माणसाला स्वतःच्या आरोग्याची काळजी असतेच ,पण तितकीच बेफिकिरीही असते. माणूस वजन वाढलं म्हणून चालण्याचा व्यायाम किंवा योगा-बिघा करायला लागतो,परंतु त्यात सातत्य नसतं. चार दिवसांनंतर त्याचं रुटीन सुरू होतं. शुगर झाली म्हणून पथ्य पाळायला लागतो, पण तेही काही दिवसच. डॉक्टरने गोळी सुरू केली आहे म्हटल्यावर मांसाहार आणि मद्यपान करायला काय हरकत आहे, असाच काहींचा सूर असतो. काहींना शुगरची गोळी ही काय भानगड आहे,हेच माहीत नसतं. गोळी सुरू झाली म्हणजे काहीही खायला मोकळे असा मतप्रवाह दिसून येतो. पण शुगर नियंत्रणात आणण्यासाठी खाण्या-पिण्यावर मर्यादा या आणाव्या लागतातच. आजकाल जीवन धकाधकीचं बनलं आहे. पोटापाण्यासाठी माणसानं निसर्गाविरुद्ध बंड पुकारलं आहे. रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानलं असल्याने जीवनशैली बदलली आहे. यामुळे शरीराच्या कसरतीकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यातच खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी लावून घेतल्या आहेत. मग शरीर हे कुरकुर करणार तर काय करणार? कोणतीही गोष्ट मर्यादेत ठीक आहे, मर्यादेबाहेर गेली की त्याची 'बातमी' होते. त्यामुळे लसीकरणानंतर मांसाहार, मद्यपान करायचं की नाही, याची चर्चा रंगली आणि त्याची बातमी झाली.
खरे तर गतवर्षापेक्षा यावर्षी कोरोना महामारीने आपला विळखा आणखी घट्ट केला आहे. गेल्या महिन्याभरातच कोरोना रुग्णांच्या संख्येने लाखाची संख्या गाठली आहे. रोगाचे अक्राळविक्राळ रूप लोकांना अस्वस्थ करत आहे. एकीकडे पोटापाण्याच्या प्रश्न आणि दुसरीकडे कोरोनाचे सावट या विलक्षण जीवघेण्या कात्रीत नागरिक सापडला आहे. त्यामुळे माणसे ताळेबंदीला झुगारत आहेत. सरकारला लोकांच्या जीवांची चिंता तर लोकांना पोटापाण्याची चिंता लागली आहे. अशा परिस्थितीत काही लोकांना मात्र वेगळीच चिंता सतावू लागली आहे. लसीकरणानंतर काय खावं आणि काय खावू नये, याची चर्चा गप्पा आणि सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्यातच अफवांना उदंड पीकही आलं आहे. साहजिकच लसीकरणासाठी लोक अजूनही म्हणावे असे पुढे येताना दिसत नाहीत. सरकारी यंत्रणेला लसीकरणाची बाजू मांडण्यासाठी आता घरोघरी फिरावं लागत आहे.
सगळ्याच माध्यमात लसीकरण केल्यानंतर मद्यपान आणि मांसाहार करण्या, न करण्याबाबत उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. मुळात लसीकरणापूर्वी किंवा लसीकरणानंतर कोणती पथ्ये पाळावीत अशा काही गाईडलाईन्स सरकार किंवा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या नाहीत. त्यामुळे लस घेतल्यानंतर मांसाहार व मद्यपान करू नये या म्हणण्याला कोणताच आधार नाही. एवढेच की, काहींना काही वेगळ्या आजारांची औषधे-गोळ्यांचे डोस सुरू असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रत्येक माणसाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच नियम लागू होत नाही. त्यामुळे काहींना लस घेतल्यानंतर ताप येणं, अशक्तपणा येऊ शकतो. पण त्याच्याने घाबरून जाण्यासारखं काही नाही. खरे तर प्रत्येक व्यक्तीने निदान वयाच्या चाळिशीनंतर आपल्या शरीराची संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी. त्यामुळे आरोग्याबाबतचा उलघडा होऊन जाईल. त्यानंतर त्याला स्वतःला आपली जीवनशैली निश्चित करता येईल. काहींना साध्या सुईची भीती वाटते, अशा लोकांच्या मनात अनेक शंका-कुशकांनी घर केलेले असते.
मद्यपान करणाऱ्या लोकांचा टक्का तसा कमीच असतो,पण आपल्याकडे याचीच चर्चा अधिक होते. चांगल्या गोष्टींची चर्चा काहीच होत नाही-कारण चांगलं कुणाला नको असतं. लोकांचं लक्ष वाईट गोष्टींकडे लगेच जातं. समाजात सकारात्मकपेक्षा नकारात्मकता जास्त असते. आणि तेच लोक लगेच उचलतात. साहजिकच गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशाच गोष्टी चर्चिल्या जातात. आपल्याकडे टिव्हीच्याबाबतीत टीआरपीला अधिक महत्त्व दिलं जातं. सोशल मीडियावरही अगदी चांगल्या माणसाची एक साधी चूकही 'हायलाईट' केली जाते आणि त्याला लागलीच व्हिलन करून टाकले जाते. याला आवर घालता आला तर निरर्थक गोष्टींच्या चर्चांना लगाम बसेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment