खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका मनुष्याच्या प्रार्थनेने त्रस्त होऊन एक देवता मुख्य देवतेला म्हणाला, 'देवा, ही व्यक्ती वरदान देण्यास अजिबात पात्र नाही.पण ती सतत प्रार्थना करत आहे. त्यामुळे आता त्याला टाळताही येणार नाही. त्याचा त्रास म्हणजे वर मिळाल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो.' मुख्य देवतेने काही काळ प्रार्थना करणाऱ्या माणसाचा विचार केला आणि म्हणाली, 'काळजी करण्यासारखे काही नाही. त्याला वर दे.' देवांनी त्या व्यक्तीला काहीतरी मागायला सांगितले. त्या व्यक्तीने तीन इच्छा पूर्ण करण्यासाठी वरदान मागितले. देवांनी त्याला अंड्यांसारखे नाजूक तीन गोळे दिले आणि म्हणाले, 'जेव्हा तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर जमिनीवर एक गोळा आपटून फोड. आणि तुला हवे ते माग. तुझी इच्छा पूर्ण होईल.' जणू काही सर्व काही मिळाले आहे, अशा आविर्भावात, आनंदाने तो मनुष्य धावतच घरी गेला. त्याला लगेच त्याच्या खोलीत जाऊन वर मागायचा होता. तो खोलीत शिरणार तोच त्याचा लहान मुलगा धावत आला आणि त्याच्या पायाला मिठी मारली. यामुळे त्या व्यक्तीच्या हाताचा तोल बिघडला आणि एक गोळा खाली पडला आणि त्याचा स्फोट झाला. त्याच्या रागाला सीमा राहिली नाही. तो रागावून मुलाला म्हणाला, 'तुला डोळे नाहीत?' हे बोलतोय तोच त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे दोन्ही डोळे गायब झाले. ते पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. त्याच्यावर आभाळ कोसळलं. तो रडायला लागला. त्याला उर्वरित दोन गोळे आठवले. त्याने दुसरा गोळा हातात घेतला आणि डोळे मिटून तो गोळा जमिनीवर आपटला. त्याचा स्फोट झाला. त्यावर तो म्हणाला, 'माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर डोळे लागू दे.' जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा आपल्या मुलाचा संपूर्ण चेहरा डोळ्यांनी भरलेला पाहून तो गर्भगळीत झाला. तो खूप विचित्र आणि भयानक दिसत होता. हतबल होऊन त्याने डोक्याला हात लावला. आता त्या व्यक्तीला समजू लागले की आपण वर मागण्यात चूक केली आहे. त्याने तिसरा गोळाही फोडला आणि मुलाचा चेहरा पूर्वीसारखा सामान्य व्हावा, असा वर मागितला. पूर्वीप्रमाणे, त्याच्या चेहऱ्यावर फक्त दोन डोळे राहिले. अशाप्रकारे त्याने कमावलेले तीनही वरदान वाया गेले.
शिकवण- तुम्ही जे काही बोलाल ते विचार करून बोला.
No comments:
Post a Comment