नशेच्या आहारी गेली, तर आपल्या देशाचा विकास कसा होणार? याचा विचार गांभीर्याने झाला पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment