राहणीमान आणि दिनचर्या
सुभेदार होळकरांच्या सूनबाई
आणि महाराणी असलेल्या अहल्याबाई यांची राहणी अत्यंत साधी होती. इतिहासकार वर्णन करतात की, अहल्याबाई मध्यम बांध्याच्या आणि सावळ्या रंगाच्या होत्या.त्याम्चे केस काळेभोर आणि चेहरा बाणेदार होता. धार्मिक
व सात्त्विक वृत्ती त्यांच्या चेहर्यावर दिसून येत असे.
पती निधनानंतर त्यांचा पोशाख सदैव पांढरा असे. त्या नेहमी पांढर्या असनावर बसत. त्यांचा चेहरा जरी शांत आणि सोज्वळ वाटत असला तरी कोणी असत्य वचन करीत असलेला
पाहताच त्या रागाने लालबुंद होत. त्या रागावल्या म्हणजे त्यांच्यासमोर
जायची कुणाचीही हिम्मत होत नसे. अपराध्याला त्या असे शासन करीत
की, तो पुन्हा तसे कृत्य करीत नसे. त्यांची
दिनचर्यादेखील व्यस्त होती. सूर्योदयापूर्वीच पहाटे 4
वाजता त्या उठत. प्रातर्विधी, स्नान,पूजापाठ झाल्यानंतर काहीकाळ पुराण श्रवण करीत.
सकाळी दानधर्म करून ब्राम्हणांना भोजन देत. त्यानंतर
घरच्यांसमवेत स्वत: भोजन करीत. त्यांचे
भोजन सात्त्विक आणि शुद्ध शाकाहारी असे. भोजनानंतर दुपारी काही
काळ विश्रांती घेत. मग पोशाख करून सरकारी कामासाठी दरबारात जात.
पत्रव्यवहार बघत. दरबारातील कामे सूर्यास्तापर्यंत
चालत. त्यानंतर दोन तास पूजाअर्चा चाले. रात्री नऊपासून अकरापर्यंत सरकारी मसलती,धार्मिक उपक्रम,सामाजिक सुधारणा यावर चर्चा चाले. रात्री त्या जेवण करत
नसत. फक्त फलाहार आणि दूध घेत. पती निधनानंतर
त्यांनी एकभुक्त व्रत अंगिकारले होते. त्यांच्या दिनचर्येत फारसा
फरक पडत नसे.
हुंडाबंदीचा फतवा
महेश्वर येथील दरबारात एकदा पाच ब्राम्हण आले आणि
त्यांनी आपल्या मुली शिक्षित असूनही हुंड्याशिवाय विवाह होत नाहीत, अशी तक्रार करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावेळी अहल्याबाई यांनी तात्काळ कारकून मुकुंद हरी यांना बोलावून फतवा काढला
की, श्री शंकर आज्ञेवरून हुकूम जारी करण्यात येतो की,
कोणत्याही जाती किंवा जमातीत विवाहसमयी कोणी वधू पक्षाकडून द्रव्य घेईल
त्यास घेतलेले सर्व द्रव्य आणि त्या रकमेइतकेच द्रव्य सरकारकडे भरावे लागेल.
याशिवाय वेगळा दंडही भरावा लागेल.या फतव्याच्या
0 नकला काढून प्रांतातील विविध भागात पाठवून त्याची अंमलबजावणी करण्यात
आली. सुमारे 300 वर्षांपूर्वीच त्यांनी
हुंडाबंदीचा कायदा केला होता.
महेश्वरला हलविली राजधानी
इंदूरचे प्राचीन नाव इंद्रपुरी
आहे. भारतीय प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या
या शहराला मल्हारराव होळकरांनी राजधानीचा दर्जा दिला होता. पेशवाईचा
कारभार पुणे इथून चाले. तर पेशव्यांचे सरदार भोसले यांची राजधानी
नागपूर, शिंदे यांची ग्वाल्हेर, गायकवाड
यांची बडोदा तर होळकर यांची इंदूर ही राजधानी होती. अहल्याबाई
विवाहानंतर 32 वर्षे इंदूर येथे राहत होत्या. राज्यकारभार हाती घेतल्यावर त्यांनी अनेक शहरात सुधारणा घडवून आणल्या.
इंदूर येथील राजवाडा, लालबाग, शशिमहल, अन्नपूर्णा मंदिर आदींची उभारणी व देखभाल अहल्याबाईंनी
केली. गौतमपुरा आणि उदापूर ही नवीन नगरे त्यांनी वसवली.
पुत्र मालेराव यांच्या निधनानम्तर त्यांचे मन इंदूर येथे रमत नसल्याने
त्यांनी महेश्वर येथे राजधानी हलविली. सेनापती तुकोजी होळकर आणि कमावीसदार यांचा विभाग मात्र इंदूर येथेच होता.
नवीन राजधानी महेश्वर हे नर्मदाकाठी वसलेले तीर्थक्षेत्र
होते. निसर्गरम्य स्थळ असल्याने अहल्याबाईंनी या शहराची निवड
केली. राजधानी झाल्यावर या शराचा झपाट्याने कायापलट झाला.
अहल्याबाईंनी नर्मदाकाठी सुंदर घाट बांधून मंदिरे उभारली. या मंदिरांमधून वेदपठण,पूजा- अर्चा,
अभिषेक सुरू झाले. वैदिक,पौराणिक आणि धार्मिक ग्रंथांचा संग्रह करून त्यांचे ग्रंथ मंदिरेही उभारण्यात
आली. त्यांनी वळणदार आणि सुवाच्च्य हस्ताक्षर असणार्या लेखनिकांना पोथ्या लिहिण्याचे काम सोपवले. गवंडी,सुतार,पाथरवट यांना घाट,मंदिरे,राजवाडा उभारणीची कामे मिळाली. महेश्वरला अहल्याबाईंनी मोठा सुंदर राजवाडा बांधला. तेथे सर्व
सुखसोयी होत्या. परंतु त्या एका साध्या घरात साधेपणाने राहत होत्या.
महेश्वर नगरीत विणकर व्यवसाय मोठ्या प्रमाणात
सुरू झाल्याने येथील महेश्वरी साडी अतिशय प्रसिद्ध झाली.
महेश्वर बाजारपेठेचा नावलौकिक वाढला. पुराणकाळात हे शहर महिष्मती नगरी म्हणून ओळखली जात होती. येथे सहस्त्रार्जुन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने
नर्मदा नदीचा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख पुराणात सापडतो. आद्य शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांचा गाजलेला अध्यात्म वाद येथेच झाल्याचे
सांगण्यात येते.
No comments:
Post a Comment