Friday, April 23, 2021

मंगळावर मानवीवस्ती दृष्टिक्षेपात


पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगळ ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. अमेरिकेच्या नासा या संस्थेने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हर या यानाने ही कामगिरी केली आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ५.३७ ग्रॅम ऑक्सिजन संकलित केला. रोव्हरमधील टोस्टरच्या आकाराच्या यंत्राने ही कामगिरी केली असून या यंत्राचे पूर्ण नाव मार्स ऑक्सिजन इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सी) असे आहे. त्यामुळे मंगळावर वसाहत करून राहण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात असल्याचं मानलं जात आहे.

नासाने मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टर उडवले आणि त्याच्या पोटातून बाहेर आलेल्या मॉक्सीने मंगळाच्या वातावरणातून ऑक्सिजनचे संकलन केले. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी मानवी वस्ती करणे शक्य आहे. या ऑक्सिजनचा वापर तिकडून पृथ्वीवर परत येणाऱ्या यानात इंधनाच्या रूपाने केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मंगळाच्या वातावरणातून किमान श्वास घेता येऊ शकेल एवढा ऑक्सिजन संकलित करता येऊ शकेल. मानववस्तीसाठी अजून फार मोठा पल्ला गाठायचा असला तरी मात्र यामुळे फार मोठी आशा निर्माण झाली आहे.

मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर अनेक देशांनी काम सुरू केले आहे. यात अमेरिकेची नासा आघाडीवर आहे. पाठोपाठ चीन,रशिया यांचेही जोरदार काम चालू आहे. काही वर्षांपूर्वी स्टिफन हॉकिंग्ज यांनी ‘या पृथ्वीवर मानवजातीला आता वास्तव्यासाठी फार काळ राहिलेला नाही.जेमतेम शंभर वर्षं.त्यानंतर काय. याची तजवीज आताच करावी लागेल,’ असं एक विधान केलं होतं. ते बरंच गाजलंही. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या. त्यातला वायूप्रदूषणाचा, जागतिक तापमानवाढीचा आणि त्यामुळं होणाऱ्या संभाव्य पर्यावरण ऱ्हासाबाबत गांभीर्याने बोलले जात आहे. काही वर्षांत होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याला माणूस कारणीभूत असणार आहेच. बदलत्या हवामानातून तसं सूचित होत आहेच, त्यामुळे अन्य ग्रहावर वसाहत करून राहण्याची मानवाला घाई झाली आहे. सध्या मंगळावर ऑक्सिजन असल्याचा पुरावा मिळाला आहे. आता पुढच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मंगळावरील अवशेषांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.   

नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरोक्टेरेटचे प्रशासक जिम रियूटर यांच्या मते मंगळ ग्रहावरील वायूमंडळ अतिशय हलके आणि पातळ आहे. कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ऑक्सिजन संकलित करणे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु मॉक्सीने ही कामगिरी केली.अंतराळवीरांना हा ऑक्सिजन दिला तर ते किमान १० मिनिटे तग धरू शकतात, एवढा प्रभावी हा ऑक्सिजन आहे. अंतराळवीरांना जर एक वर्ष मंगळ ग्रहावर रहायचे असेल तर त्यांना १००० किलोग्रॅम एवढा ऑक्सिजन लागेल. मात्र नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने चांगली कामगिरी केली असून मानववस्तीसाठी आशा निर्माण झाली आहे. तरीही इतक्या लवकर मानव वस्ती अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक व ख्यातनाम खगोलभौतिकशास्त्रज्ञ फ्रँक एच. शू यांनी म्हटलंय की,  मंगळ ग्रह इतक्या लगेच मानवी वसाहतीचा नवा पर्याय म्हणून पृथ्वीच्या टप्प्यात आलाय; असे म्हणता यायचे नाही. मानवनिर्मित तंत्रज्ञानाच्या बळावर आपण मंगळावर एकवेळ सहीसलामत पोचू शकू हे खरे, मात्र मंगळावर वस्ती करणे, तेथील प्रतिकूल वातावरणात सर्वसामान्य पद्धतीने राहू शकणे; हे अजूनही दुरापास्त आहे.

केवळ पाच पंचवीस सायन्स फिक्शन चित्रपटांत दाखवले आहे म्हणून आणि काही धनदांडग्या उद्योजकांना त्यात नवा बिझनेस ऑप्शन दिसतोय म्हणून मंगळावर लगेच वस्ती होईल, असे नाही. हे खरे आहे की, आण्विक उर्जेच्या माध्यमातून पुरेशी उष्णता आणि विद्युत ऊर्जा उपलब्ध होऊ शकल्यास मंगळ हा पृथ्वीसारखाच मानवी वस्तीसाठी राहण्यायोग्य ग्रह ठरू शकतो. मात्र, हे तंत्रज्ञान अजून विकसित होणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात असणारा कार्बन डाय ऑक्साईड आणि अतिशय कमी तापमान आणि दाब या गोष्टी मंगळावरील मानवी वसाहतीसाठी आव्हान ठरतील. त्यांवर नवनव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनातून मार्ग काढता येईल. दुसरे म्हणजे, मंगळावरील माती ही कार्बनच्या अतीव प्रमाणामुळे विषारी आणि पीक घेण्यास अयोग्य आहे. त्या मातीस कोळशाच्या मदतीने पीक घेण्यास योग्य बनविणे गरजेचे ठरेल.

अर्थात मंगळावर मानव वस्ती हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालू आहेत. मोठमोठ्या कंपन्याही याकडे लक्ष देऊन आहेत. स्वप्न टप्प्यात असल्यास या कंपन्या यात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे कदाचित उद्या मंगळावर मानवी वस्ती शक्य होऊ शकेल, मात्र यासाठी बऱ्याच वर्षांचा कालावधी जावा लागणार आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

4 comments:

  1. अंतराळ तंत्रज्ञान मोहीम संचालनालयाचे संचालक ट्रडी कोटर्स म्हणाले, २०३३ पर्यंत मंगळावर मानव पोहोचवणे असा नासाचा उद्देश आहे. यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंगळावर प्राणवायू तयार करणे हेदेखील त्या आव्हानांपैकीच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोबत घेऊन जाणे व्यवहार्य ठरत नाही. म्हणूनच मंगळावर प्राणवायू तयार करणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  2. 'नासा'च्या रोव्हरने मंगळावर शोधला रहस्यमयी खडक

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील आपल्या मोहिमेस सुरुवात केली आहे. तर इंज्युनिटी हे हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्सच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे. पर्सिव्हरन्स ज्या ठिकाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणचा डाटा गोळा करण्यास इंज्युनिटी सक्षम आहे.
    सध्या तरी रोव्हर आणि हेलिकॉप्टर दोन्ही कार्यरत आहे. दरम्यान, पर्सिव्हरन्स रोव्हरने मास्टकॅम-जेड-इमेजिंग सिस्टीमच्या माध्यमातून हाय
    रिझ्युलेशन असलेली अनेक छायाचित्रे कॅमेराबद्ध केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सुमारे ४५ कि.मी. रुंद एक खडकाळ भागही दिसून येत आहे. मंगळावरील हे
    खडक अत्यंत रहस्यमयी दिसून येत आहेत. सर्वसामान्यपणे असे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर
    तयार होतात. भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. यामुळे ते मंगळावरील जेजेरो क्रेटरची निर्मिती आणि विकासाबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने समजून
    येऊ शकतील. जेजेरो क्रेटर भागासंदर्भात असेही म्हटले जाते की, अब्जावधी वर्षांपूर्वी येथे मोठे सरोवर तसेच एखाद्या नदीचे खोरे होते. आता याच खोऱ्यामध्ये धूळ जमा झाली असणार. जेजेरो क्रेटरमधील याच खडकांमध्ये जीवन वाचवून ठेवण्याची जास्त क्षमता आहे. 'नासा'च्या या पर्सिव्हरन्स रोवरचे दोन प्रमुख लक्ष्य आहेत. पहिले लक्ष्य म्हणजे मंगळावरील जीवनाचे संकेत शोधणे, तर संभाव्य अॅस्ट्रॉबायोलॉजिकल महत्त्व असणारे डझनभर नमुने गोळा करणे. यामध्ये अशा खडकांनाही सहभागी करवून घेतले जाते. दरम्यान, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. यासाठी २०३१ नंतर मंगळ मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

    ReplyDelete
  3. अब्जाधीश उद्योगपती आणि 'स्पेस एक्स' कंपनीचे मालक एलन मस्क यांनी म्हटले आहे की कंपनीचे
    मानवरहीत यान २०२४ मध्ये मंगळावर जाणार आहे. इंटरनॅशनल मार्स सोसायटी कन्व्हेन्शनमधील चर्चासत्रावेळी त्यांनी ही घोषणा केली. सध्या अनेक देशांनी मंगळावर आपले यान पाठवले आहे. आता
    ही खासगी कंपनीही आपले यान मंगळावर पाठवणार आहे. यावर्षी जुलैमध्येच चीन आनि संयुक्त अरब
    अमिरातीनेही आपले यान मंगळावर पाठवले आहे.
    भारतानेही मंगळावर आपले 'मंगळयान' पाठवून बाजी
    मारली होती. मस्क यांनी सांगितले की येत्या तीन वर्षांच्या काळात मंगळावर काही तरी पाठवण्यासाठी कंपनी प्रयत्न करील. कंपनीच्याच 'स्टारशिप' या रॉकेटच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात येईल. हे पुन्हा वापर करता येण्यासारखे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट कॉम्बो आहे. मंगळावर आपले तळ उभे
    करण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने हे रॉकेट २०२२ च्या
    सुरुवातीला चंद्रावर पाठवण्याचीही योजना आखली आहे. तसेच पृथ्वीभोवती 'पॉईंट टू पॉईंट ट्रीप' घडवून
    आणण्यासाठीही या रॉकेटचा वापर केला जाईल.

    ReplyDelete
  4. नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने मंगळावर टोस्टरच्या आकाराच्या पाठविलेल्या ‘मॉक्सी 18' या उपकरणाने ऑक्सिजनची निर्मिती केली आहे. त्याचे प्रमाण एक छोटे झाड अठरा महिन्यांत जितक्या ऑक्सिजनची निर्मिती करते तेवढे आहे.टोस्टरच्या आकाराच्या या उपकरणाचे पूर्ण नाव ‘मार्स ऑक्सिजन इन-सितू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट’ (मॉक्सी) असे आहे.स्टडी सायन्स ॲडव्हान्स जर्नलमध्ये या संशोधनावर आधारित एक लेख प्रसिद्ध झाला आहे. मंगळावरील वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण 96 टक्के आहे. या वायूला ‘मॉक्सी 18’ एका फ्युएल सेलमधून व 798.9 अंश सेल्सियस तापमानातून प्रवाहित करते. त्यानंतर विद्युत प्रवाहाच्या मदतीने कार्बन मोनॉक्साईड व ऑक्सिजनच्या अणुंना वेगळे करण्यात येते.‘नासा’ने ‘मॉक्सी 18 ’ला गेल्यावर्षी पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत मंगळावर पाठविले होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून ‘मॉक्सी 18’ मंगळावर कार्बनडायऑक्साईडचे खूप प्रमाण असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर उपकरणाद्वारे मंगळावर आतापर्यंत सात प्रयोग करण्यात आले आहेत.कोणत्याही वातावरणात ‘मॉक्सी 18’ राहते सक्रिय संशोधकांनी सांगितले की, ‘मॉक्सी 18’ कोणत्याही प्रकारच्या वातावरणात अहोरात्र ऑक्सिजनची निर्मिती करू शकते. त्यात प्रत्येकवेळी ‘मॉक्सी 18’ने ताशी सरासरी सहा ग्रॅम ऑक्सिजनची निर्मिती केली. एका प्रयोगात ‘मॉक्सी 18’ने ताशी 10.4 ग्रॅम ऑक्सिजन तयार केला होता. ‘मॉक्सी 18 ’चे आणखी मोठ्या आकाराचे उपकरण बनविण्याचा विचार ‘नासा’ने सुरू केला आहे.

    ReplyDelete