Friday, April 7, 2023

असंसर्गजन्य आजारांचे वाढते आव्हान

तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव अशा कारणांमुळे मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. राज्यातही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची परिस्थिती बिकट आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत उच्च रक्तदाबासाठी एक कोटी 88 लाख 21 हजार 467 नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी 19 लाख 59 हजार 429 नागरिकांना निदान झाले आहे. राज्यात रक्तदाबाच्या 19 लाख 38 हजार 457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच कालावधीत एक कोटी 87 लाख 38 हजार 141 नागरिकांची मधुमेह चाचणी झाली आहे. त्यांपैकी नऊ लाख 32 हजार 153 नागरिकांचे निदान झाले असून आठ लाख 50 हजार 614 रुग्णांना मधुमेहाच्या उपचारांची गरज भासली आहे. 

असंसर्गजन्य आजारामुळे जगातल्या एकूण 8 अब्ज लोकसंख्येपैकी जगभरात दरवर्षी होणार्‍या मृत्यूंपैकी 18 टक्के मृत्यू 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात होत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक आरोग्य अहवालामध्येही असाच उल्लेख करण्यात आला आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे (हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सर) येणार्‍या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की,2012 ते 2030 या कालावधीत या आजारांच्या उपचारांवर जवळपास 31 लाख कोटी रुपये खर्च होईल. हा अहवाल शहरी लोकसंख्येच्या विकासावर पडलेल्या परिणामावर आधारित आहे.

वाढते शहरीकरण, कामाचा व्याप आणि जीवनशैली आदी गोष्टी या घातक आजारांसाठी जबाबदार आहेत. संयुक्त राष्ट्रचा अहवाल सांगतो की, 2014 ते 2050 दरम्यान 40 कोटी जनता शहरांचा हिस्सा असणार आहे. याचा अंदाज बांधल्यास शहरी अनियोजनाचे चित्र पाहिल्यास किती भयंकर असणार आहे. आजचीच अवस्था इतकी बिकट आणि गलिच्छ आहे की आणखी तीस वर्षांपर्यंतचे चित्र किती भयानक असेल. आजही आपण शहरांच्या विकासाकडे नीटसे पाहत नाही. आकड्यांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, देशात दरवर्षी होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी सहा मृत्यू कॅन्सरने होत आहेत.  जागतिक स्तरावर हाच आकडा आठ टक्के आहे. अशाच प्रकारे भारतात सहा कोटींपेक्षा अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. भारतातील बहुतांश लोकसंख्या श्‍वसनासंबंधीच्या आजाराने आणि फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे भारत जगातील सर्वाधिक आजारांचे ओझे वाहून नेणारा देश आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.जर आपण या आजारांवर नियंत्रण आणू शकलो नाही तर आपल्या देशाची ओळख आजारांचा देश म्हणून होत राहील.

जानेवारी 2015 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूटीओ) ने खुलासा केला होता की, जगात असंसर्गजन्य आजाराने मृत्यू पावणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगात दरवर्षी दीड कोटी कॅन्सर, मधुमेह आणि हार्ट अटॅकसारख्या गैरसंक्रमण आजाराने माणसे मरत आहेत.जर अशा आजाराने ग्रस्त लोकांना वेळेत उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतात. अहवालानुसार भारतात या आजाराने तीस ते सत्तर वयाच्या दरम्यानच्या लोकांची मृत्यूची शक्यता 26.2 टक्के इतकी आहे. तुलना करायची झाल्यास हा आकडा दक्षिण आशिया आणि आफ्रिकातील काही देशांच्या तुलनेत खूपच खराब आहे. डब्लूटीओनुसार पी-5 देशांमधील (रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटेन आणि अमेरिका) फक्त रशियाची स्थिती (29.2 टक्के) भारतापेक्षा वाईट आहे. 2012 मध्ये भारतात 52.2 टक्के लोकांचा मृत्यू या असंसर्गजन्य आजाराने झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे की, असंसर्गजन्य आजारांमध्ये कॅन्सर,मधुमेह, हृदयरोग आणि श्‍वसनासंबंधीचे प्रमुख चार आजार आहेत.

काही वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीद्वारा लोकांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीकोनातून व्यापक स्वरुपात काही गोष्टींवर सहमती झाली होती आणि असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रणही येईल, अशी  आशाही करण्यात आली होती.मात्र दुर्दैव असे की, अजूनही या दिशेने पावलेच उचलली गेली नाहीत.  या आजारांवर लवकर नियंत्रण आणले गेले नाही तर या आजाराने मृत्यू होणार्‍यांची संख्या दरवर्षी 6 कोटी होऊन जाईल, असे मानले जात आहे. 21 व्या शतकात या आजारांवर नियंत्रण आणणं मोठं आव्हान असणार आहे. वेगाने बदलत चाललेली जीवनशैली, खाणंपिणं आणि शारीरिक व्यायामाचा आभाव यांमुळे जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जो घातक आहे. जगातील एक तृतीयांश लोकांचे आयुष्य निर्धारित वेळेअगोदरच नष्ट होत चालले आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदय, श्‍वसनरोग आणि मानसिक आजार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी योग्य पावले उचलली जात नाहीत, हे आपल्या देशाचे दुदैवच म्हटले पाहिजे.

आपल्या देशात कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आणि मस्तिष्क आघाताने मरणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. या आजारांवर खर्चही भरमसाठ केला जात आहे,मात्र त्याप्रमाणात परिणाम येताना दिसत नाहीत. वीस वर्षांपासूनच्या लोकांमध्ये या आजारांवर जनजागृती आणण्याची गरज आहे. व्यायामाचे महत्त्व आणि सकस अन्न यांचे मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. आणखी एका अहवालानुसार भारतातल्या 42 ते 64 वर्षे वयांतील 42 टक्के लोकांचे मृत्यू या  आजारांनीच झाले आहेत. कॅन्सरवर जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तितक्या लवकर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. अलिकडच्या काळात कॅन्सर रुग्णांवर आधुनिक पद्धतीने उपचार होत आहेत. औषधे उपलब्ध आहेत,मात्र या औषधांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्यात नाहीत. त्या स्वस्त होण्याची आवश्यकता आहे.

मुळात आपल्या गावपातळीवरील आरोग्य सेवा पुरती खिळखिळी झाली आहे. आरोग्य, भौतिक सुविधा नाहीत. औषधांचा पुरवठा होत नाही. वैद्यकीय आधिकारी आणि इतर कर्मचारी यांची वर्षोंवर्षे भरती करण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक परिसरात उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना महागड्या, शहरातल्या दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात किंवा उपचाराभावी कुडत मरावे लागते. असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. शासनाबरोबरच मोठमोठी देवस्थाने, सामाजिक संस्था यांनीही यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याचबरोबर लोकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत दक्ष राहिले पाहिजे. वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत योगाभ्यास आवश्यक आहे. उच्च रक्तदाब व्यायाम आणि योगासनांनी कमी करता येतो. चालणे, पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे असे व्यायाम प्रकार फायदेशीर आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली 

1 comment:

  1. बदलत्या जीवनशैलीमुळे देशातील मधुमेह आणि हायपरटेन्शनचे रुग्ण वाढत चालले असून सध्या ११.४ टक्के लोकांना मधुमेह असून ३५.५ टक्के लोकांना हायपरटेन्शन आणि १५.३ टक्के लोकांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आली असल्याचे ‘दि लान्सेट डायबेटिस अँड एंडोक्रायनोलॉजी जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये म्हटले आहे. देशातील मधुमेह आणि असंसर्गजन्य आजारांबाबतचे २०२१ मधील हे सर्वांत मोठे संशोधन आहे. मद्रास मधुमेह संशोधन फाउंडेशन आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या समन्वयाने आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने हे संशोधन करण्यात आले होते.
    गोव्यात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २६.४ टक्के असून उत्तरप्रदेशात (४.८ टक्के) ते सर्वांत कमी आहे. सिक्कीममध्ये (३१.३ टक्के) मधुमेहपूर्व लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून मिझोराममध्ये (६.८ टक्के) सर्वात कमी प्रमाण आहे. पंजाबमध्ये (५१.८ टक्के) उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे, तर रुग्णवाढीचा दर हा मेघालयमध्ये २४.३ टक्के आहे.

    ReplyDelete