Friday, May 26, 2017

पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर


न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती म्हणजे स्त्रीला स्वत:चे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच नव्हते.तसेच बालविवाह,जरठ-बालविवाह,सती जाणे, विधवा केशवपन अशा अनिष्ठ रुढी समाजात होत्या. स्त्रीच्या बुद्धिमत्तेला आणि कार्यकौशल्याला वावच दिला जात नव्हता, अशा काळात एक कुशल राज्यकर्ती,प्रजाहित दक्ष महाराणी म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला,धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर राहून राज्यकारभाराचा गाडा चालविला,प्रशासनाची आर्थिक घडी नीट बसवली,ज्यांच्या कार्याचा इतिहासात गौरवाने उल्लेख केला जातो अशा कुलवंत, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची येत्या बुधवारी (दि.31 मे) रोजी तारखेनुसार जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न...
बालपण आणि विवाह

नगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवरील चौंडी या गावी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी शके 1647 मध्ये (..1725)ाहल्याबाई यांचा जन्म झाला.माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. खंडोबा हे त्यांच्या धनगर समाजाचे कुलदैवत होय. चौंडी गावच्या पश्चिमेला सिना नदी वाहते.नदीवरील घाटाच्या पूर्व दिशेला चौंडेॅश्वराचे सुबक मंदिर होते. छोटी अहल्या आपल्या वडिलांबरोबर चौंडेश्वराच्या मंदिरात जाई. वडिल मंदिरात ध्यानस्थ बसत तेव्हा ती त्यांचे अनुकरण करीत असे. वयाच्या आठव्या वर्षी  अहल्याबाई यांचा विवाह खंडॅराव होळकर यांच्यासमवेत झाला.या विवाहासंबंधी एक कथा अशी सांगण्यात येते की, चौंडी गावच्या नदीकाठी अहल्या आणि तिच्या बालमैत्रिणी वाळूचे शिवलिंग करत होत्या. त्याचवेळी पेशव्यांचे सैन्य आल्याने भरधाव घोडे बघून बालमैत्रिणी पळून गेल्या. अहल्या मात्र शिवलिंगाचे रक्षण करत तेथेच उभी राहिली. त्यावेळी बाजीराव पेशवे यांना या मुलीचा धीटपणा बघून खूपच आनंद झाला. आणि त्यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांना सांगितले की, या मुलीला सून करून घ्या,कर्तृत्वाने ती तुमच्या घराण्याची कीर्ती आणि नावलौकिक वाढवेल. पेशव्यांचे  हे बोल खरे ठरले. 20 मे 1733 रोजी खंडेराव आणि अहल्या यांचा विवाह समारंभ यथासांग पार पडला. श्रीमंत पेशवे या समारंभाला हजर होते. जेवणाच्या मोठ्या पंगती उठल्या. मल्हारराव होळकर यांनी चांदीच्या परातीतून प्रत्येकास मूठभर पेढे वाटले.
पती खंडेराव यांचे निधन
अहल्याबाई यांचे पती खंडेराव यांचा जन्म 1723 साली झाला. मल्हारराव होळकर यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे खंडेराव अतिशय लाडाकोडात वाढले होते. खंडेराव शूर होते. परंतु ते सतत भांगेच्या नशेत असल्याने संसाराकडे दुर्लक्ष होते. त्यांना अहल्याबाई यांच्याशिवाय आणखी सात पत्नी होत्या.नशेत असले तरी ते अहल्याबाईसमवेत सभ्यपणाने वागत. राज्याचे काम आपल्या अक्कलहुशारीने व कर्तबगारीने पुढे नेण्याची धमक खंडेरावात नव्हती. त्यामुळे मल्हारराव यांनी अहल्याबाईंना न्यायदान,फडणविसी तसेच फौजेसाठी लागणारी सामग्री बनविणे आदी राज्यकारभारास योग्य अशा सर्व बाबींचे शिक्षण दिले होते. खंडेराव आपल्याप्रमाणे शूर व्हावा या उद्देशाने मल्हारराव त्याला आपल्याबरोबर घेऊन जात असत. वयाच्या बाराव्या वर्षांपासून खंडेराव मोहिमेवय जायला लागले होते. त्याच्या शौर्याबद्दल श्रीमंत बाजीराव पेशव्यांकडून त्यांना 15 ऑगस्ट 1735 रोजी शिलेदाराची वस्त्रे मिळाली होती. पावसाळ्याची चार महिने खंडेराव हे नाटकशाळांमध्ये मग्न असत. त्यानंतर मात्र ते लढाईवर असत. एकदा सूरजमल जाट यांच्यात वाद निर्माण झाला. मराठा सैन्याने जाटांवर हल्ला करण्याचे ठरविले. जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दडून बसला होता. या किल्ल्यावर मोर्चे लावण्याची जबाबदारी खंडेराव होळकर यांच्यावर होती. दोन महिने उलटून गेले तरी किल्ला सर होत नव्हता. 17 मार्च 1854 ला खंडेराव किल्ल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यातून एक तोफगोळा सुटला. हंडेरावांच्या मानेवर तोफगोळा बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. अहल्याबाई होळकर यांच्यावर तर आकाशच कोसळले.
सती जाण्यापासून रोखले

पती खंडेराव यांच्या मृत्यूनंतर अहल्याबाई यांनी सती जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सतीचे वस्त्र धारण केले. आणि अंत्ययात्रेबरोबर निघाल्या.त्यावेळी सासरे मल्हारराव यांनी अहल्याबाईंना रोखले. मल्हारराव होळकर म्हणाले, मुली,तू सती जाऊ नकोस. आमचा उन्हाळा करू नकोस. आजपासून तूच माझा पुत्र खंडू आहे. तूच आता प्रजेची पालनकर्ता आहेस. मी समजून घेईन की, अहल्या मेली, माझा खंडू जिवंत आहे. असे म्हणत ते रडू लागले. सासर्याची ही अवस्था बघून अहल्याबाई यांनी सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. त्या सती गेल्या नाहीत. परंतु, आपल्या मुलीला मात्र सती प्रथेपासून रोखू शकल्या नाहीत. त्यांच्या नातसुनाही सती गेल्यामुळे अहल्याबाई पार खचून गेल्या.

No comments:

Post a Comment