हे जग आठ अब्जाहून अधिक लोकांचे आहे आणि इथे सुख-दुःखांचा मेळा आहे. आश्चर्य म्हणजे इथे सुखाबद्दल लोक कमी बोलतात, पण प्रत्येकाला स्वतःचे दुःख आणि झालेला, होणारा त्रास इतरांपेक्षा मोठा वाटतो. पण या प्रचंड समाजात असे काही लोक आहेत, जे त्यांच्या वेदना आणि त्रास प्रेरणादायी बनवून जगासाठी एक उदाहरण बनतात. त्यांच्याकडून समाज जगण्याची रीत शिकतो. तमिळनाडूतील मायिलादुथुराई येथे जन्मलेला आर विघ्नेश अशीच एक व्यक्ती आहे, जिच्या जीवनाचा प्रवास जीवनात नैराश्य आलेल्यांना मार्ग दाखवतो.
विघ्नेशचा जन्म 32 वर्षांपूर्वी अत्यंत साधारण कुटुंबात झाला. वडील टेलरिंगचे काम करायचे, त्यामुळे पाच जणांचे कुटुंब कसेतरी जीवन जगू शकत होते, पण अशा परिस्थितीतही तामिळनाडू सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे विघ्नेशच्या शिक्षणात कधीच खंड पडला नाही. लहानपणापासूनच गणिताची आवड असल्याने त्याला नेहमीच वर्गात हुशार मुलांच्या पंक्तीत स्थान मिळत असे.तो अभ्यास करत राहिला, वाढत गेला आणि 2010 मध्ये एक असे वळण आले, त्यावेळी त्याच्या हातात अभियांत्रिकीची डिप्लोमा पदवी पडली.
साहजिकच त्याला नोकरीसाठी वाट पाहावी लागली नाही. विघ्नेशने एका ब्रॉडबँड कंपनीची ऑफर स्वीकारली. अभाव आणि दुःखापासून कायमस्वरूपी मुक्तीचे दिवस आले आहेत असे त्याला वाटले.पण दुःख, समस्या कधी कुणाला सांगून येत नाही. विघ्नेशला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागत असे आणि तासनतास उभे राहावे लागत असे.2016 मध्ये त्याला पाठदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला, पण आपल्याला कामानिमित्ताने बराच काळ उभे राहावे लागत असल्याने पाठ दुखत असेल, असे वाटले. साहजिकच त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
वडील अर्धांगवायू होऊन अंथरुणाला खिळले होते, अशा स्थितीत होणाऱ्या पाठदुखीला महत्त्व देण्यापेक्षा त्याच्यासाठी घरची जबाबदारी मोठी होती. विघ्नेश शरीराच्या वेदनांशी कसा तरी लढत होता, त्याच दरम्यान त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूमुळे तो पार कोलमोडून पडला.वर्षभरातच त्याची शारीरिक स्थिती इतकी बिघडली की त्याला चार पावले चालणंदेखील मुश्किल झालं.डॉक्टरांनी विघ्नेशला महिनाभर अंथरुण सोडून उठण्यास साफ नकार दिला.एकटेपणाची इतकी हृदयद्रावक भावना त्याला याआधी कधीच जाणवली नव्हती. बहिणीचं लग्न झालं होतं आणि ती तिच्या घरी सुखी होती. भावालाही दुसऱ्या ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी लागली होती, त्यामुळे त्यालाही जावे लागले.विघ्नेशच्या मनात भयानक प्रकारचे विविध विचार घोळू लागले आणि उपेक्षेमुळे निराशा दिवसेंदिवस गहिरी होत चालली. पण याच दिवसात त्याला लहानपणीचा छंद आठवला. सूर्यप्रकाशात कागद जाळण्यासाठी,नारळाचे केशर जाळण्यासाठी तो अनेकदा 'भिंग' वापरत असे. अंथरुणावर पडूनच त्याने जगप्रसिद्ध अमेरिकन 'सनलाइट आर्टिस्ट' मायकल पापादाकिसचे यूट्यूबवर उपलब्ध असलेले सर्व व्हिडिओ पाहिले. या कलेची सूक्ष्मता जाणून घेण्यासाठी आणि समजण्यासाठी पापादाकिसचे प्रत्येक व्हिडीओ त्याने दहा वेळा पाहिला! सनलाइट पेंटिंगच्या या अनोख्या कलेने एका अभियंत्याच्या आत लपलेल्या विलक्षण कलाकाराला जागे केले. विघ्नेशला त्याच्या आंतरिक निराशेशी लढण्यासाठी एक शक्तिशाली शस्त्र सापडले.
आजारातून उठल्यावर त्याने या कलेत काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू केला.पण सनलाइट पेंटिंग ही काही साधीसोपी कला नाही. यामध्ये कॅनव्हासवर पेंट आणि ब्रशच्या सहाय्याने आरामदायी ठिकाणी बसून रचना करण्याचे नसून, भिंगाच्या मदतीने लाकडावर सूर्यकिरणांतून तयार झालेल्या आगीच्या मदतीने एक आकार तयार करावा लागतो.त्यासाठी तासनतास कडक उन्हात बसावे लागते. प्रत्येकाकडेच तेवढा संयम असतो असे नाही. पण विघ्नेशने आयुष्यात इतकं काही सोसलं होतं की त्यामुळे त्याच्या रक्तातच संयम भिनला होता. आता तो फक्त सूर्याच्या कडक किरणांच्या प्रतीक्षेत राहू लागला. कडक उन्हात तासंतास केलेल्या सरावामुळे तो केवळ भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील पहिला सनलाइट पेंटर बनला.
विघ्नेशने प्रथम त्याच्या सहीची पेंटिंग बनवली. आणि त्यानंतर त्याने पेरियार आणि करुणानिधी यांसारख्या प्रसिद्ध तसेच चित्रपट आणि क्रीडा व्यक्तिमत्त्वांशिवाय नैसर्गिक गोष्टींचीही चित्रे काढली. विघ्नेशचे पेंटिंग त्या दिवसात व्हायरल झाले, जेव्हा कोविड महामारी शिगेला पोहोचली होती आणि लोक सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय झाले होते. खरं तर, प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनी टेस्लाने विघ्नेशने तयार केलेला 'लोगो' आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता, त्यानंतर जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून विघ्नेशला रिक्वेस्ट येऊ लागल्या.
निराशेवर मात करण्यासाठी विघ्नेशने या कलेचा हा मार्ग स्वीकारला होता आणि त्या निराशेतून तो बाहेरही आला. या कलेमध्ये तो इतका रमून गेला की त्याच्याशिवाय त्याचा दिवस जाणं कठीण झालं. त्यानेही तसा कधी प्रयत्न केला नाही. आज त्याची भरभराटीची कारकीर्द आहे. एका पेंटिंगसाठी तो ६५ हजार ते एक लाख रुपये घेतो. ' असल्या फालतू कामात वेळ का वाया घालवतो' असे टोमणे मारणारे नातेवाईक आज विघ्नेशला शेजारी आणि ओळखीच्या लोकांमध्ये आपलाच म्हणून संबोधण्यात अभिमान वाटून घेतात. साहजिकच यामुळे त्याला मोठा दिलासा मिळतो. अलीकडेच क्रिकेटर विराट कोहलीचे विघ्नेशचे सनलिट पेंटिंग व्हायरल झाले आहे. आज त्याच्याकडे ना कामाची कमतरता आहे ना ओळखीची. त्याची सनलाइट पेंटिंग्स कॅनडा, सिंगापूर आदी देशांमध्ये पोहोचत आहेत. या आधुनिक एकलव्याला आता एकच इच्छा आहे, ती म्हणजे एखाद्या दिवशी मायकेल पापदाकिसचा बोलावणं येईल आणि त्याची भेट होईल. विघ्नेश म्हणजे या कला प्रकाराची भारतीय शाळा आहे आणि लवकरच रूची असलेल्या विद्यार्थ्यांना लाकडी कॅनव्हासवर सूर्यप्रकाशात चमत्कार कसा दाखवायचा हे तो आपल्या कृतीतून दाखवेल.
No comments:
Post a Comment