Tuesday, March 14, 2023

मानवी जीवनातील गुंतागुंत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणारी आव्हाने

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) बद्दलची चर्चा तीव्र झाली आहे. मानवी जीवनातील गुंतागुंत जसजशी वाढत चालली आहे, तसतशी माणूस पर्यायी पद्धतींद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे देशाची आणि जगाची वाढती लोकसंख्या मोठी समस्या बनत चालली आहे, त्यासाठी संसाधनांची काळजी करावी लागत आहे, तर दुसरीकडे मानवाकडून केली जात असलेली अनेक कामे आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने केली जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले यंत्र मानवाप्रमाणेच काम करत आहे. सतत संशोधनाचा परिणाम असा झाला आहे की या मशीनमधील त्रुटी कमी होत आहेत आणि काम वेगवान होत आहे. विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार त्याला मदत करणे, भाषा प्रक्रिया, ऑनलाइन गेम खेळणे, रोगांवर उपचार करणे इतकेच नव्हे तर शस्त्रक्रिया करण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज पडू लागली आहे. 

तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना सूचना आणि व्याख्याने देता येऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून उत्तर कळीच्या मदतीने परीक्षेचे मूल्यमापन आणि आकडेवारीद्वारे विद्यार्थ्यांच्या निकालांचे तपशीलवार विश्लेषण करता येऊ शकते. एवढेच नाही तर उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांकडून झालेली चूकही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सहज अधोरेखित करता येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात 1956 मध्ये जॉन मॅककार्थी यांनी केली होती. त्यासाठी संगणकाद्वारे तयार होणारी रोबोटिक प्रणाली तयार केली जाते, त्यानंतर मानवी मेंदूवर आधारित सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्रोग्रामिंग करून त्यावर विचार करण्याचा, समजून घेण्याचा आणि ऑपरेट करण्याचा प्रयत्न केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता विश्लेषण करते की मानवी मेंदू कसा विचार करतो, समजतो आणि शिकतो, त्यानंतर त्या विश्लेषणाच्या आधारे स्वतःचे 'अल्गोरिदम' तयार करतो आणि कार्य करतो.  त्याचप्रमाणे, ते विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे आणि क्षमतांचे मूल्यमापन करू शकते आणि त्यांना उच्च क्षमतांसाठी मार्गदर्शन करू शकते. काही कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी गणित-भाषा रुचीपूर्ण बनवण्यासाठी ऑनलाइन आणि व्हिडिओ गेम्स तयार करत आहेत. भाषेचे व्याकरण, शब्द आणि वाक्यरचना यांतील अशुद्धता शोधून त्या चुका सुधारल्या जात आहेत. अशा प्रकारच्या अॅप्सच्या आगमनामुळे भाषा-संपादनासाठी असणारे इतरांवरील अवलंबित्व कमी होत आहे.

1980 पासून, पाचव्या पिढीचा संगणक बनवण्याचा प्रकल्प सुरू झाला आणि त्यानंतर सुपर कॉम्प्युटर तयार होऊ लागले. 1997 पर्यंत असे सुपर कॉम्प्युटर बनवले गेले, ज्यांचा मेंदू सामान्य माणसापेक्षा वेगाने धावू लागला. IBM च्या 'डीप ब्लू' नावाच्या कॉम्प्युटरचा मेंदू इतका वेगवान बनला की त्याने एका प्रसिद्ध बुद्धिबळपटूचा पराभव केला. त्याच्या यशामुळे कॉम्प्युटरला जटिल गणिती आकडेमोड, आर्थिक मॉडेलिंग, बाजारातील ट्रेंड, गंभीर धोक्याचे विश्लेषण इत्यादी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला. फेब्रुवारी 2011 मध्ये 'वॉटसन' नावाच्या पोस्ट-डीप ब्लू कॉम्प्युटरने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने लाखो लोकांसमोर दोन प्रसिद्ध बुद्धिबळपटूंचा पराभव केला. आज, प्रत्येक गरजेनुसार, विविध प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार आहेत - काही पूर्णपणे प्रतिक्रियाशील आहेत, तर काहींची स्मरणशक्ती मर्यादित आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशांमध्ये ज्या पद्धतीने संशोधन सुरू आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात मानवी मेंदूसमोरील सर्वात मोठे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेलचे असणार आहे. नवीन युगातील मॉडेल ब्रेन थिअरी आणि आत्म-जागरूकतेच्या आधारे  कार्य करतील.

त्याची झलक 'चॅट बॉट'च्या अनेक पर्यायांमध्ये पाहायला मिळते. याची काही प्रमुख उदाहरणे म्हणजे अलेक्सा, गुगलचे असिस्टंट होम, ऍपलचे सिरी इ. ते सर्व 'चॅट बॉट्स', मशीन लर्निंग आणि तुमच्या दिशानिर्देशांवर काम करतात. चॅट बॉट्सचे दोन प्रकार आहेत. एक, जे तोंडी सूचनांवर काम करतात आणि दुसरे, लेखी सूचनांवर. आजकाल 'चॅट जीपीटी'ची खूप चर्चा आहे. एक प्रकारचा 'संगणक सॉफ्टवेअर लँग्वेज मॉडेल' आहे, जो 'की-इनपुट कमांड'च्या आधारे माहिती देतो. तो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि काही वेळातच त्याची लोकप्रियता जगभरात पसरली. तुम्हाला एखादे पत्र लिहायचे आहे, छोटासा लेख लिहायचा असेल, अथवा एखादा प्रस्ताव द्यायचा असेल तर, 'चॅट जीपीटी' हे सर्व काम फक्त दहा मिनिटांत करेल! त्याच्या आगमनामुळे लाखो लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. संशोधन कार्य आणि 'कॉपीराइट'वरही याचा परिणाम होणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला पर्यावरणावर लेख लिहायचा आहे आणि त्याने तो लेख 'चॅट जीपीटी'च्या मदतीने लिहिला, तर त्या लेखाचा खरा लेखक कोण ?, 'चॅट जीपीटी', विद्यार्थी की 'चॅट जीपीटी' ने जिथून मजकूर घेतला आहे तो ? पण सध्या तरी 'चॅट जीपीटी' तो कंटेंट कुठून मिळवतोय आणि ती मिळालेली माहिती कितपत तथ्यपूर्ण आहे हे जाणून घेण्यात अडचण आहे. 

पण यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने चोवीस तास काम करणारी मशीन मिळणार आहे. ते आपोआप कार्य करत राहील आणि चुका देखील कमी करेल. पण प्रश्न असा आहे की हे यंत्र मानवी सर्जनशीलतेशी स्पर्धा करू शकेल का? शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांची अनेक प्रशासकीय कामे, वर्गात हजेरी घेणे आदी कामे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने केली जातील, पण शिकवण्यासाठी 'हायब्रीड मॉडेल' तयार होण्याची शक्यता आहे. मॅथ्यू लिंचला शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठी क्षमता दिसते. शिक्षकांच्या धड्याच्या (पाठाच्या) नियोजनापासून ते भाषा शिकणे, परीक्षेची तयारी आणि विद्यार्थी-पालकांशी संवाद, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मानव संसाधन व्यवस्थापन इत्यादींपर्यंत त्यांची उपयुक्तता दिसते. उच्च शिक्षणात, आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संशोधन कार्यात शैक्षणिक साहित्यिक चोरी रोखण्यासाठी केला जातो. संशोधन विद्यार्थ्याने प्रबंधाच्या मौलिकतेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, तरच तो विद्यापीठात आपले संशोधन कार्य सादर करू शकतो.  काही सॉफ्टवेअर्स दुसरीकडून घेतलेल्या संशोधन कार्याच्या मजकुरातील ओळ न ओळ पकडतात. पण आता 'चॅट जीपीटी' हे संशोधनातील शैक्षणिक लेखनासाठीही उपयुक्त मानले जात आहे, कारण ते सामग्रीचे भाषांतर करणे किंवा लेखाचे संक्षिप्तिकरण करणे  इत्यादीसाठी मदत करते. पण त्याची मर्यादा ही आहे की ती मौलिक विचार मांडू शकत नाही. हे फक्त उपलब्ध साहित्य सादर करू शकते आणि तेही संदर्भाशिवाय. अशा प्रकारे, इतर कोणाचे साहित्य वापरण्याचा आणि कधीकधी पक्षपाती होण्याचा धोका देखील असतो. 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व ओळखून भारत सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद आणि काही इतर संस्था आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पदवीधर कार्यक्रम देतात. येत्या काळात 'चॅटबॉट', 'रोबोटिक्स', 'मशीन लर्निंग' हे केवळ शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणातच अडकणार नाहीत, तर यांच्या स्वत:च्या कामाचे मूल्यमापन करण्याची पद्धतही यातून विकसित होण्याची शक्यता आहे. त्याच्या वाढत्या प्रभावामुळे शैक्षणिक कामाचा दर्जा कसा असेल, हे येत्या काळात आपल्याला कळेल.याच्या वाढत्या प्रभावामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, 'रोबोटिक्स', 'डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग', 'बिग डेटा इंटेलिजन्स', 'रिअल टाइम डेटा' आणि 'क्वांटम कम्युनिकेशन' या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण, मानव संसाधन आणि कौशल्य विकासाचे कार्य जगभरात वाढत आहे.  अनेक कंपन्या त्यांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता अब्जावधी डॉलरचा उद्योग बनला आहे. परंतु व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत गोपनीयतेचा भंग होण्याचा धोका देखील आहे, ज्यामध्ये सुरक्षित डेटा ठेवणे ही चिंतेची बाब आहे. काहींचा असा विश्वास आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त विसंबून राहणे हे मानवाच्या गोपनीयता आणि प्रतिष्ठेला धोका पोहचवू शकते. पण हे निश्चित आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या जगण्यात, कामात, अभ्यासात आणि संशोधनात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment