Thursday, June 29, 2023

(बालकथा) चांगुलपणाचे फळ

एक हत्ती होता, त्याचं नाव होतं भोलू.तो नंदन वनात राहत होता. तो मस्तीत खात-पीत असे. जेव्हा त्याला वाटेल तेव्हा झाडांची गोड फळे तोडून खायचा. खळखळ वाहत्या नदीत मनाला वाटेल तेवढं पाणी प्यायचा आणि सोंडेत पाणी भरल्यावर मस्तीत स्वतःवर उडवायचा. नंदन वनाजवळ एक गाव होतं जिथे रामू लोहार राहत होता. तो खूप दयाळू होता.  तो पहाटे पक्ष्यांना खाऊ घालायचा. त्याने त्याच्या दुकानाजवळ पाण्याची एक छोटी टाकी बनवली होती, ज्यामध्ये तो जनावरांना पिण्यासाठी पाणी भरून ठेवत असे.दुपारी जेवण करण्यापूर्वी तो गायींच्या चारा-पाण्याची काळजी घेत असे. रामूलाही एक मुलगा होता, त्याचे नाव मदन होते.  दोघेही आपले जीवन अगदी शांतपणे जगत होते.

एके दिवशी भोलू अन्नाच्या शोधात जंगलात आपली वाट चुकला. रात्र झाली, तो घाबरला.  घरापासून इतक्या लांब तो कधीच राहिला नव्हता.आता अंधार पडला होता आणि भोलूला भूकही लागली होती, तेवढ्यात दूरवर त्याला एक प्रकाश दिसला जो एका दुकानाजवळच्या बल्बमधून येत होता.दुकान बंद होतं, पण भोलूला बल्बच्या प्रकाशात असणं आवडलं, थकलेला भोलू दुकानाजवळ आडवा पसरला. भूक लागली असेल तर झोपही येत नाही. भोलूला त्याच्या कुटुंबाची, मित्रांची आणि जंगलाची खूप  आठवण येत होती.  थोडं रडलाही, पण नंतर डोळा कधी लागला कळलं नाही. हे दुकान रामूचे होते.सकाळी रामू आला तेव्हा त्याने भोलूला पाहिले आणि समजला की हत्ती जंगलातून भटकला आहे. रामूने भुकेल्या भोलूला केळी आणि इतर फळे खाऊ घातली, त्यामुळे भोलूचे पोट भरले.भोलूला आनंद झाला आणि त्याने आपल्या सोंडेने रामूवरचे प्रेम व्यक्त केले. अशाप्रकारे आनंदी होऊन तो जंगलात परतला.आता भोलू अनेकदा रामूच्या दुकानात येऊ लागला. रामू त्याला फळं खायला देत असे. मग काय! दोघांत खूप चांगली मैत्री झाली. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, त्यांना प्रेम आणि आपुलकी समजते.  भोलूलाही रामूचे प्रेम दिसत होते. 

एके दिवशी रामू रात्री उशिरा शहरातून गावाकडे परतत असताना वाटेत अचानक तीन-चार लांडग्यांनी त्याला घेरले. रामू घाबरून पळू लागला आणि रस्ता चुकला. त्याला दम लागला होता. एके ठिकाणी थांबला. श्वास घेत असतानाच त्याने मागे वळून पाहिले तर लांडगे त्याच्या मागेच उभे होते. रामूला त्याचा अंत दिसू लागला, तो गुडघ्यावर बसून आपल्या देवाची प्रार्थना करू लागला, तेवढ्यात अचानक चित्कारण्याचा आवाज आला, रामूने समोर भोलू हत्ती उभा असल्याचे पाहिले. भोलूला पाहताच लांडग्यांची शिट्टी-बिट्टी गुल झाली.ते भोलूपुढे नतमस्तक झाले आणि तिथून धूम ठोकली.ते पाहून रामूच्या जीवात जीव आला. भोलूने रामूला पाठीवर बसवून त्याच्या घरी नेले.म्हणूनच म्हणतात की, सत्कर्म हे नेहमी स्वार्थाशिवाय केले पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment