Tuesday, June 20, 2023

भविष्यात दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर

हवामान बदल, मातीची धूप आणि पाण्याचे सतत होणारे शोषण यामुळे आज जगाचा मोठा भाग दुष्काळाच्या भीषण समस्येला तोंड देत आहे. हिरवीगार जंगले वाळवंटामध्ये रूपांतरित होत आहेत. अलीकडेच, संयुक्त राष्ट्राने आपल्या एका अहवालात हवामान बदलामुळे दुष्काळाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या अहवालानुसार 2000 ते 2019 या कालावधीत एक अब्जाहून अधिक लोक दुष्काळाने त्रस्त झाले आहेत. दुष्काळापासून कोणताही प्रदेश सुटला नसला तरी आफ्रिका खंडाला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. भविष्यात अमेरिका खंड, भारत आणि ऑस्ट्रेलियाची स्थितीही चिंताजनक ठरू शकते. 2000 ते 2019 या काळात आफ्रिकेत 134 दुष्काळाच्या घटना घडल्या आहेत.  70 दुष्काळाच्या घटना फक्त पूर्व आफ्रिकेत पाहिल्या गेल्या आहेत.

असेच तापमान वाढत राहिल्यास 2031 सालापर्यंत तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते आणि जगाला दुष्काळाचा अधिक फटका सहन करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.त्यात आणखी वाढ होऊ शकते.  सर्वात कमी विकसित आणि विकसनशील देशांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोणत्याही भागात दीर्घकाळ पाऊस नसेल तर तिथे पाण्याची टंचाई निर्माण होते. या स्थितीला दुष्काळ म्हटले जाते. दुष्काळ हा प्रामुख्याने तीन प्रकारचा असतो.  हवामानशास्त्रीय दुष्काळ, कृषी दुष्काळ आणि जलवैज्ञानिक दुष्काळ.  हवामानशास्त्रीय दुष्काळ हे दीर्घ कालावधीत अपुरा किंवा फारच कमी पावसाचे वैशिष्ट्य म्हणून गणले गेले आहे. 

याशिवाय पावसाचे असमान वितरणही या प्रकारच्या दुष्काळाला प्रोत्साहन देते. हवामानशास्त्रीय दुष्काळाचे मोजमाप पावसाचे प्रमाण आणि शुष्कतेच्या आधारे करता येते. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतीवर दुष्काळ पडतो. कारण जमिनीत ओलावा नसल्यास पीक वाढ होत नाही.  अशा प्रकारे पावसाअभावी शेतीवर दुष्काळाचे सावट दिसून येते. नद्या आणि तलाव यांसारख्या जलस्रोतांमध्ये कमी पावसामुळे पाण्याची कमतरता भासते, ज्यामुळे जलविज्ञान दुष्काळ पडतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि येथील बहुतांश कृषी क्षेत्र मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 68 टक्के भाग वेगवेगळ्या प्रमाणात दुष्काळाने ग्रस्त आहे. आकडेवारी दर्शवते की भारतातील 35 टक्के भागात 750 मिमी ते 1125 मिमी दरम्यान पाऊस पडतो, तर 33 टक्के भागात 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडतो, हे भाग दुष्काळाने अधिक प्रभावित आहेत. 

दुष्काळाचे दोन स्तर आहेत, एक मध्यम दुष्काळ, दुसरा तीव्र दुष्काळ. जेव्हा एखाद्या भागात पावसाची कमतरता 26 ते 50 टक्के असते तेव्हा तो सामान्य दुष्काळ मानला जातो, परंतु जर पावसाची कमतरता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तो गंभीर दुष्काळाच्या श्रेणीत ठेवला जातो. तसे पाहता, राज्य सरकारे त्यांच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या आधारे दुष्काळग्रस्त भाग ठरवतात. भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश हे दुष्काळाने सर्वाधिक प्रभावित झालेले प्रदेश आहेत. याशिवाय गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशाचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूचा दक्षिण भागालाही  दुष्काळचा फटका बसला आहे.भारतातील दुष्काळाचे मुख्य कारण म्हणजे मान्सूनमध्ये पडणारा कमी पाऊस.  10 ते 20 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला तरी दुष्काळ पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

भारतातील दुष्काळाचे एक प्रमुख कारण म्हणजे पावसाचे असमान वितरण. म्हणजे काही भागात पाऊस खूप जास्त पडतो, पण काही भागात पाऊस फारच कमी पडतो. याशिवाय, भारतात 80 टक्के पाऊस 100 दिवसांपेक्षा कमी कालावधीत पडतो, तर उर्वरित दिवसांत केवळ 20 टक्के पाऊस पडतो.याशिवाय भारताची कृषी व्यवस्थाही दुष्काळासाठी जबाबदार आहे. अनेक भागात अशी पिके घेतली जातात, ज्यासाठी पाण्याची मागणी खूप असते, परंतु तेथे पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते.त्यामुळे त्या भागात दुष्काळाचे सावट पाहायला मिळते. जागतिक बँकेचा अंदाज आहे की 2050 पर्यंत 21.6  कोटी लोक दुष्काळामुळे स्थलांतरित होऊ शकतात.  म्हणजेच भविष्यात दुष्काळाची परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे.

खरं तर, दुष्काळाचा पर्यावरण आणि समाजाच्या विविध पैलूंवर वाईट परिणाम होतो. पाऊस नसल्यामुळे पिके वाळून जातात.  पिके वाळून गेल्याने अन्नधान्याची समस्या निर्माण होते, ज्यामुळे उपासमारीची आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीचा लोकांच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होतो. याशिवाय पावसाअभावी विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण होते, लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसताना मजबुरीने मिळेल ते दूषित पाणी प्यावे लागते, त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचाही प्रश्न निर्माण होतो.  त्यामुळे जनावरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. 

ज्यामुळे देशाच्या पशुसंवर्धन उद्योगावर विपरीत परिणाम होतो.  दुष्काळामुळे जंगलाचा ऱ्हास होतो. गरिबी वाढते.  आरोग्य आणि कुपोषणासारख्या समस्या वाढतात.  साठेबाजीमुळे महागाई वाढते. राहणीमानात घसरण, सामाजिक अशांतता आणि स्थलांतर यासारख्या समस्या दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवतात. दुष्काळ टाळण्यासाठी काही उपाय करायला हवेत.  कोणते प्रदेश आणि कोणते समुदाय दुष्काळामुळे अधिक प्रभावित आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण विविध प्रदेश आणि समुदायांची असुरक्षितता प्रोफाइल तयार केली पाहिजे, जेणेकरून त्या प्रदेशांना दुष्काळापासून वाचवण्यासाठी काही धोरणे आखता येतील. सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे सिंचन व्यवस्थेतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून दुष्काळ टाळता येतो.

कोरड्या आणि पाऊस नसलेल्या भागात पाणी पुरवठ्यासाठी प्रमुख नद्या एकमेकांना जोडून ग्रीड बनवावे लागेल.पाणी साठवण्यासाठी छोटी छोटी धरणे बांधावी लागतील.पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सिंचन पद्धती बदलल्या पाहिजेत आणि ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादींचा अवलंब केला पाहिजे. दुष्काळी भागात सेंद्रिय शेती जीवनदायी ठरते.  या संदर्भात आयसीटी म्हणजेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापरालाही चालना मिळायला हवी आणि या संदर्भात सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. यासोबतच रिअल टाईम डेटा संकलनाकडेही लक्ष द्यावे लागेल, जेणेकरुन दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असताना सुरुवातीच्या टप्प्यावरच ती थांबवण्याची कार्यवाही करता येईल. दुष्काळाच्या आपत्तीशी संबंधित जी काही धोरणे ठरवली जातात, ती खालच्या स्तराच्या पातळीवर अंमलात आणली जावीत, तरच प्रतिबंधाचे योग्य व्यवस्थापन करता येईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment