पृथ्वीवर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन हे जल आणीबाणी घोषित करणारे जगातील पहिले शहर ठरले आहे. पाण्याअभावी येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील पहिले पाणी नसलेले शहर बनले आहे. म्हणजेच येथे पाणी पूर्णपणे संपलेले आहे. सलग तीन वर्षांपासून शहराला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. नागरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलसंधारणही होऊ शकले नाही. झोपेतून जागे झालेल्या सरकारने येथे पाणी वाचवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. पाणीपुरवठा योजनांच्या सुरक्षेसाठी लष्कर तैनात करण्यात आल्याची स्थिती आहे. केपटाऊनसारखी परिस्थिती केवळ आफ्रिकेतच नाही तर जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात निर्माण होऊ शकते. जलसंधारणाबाबत आतापासूनच जागरूक होण्याची गरज आहे. केपटाऊनमध्ये अनेक हॉटेल्स, क्लब इत्यादींमधून नळ काढण्यात आले आहेत. याला पर्याय म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बागांमध्ये पाणी टाकण्यास, वाहनांची स्वच्छता करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाण्याच्या अतिवापरासाठी दंड आकारले जात आहे. जितके जास्त पाणी वापरले तितके जास्त पैसे आकारले जातात. प्रति व्यक्ती प्रतिदिन 50 लिटर पाणी दिले जात आहे.
जागतिक स्तरावर 3.6 अब्ज लोक म्हणजे जगातील निम्म्या लोकसंख्येला दरवर्षी एक महिन्यासाठी पाणी संकटाचा सामना करावा लागतो. 2050 पर्यंत पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या 5.7 अब्जांपर्यंत पोहोचेल. एका शतकात पाण्याचा वापर सहापटीने वाढला आहे. केपटाऊनसारखी पॅरिस, बंगळुरू, बीजिंग, मेक्सिको अशा अनेक शहरांमधील जलसाठे संपुष्टात आले आहेत. बेंगळुरू, (भारत) - अनियोजित शहरीकरण आणि अतिक्रमणामुळे येथील जलसाठे 79 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर 1973 पासून शहराचा आकार 77 टक्क्यांनी वाढला आहे. दोन दशकांत पाण्याची पातळी 76-91 मीटरने खाली गेली. बीजिंग, (चीन) नकाशावर 200 नद्या आहेत पण सर्व कोरड्या आहेत. तीन दशकांपासून लोक भूजलाच्या आधारावर जगत आहेत. दरवर्षी एक मीटर या वेगाने भूजल कमी होत आहे आणि प्रदूषित होत आहे. मेक्सिको सिटी, (मेक्सिको ) 700 वर्षांपूर्वी या शहराला 'नव्या जगाचे व्हेनिस' म्हटले जायचे.तरंगत्या बागा ही या ठिकाणची शान असायची. आता ना तलाव आहे ना पाणी. भूगर्भातील अतिदाबामुळे पाण्याची पातळी वर्षाला 40 सेमीने घसरत आहे. साना, (येमेन) - भूजलाचा शेवटचा थेंब शोषल्यानंतर, शहर इतर पर्यायांकडे पाहत आहे. शहर जलविरहित होईल, असा अंदाज आहे. नैरोबी, (केनिया) - पाण्यासाठी भूजलावर अवलंबून असलेले शहर. 75 टक्के लोक तिप्पट किमतीत पाणी विकत घेतात आणि पितात. इस्तंबूल, (तुर्की) - 2020 पर्यंत मागणी आणि पुरवठा यामध्ये 607 दशलक्ष घनमीटर पाण्याचे अंतर असू शकते. कराची, (पाकिस्तान) - शहराच्या केवळ 50 टक्के गरजांचा पुरवठा केला जातो. लोकसंख्या पाच टक्क्यांनी वाढत आहे. प्रदूषित पाण्यामुळे जलजन्य आजार वाढले आहेत.
पाण्याची टंचाई आपल्या देशाबरोबरच संपूर्ण जगाची समस्या बनली आहे.त्यामुळे आपल्याला घरातील वडिलधारी माणसे किंवा शाळेत पाठ्यपुस्तके, शिक्षक पाणी वाचवण्याचे फंडे सांगत असतात. टपकणारा नळ बंद कर, टाकीतील पाणी सांडू नकोस, यासारखे उपाय आपल्याला सांगितले जाते. आपल्याला लागेल तेवढेच पाणी ग्लासात घ्यायला किंवा पाणी घेण्यासाठी वगर्याळचा वापर करायला सांगितले जाते. जलसंरक्षणाचे हे प्रयत्न आवश्यकच आहेत. पण फक्त यामुळे जलसंकट हटणार नाही. आपल्या घरापर्यंत पाणी नदी,तलाव,कुपनलिका याद्वारे येत असते. जर यांचा जलस्तर कमी झाला तर मात्र तुम्ही घरात कितीही पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा, शेवटी ते संपणारच! जर नदी,तलाव,जमिनीतीलच पाणी संपले तर काय? या गोष्टी गांभिर्याने लक्षात घेऊन काही देशांनी यावर जालीम उपाय शोधून काढले आहेत. यासाठी त्यांचा नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाखाणण्यासारखा आहे.
आपल्याला माहित आहे, पृथ्वीचा 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पण त्यातील फक्त तीन टक्के पाणी स्वच्छ आणि आपल्या वापरण्याजोगे आहे. स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतांचा विचार केला तर पावसाचे पाणी हेच सर्वात स्वच्छ पाणी आहे.काही ठिकाणी हिमालयातील बर्फ वितळून पाणी उपलब्ध होते. जगभरात पेयजलचे संकट लक्षात घेता सऊदी अरब, इस्त्राईल, इराणसारखे देश जलसंरक्षणाचे हटके मॉडेल्सवर काम करीत आहेत.
सऊदी अरब अनेक वर्षांपासून समुद्री पाण्याचे डिसॅलिनेशन ( अलवणीकरण) द्वारे पाणी पिण्यालायक बनवत आहे. हा देश जगातला डिसेलायनेटेड वॉटरचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. महत्त्वाचे म्हणजे समुद्राचे खारे पाणी पिण्यालायक गोडे बनवताना ऊर्जा आणि आर्थिक यांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर लक्षात घेऊन सऊदी अरबने अलिकडेच सौर ऊर्जेवर चालणारे प्लांट बसवले आहेत. वाळवंटी प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता सौर ऊर्जा इथे मुबलक प्रमाणात अनायसे उपलब्ध होते. जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जेवर चालणारा डिसेलायनेटेड प्रकल्प अरब देशात आहे. हा प्रकल्प अल खाफजी शहरात असून 2019 पर्यंत संपूर्ण देशातले प्लांट सौर ऊर्जेने जोडण्याचा निश्चय केला आहे.
इराणमधल्या मिलोंस बेटावर ज्वालामुखी आर्कच्या कारणामुळे भू-तापीय अक्षय ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळते. इथे मॅग्मा आसपासच्या मोठ्या दगडांना गरम करते. दगडांमध्ये निर्माण झालेले गरम पाणी जलवाहिन्यांद्वारा भूमिगत असलेल्या विहिरींमध्ये टाकले जाते.इथे त्याचे बाष्पात रुपांतर होते. त्यामुळे टर्बौइन सुरू होऊन ऊर्जा निर्माण होते. भू-तापीय ऊर्जाचा वापर समुद्राचे खारे पाणी गोड पाण्यात परावर्तित केले जाते. याचा उपयोग सिंचनासाठी आणि पिण्यासाठी केला जातो. यामुळे इराणमधील ही नवी जियोथर्मल डिसेलायनेटेड योजना एक आदर्श योजना म्हणून जगभरात नावाजलेली आहे.
युनायटेड किंगडम स्मार्ट वॉटर मिटरिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. यामुळे इथल्या रहिवाशांना पाण्याच्या वापराविषयीची माहिती ऑनलाइन मिळते. या माहितीच्या आधारावर इथल्या लोकांना पाण्याच्या वापराबाबत खबरदारी घेता येते. लक्ष ठेवता येते. या स्मार्ट मीटरमुळे पाण्याबाबतची अगदी सुक्ष्म माहिती उपलब्ध होते. पाण्याचा वापर कसा आणि किती केला जात आहे. पाण्याचा वापर वाढला आहे का? त्याचबरोबर जलसंरक्षणाबाबत उपायदेखील सांगितले जातात. या सगळ्या गोष्टी वापरकर्त्यांना जाग्यावर ऑनलाइन समजून येतात. शिवाय पाणी संरक्षणासाठी त्यांना प्रोत्साहितही केले जाते. 2030 पर्यंत देशातल्या प्रत्येक घरात हे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया पुन्हा एकदा ऐतिहासिक दुष्काळाच्या तावडीत सापडला होता. त्यामुळे या प्रदेशाला वेस्टर्न हेमिस्फेयरच्या सर्वात मोठ्या डिसेलायनेटेड संयंत्र बसवण्यास भाग पडले. हे संयंत्र 10 मैलापर्यंत पाण्याची डिलिवरी जलवाहिनीच्यामाध्यमातून करते. हे संयंत्र रोज 50 दशलक्ष गॅलन समुद्री जलाचे स्वच्छ आणि गोड पाण्यात रुपांतर करते. कॅलिफोर्नियातील ही योजना जगातील सर्वात प्रगत योजनांपैकी एक आहे.
इस्त्राइल नेहमीच जलसंरक्षणाच्याबाबतीत सर्वात पुढे राहिला आहे. याला कारण म्हणजे येथील वाळवंटी प्रदेश! पण आज स्वच्छ पाण्याची गरज लक्षात घेता जवळपास 85 टक्के अशुद्ध पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनवले जात आहे. हे तंत्रज्ञान इस्त्राइल अन्य देशांना विकून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उठवत आहे. इस्त्राइलचा अंदाज असा आहे की, 2020 पर्यंत त्यांच्या कृषी क्षेत्राला लागणारी 50 टक्के आर्थिक मदत फक्त पाण्याच्या रिसायक्लिंगच्या माध्यमातून मिळून जाईल. इस्त्राइलने असे तंत्रज्ञान शोधले आहे की, सगळ्यात घाण पाणी किंवा कसले तरी खारे पाणी असू दे,त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करण्याची क्षमता आहे.विशेष म्हणजे हा देश दुसर्या देशांनादेखील पाण्याची निर्यात करतो.
आगामी काळात पाण्याचे वाढते संकट लक्षात घेऊन आपल्याही देशाला अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचे संयंत्र बसवण्याचे काम आपल्या देशातही मोठ्या वेगाने सुरू आहे. समुद्र किनारी असलेल्या शहरांमध्ये यावर सध्या काम सुरू आहे. मात्र आपल्याकडे मिळणार्या पावसाचे पाणी जिरवण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.यासाठी अधिक आणि वेगाने काम करावे लागणार आहे.जलयुक्त शिवारसारखे प्रयोग महाराष्ट्रात राबवले जात आहेत. त्याला यहशी मिळत आहे,पण यातही अजून फार मोठे काम करावे लागणार आहे. शासनाचा सहभाग आणि लोकांचा सहभाग यातून फार मोठे काम होऊ शकेल,यासाठी शासन पातळीवर मोठे काम हाती घेण्याची आवश्यकता आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment