2021 हे 'आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न व कृषी संघटनेचे (एफएओ) महासंचालक क्यू डोग्यू यांनी 15 डिसेंबर 2020 रोजी याची घोषणा केली होती. 'आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष' साजरे करण्याचे मुख्य कारण म्हणजे जग सध्या कोरोना महामारीला तोंड देत आहे. या महामारीवर अजून कुठलेही परिणामकारक औषध वैद्यकशास्त्राला मिळाले नाही. कोरोनासाठी सध्या तरी मानवाची प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे आहारात भाजीपाला आणि फळे यांचा अंतर्भाव वाढवण्याबरोबरच त्यांचे उत्पादन वाढले पाहिजे यावरही भर देण्यात आला आहे.
जागतिक अन्न व कृषी संघटनेने हे वर्ष साजरे करताना आणखीही काही ठळक उद्दिष्टे ठेवली आहेत.
जगाला नवोन्मेष आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व आरोग्यवर्धक फळे व भाजीपाल्याच्या उत्पादन वाढीबरोबरच त्याची होणारी नासाडी कमी करणे तसेच टाकाऊ मालसुद्धा सुयोग्य प्रक्रियेद्वारे उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करणे ,यावरही भर देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. फळे व भाजीपाल्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, आरोग्यवर्धक व संरक्षित अन्नाचा वापर वाढविणे ,लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या जीवनशैलीनुसार विविध फळे व भाजीपाल्याचा चौरस उपयोग वाढविणे, त्याचबरोबर यासंबंधी विशेष धोरणात्मक निर्णय घेणे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून जागतिक स्तरावर होणाऱ्या फळे व भाजीपाल्याची नासाडी कमी करणे जी सध्या गरीब देशांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आदी बाबी विचारात घेणे अपेक्षित आहे.
मानवाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये फळे व भाजीपाल्याचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. फळे व भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने विविध खजिने ,तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडेंट, फिनोलीक तसेच अनेक औषधी गुणधर्म असणारे रासायनिक घटक असतात. जे तृणधान्य, कडधान्य, तेलबिया अशा अन्न पदार्थांमध्ये अभावानेच आढळून येतात. त्यामुळे साहजिकच फळे व भाजीपाल्यास संरक्षक अन्न म्हणूनही संबोधले जाते.
उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन आहारामध्ये 280 ग्रॅम निरनिराळ्या भाज्या व 100 ते 120 ग्रॅम फळांचा समावेश करावा, अन्न पोषण शास्त्रज्ञांची शिफारस आहे. पण प्रत्यक्षात आपल्या आहारात याचे प्रमाण फारच कमी आहे. काही माहितीच्या आधारावर आपल्या भारतात फळे व भाजीपाला यांचे आहारातील प्रमाण फक्त 40 ते 60 ग्रॅम इतकेच आहे. शिफारशीनुसार आपण आपल्या आहारात फळे व भाजीपाला यांचे प्रमाण वाढविल्यास आपणास गरज असलेल्या पैकी 90 टक्के 'क' जीवनसत्त्व, 50 टक्के 'अ' जीवनसत्त्व, 35 टक्के 'ब' जीवनसत्त्व आणि 25 टक्के लोह फक्त फळे-भाजीपाला यांद्वारेच मिळू शकतात.
जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांचा विचार केल्यास आपली फळे व भाजीपाल्याची उत्पादकता अतिशय कमी आहे. मोसंबीची आपली उत्पादकता हेक्टरी आठ टन आहे तर दक्षिण आफ्रिकेची हीच उत्पादकता 70 टन आहे. इस्राईलची 40 टन आहे. आपली आंब्याचीही उत्पादकता आठ टनच आहे तर मेक्सिको40, ,इस्त्राईल 35, दक्षिण आफ्रिका 45 टन आहे. भाजीपाल्यामध्ये देखील अन्य देशांची उत्पादकता आपल्या देशापेक्षा तीन-चार पट अधिक आहे. फळे व भाज्यांच्या उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. पारंपारिक शेती करणे कुठल्याच दृष्टीने परवडत नाही. अलीकडच्या काळात भाजीपाला उत्पादनात व्हर्टिकल फार्मिंग, हरितगृहांतील शेती, मातीविना शेती अशा अनेक संकल्पना वापरात येऊ लागल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे फळभाज्यांचे मुख्यतः टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी यांचे उत्पादन चार-पाच जास्त घेणे शक्य आहे. उत्पादन अधिक प्रमाणात वाढवण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. फळे व भाजीपाला निर्यातीत भारत देश जगात 17 व्या स्थानावर आहे तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. निर्यात धोरणात सुधारणा करून निर्यात वाढवली पाहिजे.
आपला देश फळे व भाजीपाल्याच्या उत्पादनात जगात द्वितीय क्रमांकावर आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात 25 टक्के सुद्धा त्याची उपलब्धता होत नाही. शिवाय फळे व भाज्या नाशवंत असल्याने त्याचे काढणीपासून ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत उत्पादनांपैकी 30 ते 40 टक्के नुकसान होते. साहजिकच हे वर्षे 'आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष' साजरा करताना अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. फळे व भाजीपाला यांचे प्रमाण आहारात वाढवून आपली प्रतिकारशक्ती वाढवू या.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment