Monday, January 31, 2022

शस्त्रास्त्र व्यापारात भारताची मुसंडी


फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे विकण्याच्या करारानंतर भारत आता जगातील सर्वात मोठ्या क्षेपणास्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये सामील झाला आहे.  संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात भारताचे यश आता छोटे राहिलेले नाही.  देश आधीच अनेक प्रकारच्या संरक्षण वस्तू, उपकरणे, शस्त्रे आणि सुट्या भागांची निर्यात करत असला तरी क्षेपणास्त्रे विकण्याचा करार प्रथमच झाला आहे.  फिलीपिन्ससोबतचा हा करार संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरला आहे.

गेल्या काही वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत आणि शस्त्रे आणि संरक्षण उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनावर म्हणजेच 'मेक इन इंडिया'वर भर दिला आहे. त्याचीच ही परिणीती आहे, असे म्हणायला हरकत नाही. फिलीपिन्ससोबतचा हा क्षेपणास्त्र करार आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे कारण इतर आशियाई देशही आता भारतासोबतच्या संरक्षण सौद्यांमध्ये रस दाखवताना दिसत आहेत.  थायलंड, व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांनीही भारताकडून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत.  या देशांना खरा धोका चीनकडून आहे.  त्यामुळे आपल्या लष्कराला अत्याधुनिक बनवणे त्यांच्यासाठी मजबुरी बनले आहे.  साहजिकच संरक्षण वस्तू आणि क्षेपणास्त्रांसारख्या शस्त्रास्त्रांच्या व्यापारासाठी भारतासमोर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
गेल्या सात वर्षांत भारताच्या संरक्षण निर्यातीत झपाट्याने वाढ झाल्याने आपण आता या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, हे आता सिद्ध झाले आहे.  संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी केवळ शस्त्रेच नव्हे तर सिम्युलेटर, टॉर्पेडो सिस्टीम, पाळत ठेवणे आणि नियंत्रण प्रणाली, अंधारातही पाहाता येणारी उपकरणे, चिलखती वाहने, सुरक्षा वाहने, शस्त्र शोधण्याचे रडार, कोस्टल रडार सिस्टीम यासारख्या प्रगत प्रणालींचीही निर्यात केली आहे.  सध्या भारत सत्तरहून अधिक देशांना संरक्षण उत्पादने विकत आहे, ही बाब काही कमी नाही.
आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येईल की 2014-15 मध्ये भारताची संरक्षण निर्यात एक हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची होती, जी 2017-18 मध्ये चार हजार सहाशे 82 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि 2018-19 मध्ये  दहा हजार कोटी रुपयांचा  पल्ला गाठला.  एका वर्षात पाच हजार कोटींहून अधिकच्या या निर्याय उड्डाणावर प्रोत्साहित होऊन सरकारने पुढील पाच वर्षांत वार्षिक पस्तीस हजार कोटींच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.  विशेष म्हणजे अवकाश क्षेपणास्त्राच्या विक्रीलाही सरकारने मान्यता दिली असून अनेक आशियाई देशांव्यतिरिक्त  आशिया बाहेरील केनिया, सौदी अरेबिया, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देशही या क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून असलेला भारत आज बहुतांश शस्त्रे स्वतःच बनवत आहे, ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे.  त्याचाच परिणाम म्हणजे आज भारत आर्मेनियासारख्या देशाला संरक्षण वस्तू विकतो आहे जो एकेकाळी रशिया आणि पोलंडसारख्या देशांवर अवलंबून होता.  बुलेट प्रूफ जॅकेट विक्रीच्या बाबतीत अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीनंतर भारत हा चौथा देश बनला आहे.  सरकारने देशांतर्गत कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यास आणि  संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या नवीन कंपन्या सुरू करण्याकडे लक्ष दिल्यास भारत निश्चितच या क्षेत्रात मोठा निर्यातदार होऊ शकतो, यात शंका नाही.  मात्र या व्यवसायासाठी कंपन्यांना स्पर्धात्मक बनविण्याबरोबरच त्यांना लाल फितीच्या जाळ्यातून   मुक्त करावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment:

  1. ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमामुळे देशातच स्वदेशी बनावटीच्या युद्ध सामग्रीची वेगाने निर्मिती होऊ लागली असून मागील काही दिवसांमध्ये भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. एरव्ही परकी उत्पादनांवर अवलंबून राहणारा भारत अन्य देशांना देखील युद्ध सामग्रीचा पुरवठा करू लागला आहे. भारतीय संरक्षण उत्पादनांच्या बाजारपेठेचे मूल्य प्रथमच एक लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.१ लाख कोटी रुपये - २०२२-२३ मध्ये तर ९५ हजार कोटी २०२१-२२१२ मध्ये होते.
    संरक्षण सामग्रीच्या उत्पादनादरम्यान येणारे अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार हे उद्योगक्षेत्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वयाने काम करते आहे. यामाध्यमातून देशातील संरक्षण उत्पादनाला चालना देण्यात आली आहे. यासाठी अनेक उद्योगानुकूल निर्णय घेण्यात आले असून एमएसएमई आणि स्टार्टअपला पुरवठा साखळीत सामावून घेण्यात आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

    ReplyDelete