Thursday, January 20, 2022

मुलांच्या विश्वात पालकांचे स्थान


दिल्लीत दुधाचा छोटासा व्यवसाय करणाऱ्या सत्तावीस वर्षांच्या पित्याने घरात शिरताच आपल्या पाच वर्षांच्या मुलाला अभ्यास करण्याऐवजी मोबाईलवर खेळताना पाहिलं आणि रागाच्या भरात त्याला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.  ही दुर्दैवी, दु:खद घटना अनेक पालकांसाठी इशारा देणारी आहे.  कोरोनाच्या काळात एकीकडे पालकांवर आर्थिक, मानसिक ताण वाढला आहे, तर दुसरीकडे घरात कोंडून ठेवलेल्या मुलांना मोबाईल-टीव्हीचा आधार मिळाला आहे.  पालकांना आपल्या मुलांना अभ्यासातून यश मिळावे अशी इच्छा असणं स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्या या अव्यवहार्य अति-महत्त्वाकांक्षेचा दुःखद अंत होऊ शकतो, हे या घटनेवरून लक्षात येतं.

आपण अनेक घरांमध्ये बघतो की मुलं मोबाईलशिवाय अन्नाला हात लावत नाहीत. मुले जेवताना  टीव्ही-मोबाईल पाहण्यात व्यस्त असतात,  नोकरी करणाऱ्या पालकांसाठी तर टीव्ही, मोबाईल सोयीचीच बाब झाली आहे. काही का असेना मुलं व्यस्त आहेत ना,याचं समाधान नोकरदार पालकांच्या चेहऱ्यावर असतं. शाळा बंद झाल्यामुळे मुले घरी असणं आणि त्यातले आठ ते दहा तास त्यांचा स्क्रीन टाइम असणं, ही एक सामान्य गोष्ट बनली आहे.  खरं तर हे चिंताजनक आहे.  मोबाईल मुलांना व्यसनाधीन बनवत आहे. मुले मोबाईल फोबियाचे शिकार होत आहेत. तसेच ज्या पालकांना आपल्या मुलांनी मोबाईल सोडावा असे वाटते, ते स्वतः मात्र मोबाईलशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत.  वस्तुस्थिती अशी आहे की मुलं घरी असतात, पण त्यांचा रचनात्मक आणि सकारात्मक वापर कसा करता येईल यासाठी पालकांकडे कोणतीही ठोस योजना नाही. पालकांनी आपला पाल्य मोबाईलपासून कसा दूर राहील याचा, विचार केला पाहिजे. मोबाईलपासून मुलांना दूर सारण्यासाठी शिक्षा हा काही उपाय नाही.
शाळा बंद झाल्या खऱ्या, पण किती पालकांनी आपल्या घरातल्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून आपला दिनक्रम बदलला?  शाळा मुलांना मोबाईलवर शिकवते आणि गृहपाठ देते, तेव्हा मुलाचे लक्ष फक्त शाळेच्या कामावर आहे का? हे किती पालक पाहतात?  त्यासाठी पालक वेळ देतात का?
मुलांना ऑनलाइन  शिक्षणाचाही कंटाळा येणं स्वाभाविक आहे. शाळेत वर्गात उपस्थित राहूनही सगळ्या मुलांचं लक्ष शिक्षकांच्या शिकवण्याकडं असतं का? तसंच आता ऑनलाइन शिक्षणाबाबत होत आहे. त्यामुळे तास सोडून मुलं गेमसारख्या प्रकाराकडं वळतात. मुलं आपलं मनोरंजन शोधतात. काही संशोधन सांगत की, जर एखाद्या मुलाने तासभर फोन वापरला तर त्याची झोप सोळा मिनिटांनी कमी होते.  तो त्याची एकाग्रता टिकवू शकत नाही. अलिकडे वाचण्याऐवजी बघण्याकडे कल वाढला आहे. आताच्या मुलांमध्ये शारीरिक श्रमातून सुटका करून घेण्याचे भाव दिसत आहे. साहजिकच समस्यांना तोंड देण्याचे धैर्य कमी होत चालले आहे. हे बदलत्या जगाचे लक्षणदेखील आहे.  आता पालकांना इच्छा असूनही आपल्या मुलांना इंटरनेट आणि मोबाईलपासून दूर ठेवता येणार नाही.आता ऑनलाइन शिक्षण (शिकवणी )देणाऱ्या संस्था तयार झाल्या आहेत. हा 1980-1990 चा काळ नाही, या काळात संपूर्ण कुटुंब आठवड्यातून दोनदा (शनिवार-रविवार) दूरदर्शनवर चित्रहार आणि रामायण-महाभारत पाहायचे, बाकीचे दिवस टीव्ही बंद असायचा.  अशा रीतीने त्याकाळी टीव्ही पाहण्याची वेळ आणि काय पाहावे या दोन्हींवर नियंत्रण होते.  आता पालकांनी कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बदललेल्या काळामुळे त्यांच्या हाती निराशाच येईल.  पालकांना आज त्यांच्या इच्छेविरुद्ध बरेच काही स्वीकारावे लागणार आहे.  आजची मुलं माहितीच्या प्रवाहात आहेत.  एका क्लिकवर ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्याशी जोडले जाऊ शकतात.  आजची किशोरवयीन मुले एका आभासी जगाच्या दारात उभी आहेत, ज्यांचा शब्दसंग्रह, त्याची भाषा पालकांना ज्ञात नाही, अवगत नाही. त्यांचे नायक आता देशीबरोबरच परदेशीही व्यक्ती आहेत.
पण जे पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच मोबाईल देऊन त्यांना गप्प करण्याचा सोपा मार्ग शोधतात, त्यांच्यासाठी पुढे ही समस्या गंभीर बनू शकते. पालकांकडे त्यांच्या मुलांना  एकत्र फिरायला बाहेर घेऊन जाण्यासाठी आणि काही शारीरिक श्रमाचे खेळ खेळण्यासाठी, संगीत कलेसाठी प्रेरित करण्यासाठी, त्यांच्याशी तर्कशुद्ध संवाद साधण्यासाठी वेळ नसेल, तर त्याचे मोठे दुष्परिणाम पुढील काही वर्षांत मुलांवर दिसतील. मोबाईल-इंटरनेटचे जग मुलांना पैसे कमवण्याच्या सोप्या मार्गांकडे आकर्षित करते.  या महिन्यात उघडकीस आलेल्या सुली, बुली अॅप प्रकरणात  द्वेष पसरवल्याप्रकरणी काही तरुणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.  आपल्या देशात माहिती तंत्रज्ञान कायदे, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांशी संबंधित तरतुदी, भारतीय दंड संहिता आणि आंतरराष्ट्रीय कायदे यांच्या ज्ञानाचा अभाव आहे, ज्यामुळे मुलांवर अनावधानाने गुन्हे घडताना दिसत आहेत.  मोबाईल-इंटरनेटच्या वापरावर सक्ती आणण्यापेक्षा त्याचा सर्जनशील वापर कसा करायचा, हे पाहण्याची पालकांची पहिली जबाबदारी आहे.
तंत्रज्ञानाचा विकास आता आपल्याला थांबवता येणार नाही.  जगात मोबाईलचा विस्तार झपाट्याने वाढत असून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्यादेखील लाखो -करोडेने वाढत आहे आणि त्याच बरोबर त्यांच्याशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे.  अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाशी सुसंगत असणे आवश्यक आहे.  मुलांच्या संगोपनापासून ते सामाजिक जडणघडण, परस्पर संबंध आणि संवाद आदी इतक्या वेगाने बदलत आहे की केवळ व्यक्तीच नाही तर कुटुंबेही एकाकी होऊ लागली आहेत.  पालकांनी या मर्यादा ओळखून पर्याय शोधण्याची गरज आहे.  पालकांनी आपल्या मुलांबद्दल अति-महत्त्वाकांक्षी आणि मानसिक ताण टाळणे आवश्यक आहे. मुलांना सध्याची सामाजिक परिस्थिती वारंवार समजावून सांगितली पाहिजे. त्यांना सावध केले पाहिजे. आज फार मोठी जबाबदारी पालकांवर येऊन ठेपली आहे. पालकांनी मुलांच्याबाबतीत वेळ आणि संयम पाळला तर मुले भविष्यातील परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेतील आणि जगात आपले स्थान निःचित करतील. फक्त तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात आणि त्यांना समजून घेत आहात,असे त्यांना वाटू द्या. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment