एका राजाने आपल्या मंत्र्याला सोन्याची काठी दिली आणि म्हणाला, 'जो तुला मूर्ख वाटतो त्याला ती दे.' मंत्री काठी घेऊन निघाला. खूप शोधाशोध केल्यावर एक भोळा भाबडा माणूस दिसला, त्याला मूर्ख समजून मंत्र्याने काठी त्याच्या हातात सोपवली. मंत्री त्याला म्हणाला, 'तुझ्यापेक्षा मूर्ख कोणी सापडला तर त्याला ही काठी दे.' ती व्यक्ती सुद्धा स्वतःपेक्षा अधिक मूर्ख असलेल्या व्यक्तीच्या शोधात ठिकठिकाणी हिंडत राहिला, पण त्याला अशी व्यक्ती सापडली नाही. अशा प्रकारे भटकतभटकत तो राजदरबारात पोहोचला. राजाची भेट घ्यावी, असे त्याला वाटले. त्याला त्याची परवानगी मिळाली. जेव्हा तो राजाजवळ गेला, तेव्हा त्याने पाहिले की राजा आजारी पडला आहे. राजा त्याला म्हणाला, 'आता माझी शेवटची वेळ आली आहे. मी हे जग सोडून जाणार आहे.' त्या व्यक्तीने विचारले, 'मग तुमच्या या सैन्याचे, हत्ती, घोडे, राजवाड्याचे काय होणार?' राजा म्हणाला, 'ते सगळे इथेच राहणार, दुसरं काय होणार!' यावर तो मनुष्य म्हणाला, 'अनेक युद्धांत जे धन मिळवले आहे त्याचे काय होणार?' राजा म्हणाला, 'ते सगळे इथेच राहणार.' हे ऐकून त्या व्यक्तीने ती सोन्याची काठी राजाच्या पुढे धरली आणि म्हणाला, 'ही घ्या. मला ही सोन्याची काठी माझ्यापेक्षा जास्त मूर्ख वाटणाऱ्या व्यक्तीच्या हाती सोपवण्यास सांगण्यात आले आहे. आपण यासाठी पात्र आहात .तुम्हाला तुमच्याबरोबर काहीही नेता येणार नाही हे माहीत असतानादेखील तुम्ही ते मिळवण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य का खर्ची घातले? यासाठी तुम्ही अनेकांचे प्राणही घेतले. हे सर्व मिळवून शेवटी तुम्हाला काय मिळाले? माझ्या मते जगात तुमच्यापेक्षा मोठा मूर्ख दुसरा कोणी असूच शकत नाही. म्हणूनच ही काठी तुम्ही तुमच्याकडे ठेवा.' राजा त्याची काठी पाहून आश्चर्यात पडला. त्याला मनोमन वाटले, खरोखरच तो सर्वात मोठा मूर्ख आहे.
प्रेरणा- तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते विचारपूर्वक करा.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment