Monday, May 29, 2017

(यशोगाथा कष्टकऱ्याची ) दुष्काळातला केशर आंबा जपानला


     ग्रामीण भागातला शेतकरी आता शिकला सवरलेला आहे. त्याला कमी खर्चात, कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घ्यायचे याचे ज्ञान आहे. उत्पादन चांगले रसायनविरहित असेल आणि सेंद्रिय खतांचा वापर केला गेला असेल तर शेतमालाच्या विक्रीसाठी जाहिरातही करावी लागत नाही. व्यापारी जागेवर येऊन माल घेऊन जातात. याची खात्री असल्याने त्याची जाहिरात करावी लागत नाही. असेच काहीसे सांगली जिल्ह्य़ातील जाधववाडी (ता. खानापूर) येथील विश्वजित कदम यांच्या केशर आंब्याबाबतीत झाले आहे. नैसर्गिकरीत्या आलेला हा आंबा गोड आणि हापूस, पायरीसारखा चवदार आहे. कदम यांचा एक टन केशर आंबा जपानला निर्यात झाला आहे.

     कदम यांचा आंबा आजपर्यंत शिल्लक राहिलेला नाही. फळांचा दर्जा आणि माफक दर यामुळे त्यांच्या आंब्याचा उठाव होतो. कोकण, कर्नाटकातून येणाऱ्या हापूस, देवगड, कर्नाटकी जातीच्या दोन डझन आंब्याच्या पेटीचा दर हजार ते दीड हजार असतो. शिवाय जास्त पैसे मोजूनही मालाची खात्री नसते. आंबे चांगले मिळण्याची शक्यता कमीच. शिवाय हल्ली रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकविण्याची चलतीच आहे. अशा वेळेला कदम यांच्यासारख्या खात्रीने चांगली फळे मिळणाऱ्या शेतकऱ्याकडे ग्राहक आपोआपच वळतो. कदम यांचे केशरी आंबे परिसरात चांगलेच प्रसिद्ध आहेत. कदम यांच्या आंब्याला बाजारात दीडशेपासून चारशे रुपयांपर्यंत डझनाला दर मिळतो. एक टन आंबा त्यांनी १०५ रुपये दराने जपानला निर्यात केला आहे.
     कदम यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खतावर मूरमाड आणि खडकाळ माळरानावर आपली आंब्याची बाग फुलवली आहे. एक हजार झाडांची त्यांनी लागवड केली आहे. या वर्षी त्यांनी बागेसाठी एक लाख रुपये खर्च केला असून त्यातून त्यांनी दहा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. दरवर्षीचा त्यांचा हाच आकडा निश्चित आहे.
     घाटमाथ्यावरील शेतकरी भीषण पाणीटंचाईला तोंड देत असतानाही माळरानावर नगदी पीक द्राक्षाबरोबरच केळी, डाळिंब आणि आता आंबा पीक घेऊ लागला आहे. शेतकरी जागृत झाला असून ग्राहक रासायनिक फळांपेक्षा सेंद्रिय अथवा रसायनविरहित फळांकडे आकर्षित झाला आहे. हे जाणून शेतकऱ्यांनी मुद्दामच देशी, सेंद्रिय फळे पिकवण्यावर भर दिला आहे.
     बाजाराचे गणित शेतकऱ्यांना कळले आहे. शेतातील रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर मिळत असले तरी जमिनीची गुणवत्ता ढासळत आहे. त्याचबरोबर रासायनिक खतांमुळे विषयुक्त शेतीला प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे. म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करून पीक घेणे लाभदायक आणि भविष्यासाठी गरजेचे असल्याचे कमद सांगतात. आंब्याच्या झाडांची काळजी घेताना कुटुंबीयांचीही मोलाची मदत मिळाली.
भविष्यात आंब्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.(loksatta,27/05/2017)


No comments:

Post a Comment