आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मीठ एक फक्त अन्नपदार्थ नाही, एक पूर्ण चळवळ आहे, एक परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच इतिहासाची पाने उलटताना मिठाच्या काही कथा आपल्या समोर येतात. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांनी मिठालाच आपले शस्त्र बनवले. मिठाच्या सत्याग्रहानेदेखील स्वातंत्र्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणी व वाक्प्रचारांनी आपली भाषा समृद्ध आहे. खाल्ल्या मिठाला जागणे म्हणजे प्रामाणिक राहण्याची नीती आहे. आपल्याकडे ऐकीव गोष्टींनाही महत्त्व आहे. म्हणून कुणाकडे मिठाशी हात पसरणे चांगले नसल्याचे म्हटले जाते. या सगळ्या थांब्यांवर थांबत थांबत मीठ ज्यावेळेला आपल्या ताटापर्यंत पोहचतं, त्यावेळेला त्याची कथा आणखी वेगळीच बनते. आरोग्याच्यादृष्टीने मिठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण जाणतोच. जसा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो, तसेच मिठाचे आहे. अधिक मिठाचे सेवन आपल्याला नुकसान पोहचवते, तसे कमी मिठाच्या सेवनानेदेखील होते. त्यामुळे आपल्या आहारात योग्य प्रमाणात मीठ असायला हवे. तरच आपले आयुष्यदेखील संतुलित राहणार आहे.
अलिकडच्या काही वर्षांमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणानुसार काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्यानुसार एक म्हणजे 19 वर्षांच्या वर्षांवरील युवकांमध्ये मिठाच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मानकांपेक्षा किती तरी अधिक आहे. मानकानुसार प्रत्येक माणसाला दररोज पाच ग्रॅम मिठाचे सेवन पुरेसे आहे. मात्र सर्व्हेक्षणानुसार आपल्या भारतात रोज दहा ग्रॅमपेक्षा अधिक मिठाचे सेवन केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील तमाम जनतेला ‘मीठ जरा जपूनच खा’, जेवणातून ते शक्य तितके कमीच करा, असा धोशा लावला आहे. दैनंदिन आहारातील मीठ तीस टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार 2013 मध्ये करण्यात आला होता. हे उद्दिष्ट 2025 पर्यंत पूर्ण व्हावे, असे ठरले होते. तथापि, त्या दिशेने जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच देशांनी पावले उचलली. यामध्ये ब्राझील, चिली, चेक प्रजासत्ताक, उरुग्वे, सौदी अरेबिया, स्पेन, मेक्सिको अशा निवडक देशांचा समावेश होतो. मात्र, भारतासह बहुतांश देशांनी त्या दृष्टीने भरीव आणि ठोस पावले उचलली नाहीत. मिठाच्या वापराबाबत जनजागृती आणि त्यासाठी अन्नपदार्थ उत्पादकांना मार्गदर्शक सूचना करण्याबाबत या देशांच्या शासनसंस्थांनी तोंड बंद केले आहे. धोरणात्मक ठोस कार्यवाही केलेली नाही, ही खेदाची बाब आहे.
' द जॉर्ज इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ' या ऑस्ट्रेलियाच्या संस्थेचे एक संशोधक, ज्यांचे नाव आहे क्लेयर जॉन्सन. यांनी अलिकडेच मिठाच्या सेवनाच्याबाबतीत भारतातल्या एका अभ्यासगटाचे नेतृत्व केले होते. या अभ्यासात एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे आपल्या भारतातले लोक अधिक मीठ खाण्यावर फिदा आहेत. त्यांना जेवनात जास्त मीठ आवडते. जॉन्सन यांच्या अहवालानुसार मिठाच्या सेवनाच्या प्रमाणात घट केल्यास भारतीयांचा फायदाच होणार आहे. आपल्या खाण्यातील मिठाच्या प्रमाणात फक्त एक ग्रॅम कपात केली तरी हृदयाचा झटका किंवा हार्ट स्ट्रोकचा धोका 4.8 टक्के कमी होऊ शकतो. आपल्या देशात अशी एक धारणा झाली आहे की, आपण ज्या वातावरणात राहतो, त्या वातावरणात इच्छा नसतानादेखील अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करावे लागते. वास्तविक आपल्या देशातले हवामान उष्णकटिबंधीय आहे. त्यामुळे आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. घामाबरोबरच आपल्या शरीरातून आवश्यक असणारे सोडियमदेखील बाहेर पडते. हे कमी झालेले प्रमाण भरून काढण्यासाठी आपण मिठाचे सेवन अधिक प्रमाणात करतो. काही लोकांची अधिक प्रमाणात मीठ खाण्याची कारणेदेखील वेगवेगळी असू शकतात. काही लोक भोजन अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठीसुद्धा अधिक मिठाचे सेवन करतात. मांसाहार आणि जंक फूड खाणार्यांची दिनचर्या तर सामान्य मात्रेपेक्षा अधिक मिठाच्या सेवनाची असते. कारण असे पदार्थ ज्यादा मिठाशिवाय स्वादिष्ट लागतच नाहीत. याशिवाय जे लोक दारू-बिअरसारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन करीत असतात, त्यांच्या दिनचर्येत मिठाचे प्रमाणात अधिक असतेच.
खरे तर भारतीय व्यंजनाचा स्वाद याला अधिक कारणीभूत आहे. यात मीठ आणि अन्य मसाले पदार्थांचे प्रमाण अधिक असते. ज्यादा मिठाच्या सेवनामुळे किडनी आणि हृदयासंबंधीचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. जर आपल्या शरीरातील दोन्हीही किडन्या व्यवस्थित काम करत असतील तर समजावे की, शरीरात जाणारे अधिक मात्रेचे मीठ बाहेर टाकले जात आहे. अधिक मिठाचे सेवन आणखी एका कारणामुळे होत असल्याचे समोर
आले आहे, ते कारण म्हणजे टेबल सॉल्ट. जेवनाच्या टेबलावर मीठदाणी ठेवण्याच्या प्रथेमुळे मिठाचे सेवन अधिक प्रमाणात होत आहे. आपल्या संस्कृतीवर खरे तर हा घालाच आहे,कारण आपण पाश्चिमात्य लोकांचे अंधानुकरण करत आहोत. त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या संस्कृतीत मीठदाणी ठेवण्याची प्रथाच नाही. दुसर्या देशाचे पाहून आपण त्याचा स्वीकार करत असल्याने साहजिकच आपल्या शरीरात मिठाचे अधिक प्रमाण जाणारच! गप्पा-गोष्टी करत असताना विनाकारण आपण अन्नपदार्थांवर मीठ टाकत असतो. याचा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे.
आपल्या शरीराला वयाच्या हिशोबानेदेखील मिठाचे प्रमाण वेगवेगळे लागते. काही अभ्यासांमध्ये आपल्या देशातल्या युवकांमध्ये ज्यादा मिठाचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. शरीराला मिठाची मात्रा किती लागते,याबाबत वेळोवेळी शोध लागले आहेत. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या सेवनातून एक ग्रॅम मीठ कमी केले तर हार्ट अटॅकची शक्यता 4.8 टक्क्यांनी कमी होते. याच सर्व्हेणात आणखी एक गोष्ट समोर आली आहे, प्रत्येक चार व्यक्तींपैकी एक व्यक्ती गावात म्हणजे खेड्यात राहते. आणि जे तीन शहरात राहतात, त्यातल्या प्रत्येकी एकाला हायपरटेन्शनची समस्या आहे. हायपरटेन्शन नियंत्रणात आणण्यासाठी मिठाची मात्रा कमी करण्याची आवश्यकता असते. शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक असल्यास धमन्या अंकुचन पावतात. त्यामुळे ब्लडप्रेशर वाढते. हायपरटेन्शन कार्डियोवेस्कुलर आजारांचे मुख्य कारण बनते.
जर भारतीयांनी आपल्या जेवनातून मिठाचे 30 टक्के प्रमाण कमी केल्यास त्यांना हार्ट अटॅकमुळे होणारा मृत्यूचा धोका हा 15 टक्क्यांनी कमी होणार आहे. खरे तर रोजच्या जीवनात जे आवश्यक असलेले 10 टक्के मीठ आपल्याला फळ, भाज्या आणि धान्यधान्यादींमधून नैसर्गिकरित्या उपलब्ध होते. गेल्या काही वर्षांमध्ये असे आढळून आले आहे की, भारतीयांमध्ये डाळ, धान्य, भाज्या आणि फळांचे सेवन कमी झाले आहे तर प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फास्ट फूड यांचा खप वाढला आहे. साहजिकच मिठाच्या सेवनाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
आपल्या देशांमध्ये ज्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची किंवा फास्ट फूडची विक्री होत आहे, त्यांवर पोषक घटकांच्या प्रमाणांची माहिती दिली जात नाही. कित्येकदा त्यांची माहिती दिलेली असते, पण आपले त्याकडे लक्ष नसते. आहारातील मीठ कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत. जनजागृतीद्वारे मिठाचा वापर कशा प्रकारे कमी करता येईल, यावर भर द्यावा. धकाधकीच्या या काळात प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे अशक्य असले तरी त्यातील मिठाचे प्रमाण घटवणे शक्य आहे. त्यासाठी सीलबंद पदार्थ उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमधील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवृत्त करावे. वेष्टनावर ‘कमी मिठाचा पदार्थ’ असा ठळक उल्लेख करायला भाग पाडावे. कोणत्या प्रकारच्या पदार्थात मिठाचे तसेच सोडियम घटक असलेल्या पदार्थांचे कमाल प्रमाण किती असावे, याचीही मानके निश्चित करावीत. त्याच्या जोडीला मिठाच्या अतिरिक्त वापराने जगण्याला बसणारी खीळ किती जीवघेणी आहे, हे पटवून देण्यासाठी जनजागृती करावी.
आपण नकळतपणे मिठाचे सेवन अधिक प्रमाणात करत असतो. त्यामुळेही आजारांच्या समस्या वाढतात. जसे आपण जास्त मीठ खाल्ल्याने आपले नुकसान होते, तसे कमी मीठ खाल्ल्यानेही होते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब असतो, ते भितीने फारच कमी मीठ खातात. किंवा खातच नाहीत. अशामुळे त्यांच्या शरीरातील सोडियमची मात्रा कमी होते. मग ते हायपोनेट्रेमिया आजाराने ग्रासित होतात. खरे तर मिठाचा वापर न केल्याने त्यांच्या रक्तातील सोडियमचा स्तर 120 पेक्षाही खाली जातो. त्यामुळे रुग्ण बेशुद्ध होण्याचा धोका असतो. सामान्य माणसाच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण 135 ते 150 च्या दरम्यान असायला हवे. त्यामुळे उच्च रक्तदाब असला तरी त्याला मीठ हे खावेच लागणार आहे. पण त्याच्या शरीराच्या गरजेनुसार ते हवे. म्हणजेच आपल्या आयुष्यात मिठाचा जो फंडा आहे, तो तसा लगेच समजून येणारा नाही. कमी आणि जास्तच्या दरम्यानचा मार्ग धरूनच मिठाची मात्रा ठेवल्यास आपलेही आयुष्य संतुलित राहणार आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment