सीमेपलीकडून दहशतवादी घुसवण्याच्या आणि अशा प्रकारे भारताला अस्थिर करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये असलेल्या तळांवरून दहशतवादी टोळ्यांकडूनकोण कोणत्या प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत, हे आता कुणापासून लपून राहिलेले नाही. भारताला त्रास देण्यासाठी सतत नवनव्या क्लृप्त्या आखल्या जात असतात. मात्र अलीकडच्या काही काळापासून त्यांनी नवीन 'शस्त्र' वापरायला सुरुवात केली आहे.हे शस्त्र म्हणजे ड्रग्ज. भारतात ड्रग्ज पाठवायचे, जेणेकरून त्याकडे आकर्षित झालेल्यांना ड्रग्ज मिळणे सोपे होऊन जाईल. नुकतेच सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील अमृतसर येथे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडून तीन किलोपेक्षा जास्त म्हणजे सुमारे एकवीस कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. अलीकडच्या काही महिन्यात अशा अनेक घटना सिमेवर घडल्या आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना किंवा ड्रोन किंवा इतर मार्गाने भारताच्या सीमावर्ती भागात मादक पदार्थांची खेप पाठवताना सर्रास लोक पकडले जात आहेत किंवा ड्रोन पाडले जात आहेत.गेल्या महिन्यातच, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर एका पाकिस्तानी नागरिकाला सुमारे 1200 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह पकडले.
परवा मंगळवारी अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनएसबी) अमली पदार्थ एलएसडीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा जप्तकेला आहे. या कारवाईत तब्बल एलएसडी १५ हजार ब्लॉट्स जप्त केले असून, त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी आहे. डार्क नेटद्वारे कार्यरत ६ ड्रग्ज तस्करांना अटक करून मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. आजवर झालेल्या कारवाईत देशातील सर्वात मोठा साठा जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.अटक झालेल्या विद्यार्थी व तरुणांना 'विकर'सारख्या गुप्त इंटरनेट आधारित अँप्स व मेसेंजर चा वापर करीत मात्र ओळख लपवून काही तरुण कार्यरत होते. हे तरुण २५ ते २८ वयोगटातील आहेत. भारतातील तरुणांना मादक पदार्थांचे व्यसन लावण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत आणि तरुणांना सहजरित्या ड्रग्ज उपलब्ध होत आहे. त्यामुळे देशापुढील काळजी वाढली आहे.
पंजाब गेल्या दीड दशकांपासून अंमलीपदार्थांच्या विळख्यात कसा अडकला आहे आणि त्याचा तिथल्या सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे, हेही सगळ्यांना ठाऊक आहे. यावर 'उडता पंजाब " सारखे सिनेमेही निघाले आहेत. सामाजिक स्तरावर काही नियमही बनवण्यात आले आहेत. अशाप्रकारे जर समाजातील बहुसंख्य लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या नशेत बुडाली असेल, तर प्रत्येक स्तरावरील विकास आपोआपच खुंटतो. पंजाबचे उदाहरण समोर आहे, जिथे तरुणांसह मोठ्या प्रमाणात लोक विविध प्रकारच्या ड्रग्जचे बळी ठरले आहेत.आता याकडे लक्ष जायचे कारण म्हणजे तेथील लोकांसमोर या समस्येवर मात करणे मोठे आव्हान बनले आहे. पंजाबमधील जनता आता त्यांच्या स्तरावर ड्रग्जच्या विरोधात जागरूक होत आहेत. पण पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या नेत्यांनी ड्रग्सच्या परिणामातून निर्माण होणारी कमजोरी ओळखली आहे आणि ते ड्रोन, घुसखोरी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पंजाब तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ड्रग्जची तस्करी करत आहेत. गुजरातमध्ये तर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठे सापडले आहेत. समुद्रमार्गे हे मादक पदार्थ भारतात येत आहेत.
किंबहुना, अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेले लोक कोणत्याही देशासाठी किती धोकादायक आहेत आणि कोणत्या प्रकारची समस्या बनू शकतात याची चांगली कल्पना असे करणाऱ्या गटाला असते. या जाळ्यात अडकलेल्या किशोरवयीन आणि तरुणांना कोणत्याही गुन्हेगारी कृत्याकडे सहज ढकलले जाऊ शकते, देशाविरुद्ध प्रतिगामी विचारांनी अनुकुलित केले जाऊ शकते.कदाचित त्यामुळेच पाकिस्तानी हद्दीतून कार्यरत असलेल्या दहशतवादी टोळ्या एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या रणनीतीवर काम करतात आणि दुसरीकडे पंजाबमधून शांतपणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मादक पादार्थांची खेप पाठवतात. खरे तर आता काश्मीरमध्येही तिथल्या तरुणांना छुप्या पद्धतीने ड्रग्ज पुरवले जात आहेत, जेणेकरून त्यांना व्यसनाधीन करून त्यांच्या इच्छा पूर्ण करता येतील. सत्य हे आहे की, जेव्हापासून भारताने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, तेव्हापासून पाकिस्तानमधील तळांवरून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना थेट दहशतवादी कारवाया करणे कठीण झाले आहे आणि अशा घटनांमध्ये घट झाली आहे.त्यामुळेच आता इथल्या तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान करायचे आहे.साहजिकच, सरकारने आता या आघाडीवरही सदैव जागरुक राहण्याची गरज आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment