Thursday, May 25, 2017

सांगलीचे वस्तूसंग्रहालय


सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वस्तू संग्रहालय आहे. सांगली शहराची अनोखी ओळख या संग्रहालयातून होते.ऐतिहासिकदृश्ट्या या संग्रहालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.इथे मौल्यवान आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे.9 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली  राधाकृश्नन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मुंबईतील व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांनी इतिहास संशोधकांच्या साहाय्याने मुंबई येथे 'विश्रामभुवन' या वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली होती. महायुद्धानंतर मावजींनी संग्रहालयाचा काही भाग 'प्रिन्स ऑफ वेल्स' या संग्रहालयास विकला.त्यातील काही वस्तू सांगली संस्थांनने विकत घेतल्या आणि सांगलीत 'सांगली स्टेट म्यूझियम' सुरू केले.30 जून 1976 रोजी संग्रहालय पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचलनायाच्या नियंत्रणात आले.
परदेशी कलाकार जेम्स वेल्स यांची तैलरंगातील चित्रे खास आकर्षण आहेत.त्यातील सवाई माधवराव पेशवे,नाना फडणवीस या इतिहास प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी चितारलेली मूळ चित्रे इथे उपलब्ध आहेत.रा.धुरंधर,व्ही.व्ही.साठे,गांगुली या भारतीय चित्रकारांचीही चित्रे संग्रहालयात मांडण्यात आली आहेत.ए.एच.मुल्लर यांची रामायणातील प्रसंगांवर आधारित 15 तैलचित्रे संग्रहाचा अनमोल ठेवा आहे.प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हातरे यांचे शबरीच्या वेशातील पार्वती हे वैशिट्यपूर्ण शिल्प साऱ्यांना खूणावते.जलरंगातील चित्रांचेही खास दालन आहे.इटलीतील पिसाच्या झुकत्या मनोर्याचीही मार्बल प्रतिकृती,सलीम चिस्ती यांच्या कबरींची प्रतिकृती ,जपानमधील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती पाहण्यासारखी आहे.
चिंचोक्यावधी चंदनी लाकडात केलेले कोरीव काम ,हस्तीदंतावरील नाजूक कोरीव काम ,चंदनाच्या मूर्ति ,विविध धातूंचे ओतकाम ,नक्षीकाम ,उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने असणारी भांडी,प्राचीन तांब्रपट,श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी शिकार केलेली हिंस्र जंगली जनावरे अशा सुमारे 955 पेक्षा अधिक नानाविध वस्तू सांगलीच्या वस्तू संग्रहालयात आहेत.


No comments:

Post a Comment