अमेरिकेत सनी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो नेहमी मोठ्यांचा आदर करत असे आणि इतरांना मदत करण्यात कधीही मागे हटत नसे, तर त्याचा मित्र सॅम मात्र खूप गर्विष्ठ होता. कोणाची तरी मदत करणे म्हणजे त्याला कमीपणाचे वाटायचे.
एके दिवशी सनी त्याच्या मित्रांसोबत खेळायला जात होता, तेवढ्यात फिलिप अंकलने त्याला समोरच्या घरातून हाक मारली आणि म्हणाले, "सनी, तू समोरच्या बाजारात जाऊन माझं औषध आणशील का?"
सनीने लगेच होकार दिला.
तो त्याच्या मित्रांना म्हणाला, "मी फिलिप काकांचे औषध घेऊन आता येतो. तोपर्यंत थांबा."
"का, तू फिलिप काकांचा नोकर आहेस का त्यांचे औषध आणायला?" सॅम चिढून म्हणाला.
"एखाद्याला मदत केली म्हणजे तो त्याचा नोकर होत नाही." सनी आश्चर्याने बोलला.
"मला ते काही माहोत नाही. तू गेलास तर आम्ही तुला आमच्या फुटबॉल संघातून बाहेर काढू." सॅम आकडूनच म्हणाला.
दीपू, पंकज, जॉन आणि जॅक यांनीदेखील सॅमच्या बोलण्याचे समर्थन केले,त्यामुळे सनी औषध आणण्यासाठी न जाता सर्वांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात गेला.
सनी खेळून घरी परतल्यावर त्याने वडिलांना व आईला फिलिप काकांचे औषध आणून न दिल्याबद्दल सांगितले.
आधी तर त्याला वडिलांनी खडसावले, पण नंतर समजावणीच्या सुरात म्हणाले,“फुटबॉल संघातून बाहेर काढण्याच्या भीतीने तू तुझी चांगली सवय सोडणार का? एक लक्षात ठेव, कोणतेच काम कोणाच्याही दबावाखाली करू नये. तुला फिलिप काकांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली पाहिजे."
सनीने त्याचवेळी फिलिप काकांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. फिलिप काकांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, “मला फार आनंद झाला, कारण तुला तुझी चूक कळली. घे, माझ्याकडून हे चॉकलेट घे." सनी चॉकलेट घेऊन घरी परतला.
काही दिवसांनी शाळेत सायकल रेस स्पर्धा होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागली होती. सनी आणि सॅमच्या उत्साहाला तर पारावरच उरला नव्हता. दोघेही खूप चांगले सायकलिंग करायचे. असं म्हणा ना, त्यांच्यात काट्याची टक्कर होती.
ठरलेल्या वेळी शर्यत सुरू झाली. शाळेपासून निघून आणि चार किलोमीटर अंतर पार करून मुलांना परत शाळेत यायचे होते. सगळी मुलं पुढे जाण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होती, पण सनी आणि सॅमच्या पुढे कुणीच जाऊ शकत नव्हतं. ते दोघे सर्वात पुढे होते. कधी सनी पुढे जायचा, कधी सॅम.
त्यांनी नुकतेच तीन-चतुर्थांश अंतर कापले होते -नव्हते तोच अचानक सनीला रस्त्याच्या कडेला पोटावर एक माणूस पडलेला दिसला. सनी ओरडला, "सॅम थांब! तो बघ, एक माणूस पडला आहे. त्याला दुखापत झाली आहे असे दिसते. आपण त्याला मदत केली पाहिजे."
सॅम मोठ्याने हसला, "मी तुझ्यासारखा मूर्ख नाही जो एखाद्याला मदत करण्याच्या नादात शर्यत गमावून बसेल." असे म्हणत सॅम त्या माणसाकडे न पाहताच पुढे निघून गेला.
सनी सायकलवरून खाली उतरला, त्या माणसाच्या जवळ गेला आणि त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करू लागला. त्या माणसाने डोळे उघडले. सनीची नजर त्याच्यावर पडताच तो आश्चर्याने म्हणाला, “अरे, रॉबर्ट अंकल तुम्ही! तुम्ही इथे कसे पडलात?"
रॉबर्ट काका कण्हत कण्हत म्हणाले, "मी जॉगिंग करत होतो. अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडलो."
रॉबर्ट अंकल उठणारच होते तेवढ्यात त्यांच्या तोंडातून मोठ्याने विव्हळण्याचा आवाज आला. त्यांनी त्यांची जीन्स वर केली. गुडघ्यातून रक्त येत होते. हे पाहून सनीने आधी त्याच्या मोबाईलवरून अॅम्ब्युलन्सला फोन केला, त्यानंतर वडिलांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. पाच मिनिटांत अॅम्ब्युलन्स आली. तितक्यात सनीचे वडीलदेखील पोहोचले आणि श्री. रॉबर्टना अंबुर्ल्समध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले.
सनी शाळेत पोहोचला तेव्हा शर्यत संपली होती. सॅम पहिला आला होता. प्रिन्सिपल सरांनी त्याला बक्षीस दिले. तेवढ्यात त्यांची नजर सनीवर पडली. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले, "सनी, रेस सोडून कुठे गेला होतास?"
"हा एका माणसाला मदत करत होता, सर." सनीच्या आधी सॅम त्याची खिल्ली उडवत बोलला.
"काय म्हणायचंय तुला?" प्रिन्सिपल सरांनी विचारले.
सनीने त्यांना संपूर्ण घटना सांगितली आणि म्हणाला, “सर, मला वाटलं की शर्यत जिंकण्यापेक्षा एखाद्याला मदत करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.”
“तू खूप छान काम केलंस. तू त्या माणसाला ओळखतोस का?" प्रिन्सिपल सरांनी विचारलं.
“आधी सर मला माहीत नव्हतं, पण जेव्हा मी त्यांना पाहिलं ना तेव्हा मात्र मला धक्काच बसला. ते रॉबर्टकाका होते, सॅमचे बाबा."
"काय म्हणालास रे , माझे बाबा?" सॅम आश्चर्याने ओरडला.
"हो सॅम, ते तुझेच बाबा होते, पण काळजी करू नकोस. त्यांच्याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. माझ्या वडिलांनी त्यांना दवाखान्यात नेले आहे."
"बघितलंस सॅम, तू सनीचा उपहास केलास, पण त्याने तुझ्या बाबांना मदत केली. जर त्यानेही शर्यतीला महत्त्व दिले असते आणि तुझ्यासारखा पुढे निघून गेला असता तर ते किती वेळ रस्त्यावर पडून राहिले असते काय माहीत? त्याच्याकडून शिकलं पाहिजेस." सर म्हणाले. सॅमची मान शरमेने खाली झुकली.
प्रिन्सिपल सरांनी सनीला मिठी मारली. सनीने स्पर्धा जिंकण्यापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व कसे दिले हे त्यांनी सर्व मुलांना सांगितले. सनीला शाळेतर्फे विशेष पुरस्कार देण्यात आला. सॅम सनीच्या जवळ आला आणि म्हणाला, "मला माफ कर, सनी. यापुढे मी पण तुझ्यासारखाच होईन." सनीने त्याला मिठी मारली. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment