मंगळ ग्रहावर जीवनाची शक्यता शोधण्यासाठी काही देश वेगवेगळ्या प्रयत्नाला लागले आहेत. आता चीनचे अवकाशयानदेखील लाल ग्रहावर जीवनाच्या शक्यतेचा शोध घ्यायला त्याच्याजवळ पोहचत आहे. संयुक्त अरब अमिरातचे यान 'होप' मंगळाच्या कक्षेत दाखल झाले आहे आणि अमेरिकी अवकाश संस्थेचा रोव्हरदेखील लाल ग्रहावर उतरला आहे. आतापर्यंत अमेरिका हा असा एकमेव देश आहे,जो मंगळावर यशस्वीपणे अवकाश यान उतरवले आहे. इतकंच नव्हे तर या देशाने ही किमया तब्बल आठ वेळा केली आहे.नासाची दोन रोबोट संचालित वाहने (लँडर) इनसाईट आणि क्युरियोसिटी तिथे काम करत आहेत.सहा आणखी अवकाश याने मंगळाच्या कक्षेतून लाल ग्रहाची छायाचित्रे घेत आहेत,यात अमेरिकेची तीन, युरोपीय देशांचे दोन आणि भारताचे एक.आता असं वाटतं की, तो दिवस दूर नाही की, जेव्हा मानव मंगळावर आपला 'आशियाना' बांधण्याच्या दिशेने पावलं उचलेलं.
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तो तांबूस रंगाचा दिसत असल्याने त्याला ‘रेड प्लॅनेट’ असेही म्हणतात. त्याच्यावरील वातावरण विरळ असून, त्यात प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड आहे. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. ज्यामधील काही ज्वालामुखी अजूनही कार्यरत आहेत. निरीक्षणाद्वारे मंगळावर कालव्यांच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे व या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे सजीव सृष्टी असावी, असा अंदाज वर्तविण्यात येतो. मंगळावरील ध्रृवीय भागात मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत बर्फ आढळले आहे. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून काहीसा जास्त म्हणजेच 6795 किलोमीटर आहे. मंगळाचा आस सूर्यभ्रमण कक्षेशी 25.19 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे मंगळावरही पृथ्वीप्रमाणे उन्हाळा आणि हिवाळा असे ऋतू अनुभवयास येतात. मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर (साधारणतः 22,79,36,640 किमी) पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दीडपट आहे. या ग्रहास स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास 36 मिनिटे लागतात; तर सूर्याभोवती फिरण्यास 687 दिवस लागतात. मंगळाला फोबॉस आणि डायमॉस असे दोन चंद्र आहेत.
नासाच्या पर्सिवियरेन्स रोवरने मंगळ ग्रहावर चालायला म्हणजेच शोध करण्याचे काम सुरू केले आहे. रोवर अजून फार लांब गेलेला नाही. याने आतापर्यंत 31 फुटाचा प्रवास केला आहे. पण नासाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ केटी स्टॅक मॉर्गन हे याला महत्त्वपूर्ण उपलब्धी मानतात.पर्सिवियरेंस रोव्हरला अजूनही खूपशा तांत्रिक शोधातून जावं लागणार आहे.
आतापर्यंत नासाने जितके रोव्हर पाठवले, त्यांच्या तुलनेत पर्सिवियरेंस रोव्हरला सगळ्यात मजबूत चाके लावण्यात आली आहेत.नासाने मंगळ ग्रहावर उतरवलेले हे दुसरे वाहन एक टन वजनाचे आहे. इतकेच नव्हे तर पर्सिवियरेंस मंगळावर उतरवले गेलेले आतापर्यंतचे सर्वात वेगवान रोव्हर आहे. त्यामुळे आशा आहे की, मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील असंख्य छायाचित्रे घेईल आणि त्यामुळे शास्त्रज्ञ आजूबाजूच्या परिसराची आणि पर्यावरण संबंधीची माहिती चांगल्या प्रकारे समजून घेतील.या रोव्हरने काही अंतर कापले आहे, त्यानंतर त्याने 150 डिग्री वळण घेतले आहे आणि पुन्हा आपल्या जागेवर परत आला आहे.
पर्सिवियरेंस रोव्हर मंगळावर 19 फेब्रुवारीला उतरला होता. मंगळ ग्रहापर्यंत पोहचण्यासाठी सात महिने अगोदर उड्डाण केलेले हे यान जवळपास अर्धे अब्ज किलोमीटर अंतर पार केले आहे. हे रोव्हर एका पुराण्या सुकलेल्या सरोवराच्या जमिनीची चिकित्सा करण्याबरोबरच अब्जो वर्षांपूर्वी मंगळावर असलेल्या सूक्ष्मजीवांच्या खुणांच्या शक्यतेचाही अभ्यास करणार आहे. आणि ते पृथ्वीवर पाठवणार आहे. रोव्हर दोन वर्षांच्या कालावधीत मंगळ ग्रहावर राहून जवळपास पंधरा किलोमीटर अंतर पार करणार आहे. पर्सिवियरेंस रोव्हरसोबत एक लहानसा हेलिकॉप्टरही पाठवण्यात आला आहे. रोव्हर हे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अन्य ग्रहावर अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
यापूर्वी मंगळावर क्यूरियोसिटी रोव्हरने विशाल भूमिगत सरोवराचा शोध लावला होता. यामुळे तिथे अधिक पाणी आणि जीवन असण्याची शक्यता दिसत असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. 'अमेरिकी जर्नल सायन्स' मध्ये प्रकाशित एका शोधात शोधकर्त्यांनी दावा केला आहे की, मार्सियन हिमखंडाखाली असलेले सरोवर वीस किलोमीटर रुंद आहे. हे मंगळ ग्रहावर आढळलेले सर्वात मोठे सरोवर आहे. पूर्वीच्या संशोधनात मंगळाच्या पृष्ठभागावर द्रव पाण्याची संभाव्य चिन्हे मिळाली होती.
क्यूरियोसिटी रोव्हरने ज्या सरोवरांचा ठावठिकाणा लावला होता,त्यावरून भूतकाळात मंगळावर पाणी उपलब्ध होते.परंतु क्षीण वातावरणामुळे मंगळाचे वातावरण पूर्वीपेक्षा थंड झाले आहे.यामुळे इथले उपलब्ध पाणी बर्फात रूपांतरित झाले आहे. हा नवीन शोध मार्सिसच्या मदतीने शक्य झाला आहे. मार्सिस मार्स एक्सप्रेस आर्बिटरवर उपलब्ध असलेले एक रडार आहे. अभ्यासाचे नेतृत्व करणारे इटालियन नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सचे प्रोफेसर रोबर्टो ओरोसई यांनी म्हटले आहे की, हे कदाचित मोठे सरोवर असू शकेल.तथापि, मार्सिसला द्रव पाण्याची खोली किती आहे हे समजू शकले नाही. परंतु शोध गटाचा अंदाज आहे की हे कमीतकमी एक मीटर असू शकेल.प्रोफेसर ओरोसई यांच्या म्हणण्यानुसार जे काही मिळाले आहे ते पाणीच आहे.
नासाने घोषणा केली होती की, मंगळावर 2012 मध्ये उतरवण्यात आलेल्या क्यूरियोसिटीला खडकांवर तीन अब्ज पूर्वीचे कार्बनीक अणू आढळून आले होते. यावरून कधीकाळी या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नासाच्या सौर प्रणाली अन्वेषण विभागाचे संचालक पॉल महाफी म्हणतात की, हा एक थरारक शोध आहे. तरीही यामुळे या गोष्टीला पुष्टी मिळत नाही की अणूंचा जन्म कसा झाला. मारिलॅन्ड स्थित नासाचे गोर्डाड स्पेस सेंटरच्या जेनिफर एगनब्रोड यांचं म्हणणं असं की, मंगळ ग्रहावर आढळून आलेले कार्बनीक अणू जीवनाची विशिष्ट प्रमाणप्रदान नाही करत.कारण ते गैरजैविक गोष्टींने बनलेले असू शकेल. पण कुठल्याही प्रकारणी अणू मंगळ ग्रहावर जीवनाच्या निरंतर शोधात शास्त्रज्ञाना महत्त्वपूर्ण मदत करू शकेल. कारण आपण ज्या जीवनाबाबत जाणतो,ते कार्बनीक अणूंवर आधारित आहे.
पूर्वी कधी मंगळाचे वातावरण पाणी किंवा द्रव पदार्थ ग्रहाच्या जमीनीवर उपलब्धता राखण्यास सक्षम होते, हे शक्य असेल पण मंगळावर पाण्याचे सरोवर मिळाल्याने तिथे जीवनानुकूल परिस्थिती राहिली असेल, अशी शक्यता वाढली आहे. यामुळेच भविष्यात या ग्रहावर राहण्यायोग्य बनवण्याच्या कल्पना केल्या जात आहेत. म्हणून नासा मंगळावर अणूऊर्जा निर्माण करण्याची योजना तयार करत आहे. किलो पॉवर योजनेप्रमाणे त्याने असे रिएक्टर विकसित केले आहेत, जे तिथे वीज निर्माण करून माणसांना राहण्यायोग्य करण्यास मदत करेल. मात्र मंगळावर वातावरण नाही.
पृथ्वीच्या तुलनेत तिथे केवळ एक तृतीयांश सूर्याचा प्रकाश पडतो. त्यामुळे तिथे सौर ऊर्जेपासून वीज तयार करणे शक्य नाही. मंगळावर तापमान खूपच कमी (-81 डिग्री सेंटीग्रेड) आहे. तिथे राहण्यासाठी हवा,पाणी, इंधनाची आवश्यकता आहे. या गरजा विजेच्या माध्यमातूनच पूर्ण केल्या जाऊ शकतात. यासाठी अणुऊर्जा हा एकमेव पर्याय आहे. शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार मंगळावर आठ लोकांच्या वस्तीसाठी चाळीस किलोवॅटच्या चार रिएक्टरची आवश्यकता असेल. जर हे रिएक्टरपरीक्षणात यशस्वी झाल्यास मंगळावर वस्ती बनवण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने हे मोठे पाऊल असेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment