Sunday, April 25, 2021

सायकलींना आले चांगले दिवस


माझ्या घरासमोरच सायकल विक्रीचं होलसेल गोडावून आहे. तिथून तालुक्यातल्या सायकल दुकानदारांना सायकली, त्याचे पार्टस पाठवले जातात. तिथे सतत ने-आणची वर्दळ असते. गेल्या वर्षभरात सायकलींना प्रचंड मागणी वाढल्याने सायकलीचा होलसेल करणाऱ्या मालकाने जागा कमी पडू लागली म्हणून शेजारील खोल्याही घेतल्या. तिथे 24 तास चार बिहारी कामगार सायकली जोडण्याचे काम करीत आहेत. अर्थात आमच्या तालुक्यात सायकल विक्रीचे हे एकच जुने सायकल दुकान आहे. 'बाबाजी' नावाच्या इसमाने हा व्यवसाय टिचून केला आणि वाढवला. आज त्यांची मुले हा व्यवसाय सांभाळतात. त्यांनी शहरातच त्याच्या दोन-तीन शाखा काढून व्यवसाय वृद्धिंगत केला आहे. ग्रामीण भागात आजही सायकलींशिवाय पर्याय नाही. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञान यात आले असल्याने सायकली स्मार्ट झाल्या आहेत. वेगवेगळ्या रंगात आणि ढंगात सायकली अवतरल्या असल्याने त्यांचे आकर्षणही खास करून युवा वर्गात वाढले असल्याने अलीकडच्या काळात सायकलींचा खप वाढला आहे. खास करून या कोरोना काळात तर सायकली विक्रीचा व्यवसाय सर्वोच्च बिंदूवर पोहचला आहे. यात लहान मुलांच्या सायकलींचा खप अधिक प्रमाणात वाढला आहे. शाळांना सुट्ट्या त्यात बाहेर फिरण्यास प्रतिबंध (ताळेबंदी) असल्याने जवळचा खात्रीचा प्रवास म्हणून सायकलींकडे पाहिले जाऊ लागले आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात कोट्यवधींने सायकलींची विक्री झाली. अजूनही यात खंड पडला नाही, हे विशेष!

आम्ही लहान असताना सायकली भाड्याने घ्यायचो आणि आमचे ईप्सित काम उरकायचो. त्या काळात जतसारख्या ठिकाणी जागोजागी सायकली भाड्याने देण्याच्या व पंक्चर काढणाऱ्या दुकानांची चलती होती. बारक्या सायकली आम्ही भाड्याने घेऊनच ती शिकलो. जसजसे मोठे होत होतो, तसे सुट्टीच्या काळात सायकली भाड्याने घ्यायचो आणि गावाचा (आजचे शहर) फेरफटका मारायचो. साधारण पाच रुपयाला तासभर सायकल भाड्याने मिळायची. तालुक्यातील लोकांना त्याकाळी एसटी शिवाय पर्याय नसायचा. खेरीज स्टॅण्डपासून कचेरी (म्हणजे तहसील कार्यालय,पोलीस ठाणे,पंचायत समिती ही कार्यालये एकत्र होती.) अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर होती. आणखी कामे करून घ्यायची असतील तर त्यांना भाड्याने सायकल घेणे परवडायचे. सर्व कामे करून गावकरी सायकली जमा करून सायंकाळी गावाकडे परतत. साधारण 2000 सालापर्यंत भाड्याच्या सायकलींचे प्रस्थ होते. नंतर वैयक्तिक सायकली आणि दुचाकी मोटार वाहनांची संख्या वाढू लागली, तशी ही भाड्याची पद्धत बंद झाली.

मोटार सायकली वाढल्या तसे पेट्रोलचे दामही वाढले, पण मोटारसायकली वाढतच राहिल्या. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचे उदारीकरणाचे धोरण पथ्यावर पडले आणि मध्यमवर्गीय लोकांची संख्या वाढली. सायकलीवर आपल्या कार्य-गावी जाणारे अण्णासाहेब, रावसाहेब (म्हणजे तलाठी-ग्रामसेवक) आणि शिक्षक यांच्याकडे मोटार सायकली आल्या. त्यावेळी सर्वांना परवडणारी बजाजची (M80) लहानशी मोटारसायकल चांगलीच प्रसिद्ध पावली होती. मला आठवत त्यावेळचे सरकारी कर्मचारी 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास सहज सायकलने करायचे. (मीही कधी कधी त्यावेळी 12 किलोमीटर अंतरावर असलेले उंटवाडी गाव सायकलने गाठायचो.)

आज कोणत्या ना कोणत्या कारणाने लोक सायकलीकडे वळले आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. आजच्या मॉडर्न सायकलीही यासाठी कारणीभूत आहेत. आता सायकली मोटारसायकल म्हणूनही वापरता येऊ लागल्याने घरापासूनच्या आसपास या सायकली उपयोगाच्या ठरणार आहेत. पेट्रोलचे वाढते दर  पाहता लोकांनी आपल्या परिसरात फिरण्यासाठी किंवा छोटी मोठी कामे करण्यासाठी सायकलींचा वापर करायला हवा. पुन्हा सायकली भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू व्हायला हवा आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रोत्साहन द्यायला हवे. चीनमध्ये मोठ्या शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायकलचा प्रचार आणि प्रसार वाढवला आहे. 'जीपीएस' च्या आधारावर आणि ई-पेमेंटमुळे सायकली भाड्याने देताना घेताना तिथे अन्य कुठल्या माणसांची गरज लागत नाही. जागोजागी सायकली स्टँडवर ठेवलेल्या असतात. तिथून सायकल घ्यायची, काम करायचे आणि तुमच्या सोयीने तुमच्या जवळच्या स्टँडवर सायकल ठेवायची. यासाठी जिथून सायकल घेतली होती, तिथे जायची गरज नाही. ई-पेमेंटने भाड्याचे पैसे चुकते होतात. आपल्याकडेही अशाप्रकारे सायकलींचा वापर वाढायला हवा. पुण्यात मध्यंतरी अशाचप्रकारे सायकलींचा वापर वाढला होता, पण महानगरपालिका आणि शाळा-कॉलेजांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. 

शेवटी सायकल आपल्या फायद्याचीच आहे. जगभरासह भारतातही हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम वाढत आहेत. लाखो लोक याला बळी पडत आहेत. सायकलींचा वापर शहरांमध्ये वाढला तर मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा घालता येईल. शिवाय सायकलीचा नियमित वापर करायला लागल्यास वेगळा व्यायाम करायची गरज पडत नाही. आरोग्य उत्तम राहते. सर्वच दुखण्यावरचे औषध म्हणजे सायकल आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. काटकसर केल्याचे समाधान मिळते हे वेगळेच.

आपल्या अनेक व्याधींवरचे 'रामबाण' औषधही आहे. व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केल्यास त्याचे लाभ लक्षणीय आहेत. जिममध्ये दोन-दोन तास घाम गाळून नंतर एसी गाडीतून घरी जाण्यापेक्षा रोज कार्यालयात सायकलवरून गेल्यास आरोग्य, इंधन बचत, प्रदूषणापासून मुक्तता असे अनेक हेतू एकाच वेळी साध्य होतील. छोट्या मोठ्या शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होते. प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, हृदयरोग अशा अनेक रोगांनी जे मानवी शरीरांवर आक्रमण केले आहे, त्यावर नियंत्रण येईलच, पण सायकल चालवल्याने हाता-पायांसह संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम होईल. शरीरांतर्गातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. त्यामुळे आजार, दुखणी पळ काढतील. व्यायामामुळे मनही ताजेतवाने राहील. क्रयशक्ती वाढेल. देशातल्या रस्त्यांवर सायकलींचा वावर कमी व्हायला अन्य वाहनधारकांचाही वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. रस्त्यावरच्या सायकलधारकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. दुचाकीस्वार, बसचालक अथवा अन्य चार चाकी चालक यांच्याद्वारे नेहमीच सायकलस्वारांना कमी लेखले जाते.त्यामुळे सायकल हवी असूनही लोक त्याला टाळताना दिसतात.  युरोप-जपानसारख्या देशांमध्ये सायकलस्वारांसाठी वेगळी 'लेन' (रस्ता) असते. अर्थातच तिथे सायकलीच्या वापरासाठी अनुकूलता असल्याने सायकलचा वापर वाढत आहे. नव्या मॉडेलमुळे कॉलेजवयीन युवकांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे, तर काही पर्यावरणवादी लोक सायकलचा हटकून वापर करतात. 10-20 किलोमीटरचे अंतर काहीजण सहज सायकलीवरून पार करतात, ही आशादायी बाब म्हटली पाहिजे.   सायकल वापरणे म्हणजे कमीपणाचे समजले जाते. मात्र एक लक्षात ठेवायला हवे की, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली माणसे दुसरा काय म्हणतो, याचा विचार करत नाहीत, म्हणूनच ती मोठी होतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment