Sunday, April 25, 2021

अवकाशाची झाली कचराकुंडी


माणूस जिथं जिथं गेला आहे तिथं तिथं त्यानं त्याच्यासोबत कचरा नेला आहे. आणि नुसतंच नेला नाही,तर त्या जागेची कचराकुंडी केली आहे. अर्थात मनुष्यधर्मानुसार त्याने घराचा केरकचरा तर केला आहेच, पण दुसऱ्याच्या घराचं अंगणदेखील धड स्वच्छ ठेवलेलं नाही. घरादारात कचरा ठेवून मजेत जगणारा हा जगातला एकमेव प्राणी असावा. त्याने नदीनाले, समुद्रच काय पर्वत-डोंगरसुद्धा सोडले नाहीत. जिथे जाईल तिथे केरकचराच आहे.  त्यानं आता अवकाशही सोडलं नाही. अवकाशात इतका प्रचंड मोठा कचरा झाला की, त्याचा धोका आता मानवावरच उलटणार आहे. हीदेखील एक मोठी समस्या बनली आहे.

मानवाने त्याच्या विकासचक्रात कचऱ्याचेदेखील रूप पालटवले आहे. शहरात, महानगरात विद्रुप केरकचरा आणि त्याचा निपटारा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.त्यात प्लॅस्टिकच्या कचऱ्यानंही मोठी समस्या उभी केली आहे, की जी कधी नष्ट होण्याचे नावच घेत नाही. त्याने नदीनाले तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. समुद्रदेखील त्याच्यापासून सुटलेला नाही. त्यामुळे समुद्रातले जीवजंतू, समुद्री सस्तन प्राणी यांचा जीव धोक्यात आला आहे. समुद्राच्या काठाला असे जीव मरून पडलेले आपल्याला वारंवार दिसून येत आहेत.

गिर्यारोहक आपल्यासोबत प्लॅस्टिक व अन्य कचरा घेऊन जात आहेत. मात्र येताना ते तिथेच टाकून माघारी परतून येत आहेत. त्यामुळे या भागातदेखील केरकचरा गंभीर रूप घेत आहे. सर्वात उंच असलेले  एव्हरेस्ट शिखरदेखील यातून सुटले नाही. (मानवाने तिथे आता कोरोनाही नेला आहे.) एव्हरेस्ट शिखराचे नामकरण 'कचराकुंडी' असे झाले आहे. अर्थात याचे धोके लक्षात येऊ लागल्याने यावर उपाययोजना केल्या जात आहेत. नेपाळ सरकारने यावर एक चांगला पर्याय काढला आहे. गिर्यारोहकांच्या वस्तूंची यादी केली जाते आणि ते पुन्हा परत आले की, त्या वस्तू तपासल्या जातात. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, ऍल्युमिनियमचे कॅन, सिगरेटची पाकिटे, डबे यादीनुसार आहेत का हे पाहिले जाते. या सर्व वस्तू परत आल्या नसतील तर त्या गिर्यारोहकांना दंड भरावा लागतो, पण त्यामुळेदेखील परिस्थिती सुधारताना दिसत नाही. पृथ्वीवरची ही केरकचऱ्याची समस्या जटील बनत चालली असताना आता वैज्ञानिकांना अवकाशातील वाढत्या कचऱ्याची चिंता सतावू लागली आहे. हा ‘स्पेस जंक’ धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

अवकाशातल्या केरकचऱ्याला 'स्पेस जंक' म्हटलं जातं. हा दोन प्रकारचा असतो. एक आहे तो वेगवेगळय़ा प्रकारच्या उल्कांमुळे बनला आहे, ज्याला नैसर्गिक कचरा म्हणतात. दुसरा आहे तो मानवनिर्मित. म्हणजे लहानमोठी वेगवेगळय़ा प्रकारची रॉकेटस्, वेळोवेळी अवकाशात सोडण्यात आलेले उपग्रह. ज्यांचे आयुष्य संपले आहे असे उपग्रह अवकाशातच पृथ्वीभोवती चकरा मारत आहेत. उपग्रहापासून वेगळे झालेले, तुटलेले भागदेखील असेच अंतराळी फिरत आहेत. मागे चीनने अवकाशात दोन उपग्रहांची धडक लावण्याचा प्रयोग केला होता. त्यातून ते ग्रह जळून राख झाले, पण ती राख तशीच वातावरणाच्या कक्षेत फिरत आहे. काही धातूंचे तुकडे विखुरले गेले आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या कचऱ्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. उल्कांपासूनचा कचरा हा सूर्याभोवती फिरत आहे, तर मानवनिर्मित कचरा हा पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे. यातले काही पृथ्वीच्या कक्षेत येऊन भरकटतात. हे तुकडे त्यांच्या मार्गात येणाऱ्या उपग्रहांना किंवा अवकाशयात्रींना धडकल्यास काय अनर्थ ओढवू शकेल याचा अंदाज नाही. या कचऱ्याचा जो वेग आहे तो ताशी 17 हजार मैल असा आहे. म्हणजे बंदुकीतून निघणाऱ्या गोळीपेक्षा सुमारे 22 पट अधिक वेग त्याचा आहे. नैसर्गिक उल्कापातातून निघणारा कचरा हा पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर घर्षणाने जळून खाक होतो. मात्र मानवनिर्मित उपग्रह अनेक धातूंच्या मिश्रणातून बनलेला असतो. तो घर्षण प्रक्रियेला दीर्घकाळ तोंड देऊ शकतो. अमेरिकेची अवकाश एजन्सी ‘नासा’च्या एका अंदाजानुसार अशा कचऱ्याचे नऊ लाखांहून अधिक तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून अनेक देशांमध्ये अंतराळात उपग्रह  सोडण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे  अंतराळात ढिगानं कचरा वाढत चालला आहे. पृथ्वीला यापासून धोका आहे, हे लक्षात आल्याने आता हा अवकाशातून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी अमेरिकेच्या  'नासा'सह अनेक देशांच्या अंतराळ संस्था  प्रयत्न करत आहेत. काही खासगी कंपन्याही  यामध्ये उतरल्या असून साहजिकच भविष्यात एक मोठा  व्यवसाय त्यातून उभा राहू शकतो, असं दिसतंय. सध्याला  जपानच्या चार कंपन्यांनी अंतराळातील  कचरा हटवण्याचे काम हाती घेतले आहे.  त्यापैकी अॅस्ट्रोस्केल या कंपनीने 22 मार्च  रोजी कझाकिस्तान येथून सोयूज रॉकेटच्या  मदतीने 'एल्सा डी' उपग्रह अंतराळात  सोडला आहे. त्यामध्ये चुंबकीय डॉकिंग मॅकेनिझम वापरण्यात आलेले आहेत.  उपग्रहाचे तुटलेले भाग आणि ढिगाऱ्यातील  मोठे तुकडे हटवण्याचे काम हा उपग्रह  करणार आहे. जास्का या कंपनीने तर इलेक्ट्रोडायनॅमिक सुरुंगाच्या सहाय्याने कचरा साफ करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. इलेक्ट्रोडायनॅमिक सुरुंग 700 मीटर लांब असून स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेले आहे. अंतराळातील कचऱ्याचा वेग कमी करून त्याला हळूहळू पृथ्वीच्या वातावरणात ढकलण्याचे काम हा सुरुंग करेल. जर्मनीची अंतराळ संस्था 'डीएलआर'ने लेझर तंत्र विकसित केले आहे. त्याद्वारे कचरा अंतराळातच नष्ट केला जाईल. युरोपियन अंतराळ संस्थेने गार्बेज रोबोट तयार केलेय.  उपग्रहांच्या तुकड्यांना पकडून पृथ्वीवर  आणण्याचे काम हा रोबोट करेल. नासा सध्या इलेक्ट्रो नेट तंत्रज्ञानावर काम करत आहे. यामध्ये जाळीत कचरा अडकवून पृथ्वीच्या वातावरणात आणला जाईल. पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्यापैकी बहुतांश कचरा स्वतःहून जळेल. अमेरिकेतील सहा स्टार्टअप कंपन्या या कामात सहभागी झाल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.  अवकाशातील हा कचरा लवकरात लवकर हटवण्याची आवश्यकता आहे, तरच आपली पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


1 comment:

  1. पृथ्वीभोवती फिरत असलेल्या अवकाशीय कचऱ्याचा
    अंतराळयानांपासून ते कृत्रिम उपग्रहांपर्यंत अनेक गोष्टींना धोका संभवत असतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध सामग्री घेऊन गेलेल्या यानालाही धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी
    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक भुजेला असा कचरा धडकला आहे.
    कॅनेडियन अंतराळ संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंतराळ स्थानकाच्या भुजेला लहान आकाराचा अवकाशीय कचरा धडकला. त्यामुळे या भुजेचे नुकसान झाले असून ते बाहेरूनही स्पष्ट दिसत आहे. स्पेस एजन्सीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की हा कचरा धडकल्याने रोबोटिक भुजेच्या एका
    छोट्याशा भागाचे तसेच थर्मल ब्लँकेटचे नुकसान झाले आहे. १२ मे रोजी सामान्य तपासणीवेळी ही घटना प्रथम उघडकीस आली. अर्थात या धडकेनंतरही ही रोबोटिक भुजा नेहमीसारखेच काम करीत आहे. अंतराळात सध्या अवकाशीय कचऱ्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. 'नासा' सध्या अशा २७ हजार अवकाशीय तुकड्यांवर लक्ष ठेवून आहे. अवकाशीय कचऱ्यांमध्ये मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे दोन भाग असतात. विविध अंतराळयाने, निकामी उपग्रहे
    यांचे अवशेष मानवनिर्मिती कचऱ्यांमध्ये मोडतात. छोटे अवकाशीय दगड किंवा लघुग्रह, उल्केचे तुकडे हे
    नैसर्गिक अवकाशीय कचऱ्यांमध्ये समाविष्ट आहे.

    ReplyDelete